लोकसभा : 'आजचा दिवस असल्यामुळे संडे, आता कविता करू लागले आहेत धनंजय मुंडे'

रामदास आठवले Image copyright Getty Images

कवितेच्या माध्यमातून विरोधकावंर टीका करण्यासाठी रामदास आठवले यांना ओळखलं जातं. पण आज भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर कवितेच्या माध्यमातून आगपाखड केली आहे.

याची सुरुवात केली ती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी. त्यांनी ट्वीट करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

"सोडून गेले नगरसेवक, सोडून गेले आमदार,

एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही, जाणत्‍या राजाला गाठले,

पाठीवर हात ठेऊन नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन,

बारामतीच्‍या काकांनी "फक्त लढ" असे म्‍हटले.!!," असं ट्वीट शेलार यांनी केलं.

Image copyright Twitter

त्यांचं हे ट्वीट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून होतं. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेलार यांनी वरील ट्वीट केलं.

त्यांच्या या ट्वीटला उत्तर म्हणून मनसेनं अधिकृत अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटलं,

"मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर,

चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर,

त्रिफळा उडवू मोदी-शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील,

काळजी करू नका शेलार भाऊ, बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील."

Image copyright Twitter

शेलार यांना उत्तर म्हणून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कवितेच्या थाटात उत्तर दिलं.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं की,

"काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना

शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले

प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी 'आठवले'."

Image copyright Twitter

या सर्व नेत्यांच्या प्रतिक्रियेवर रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून टिप्पणी केली आहे. ते म्हणतात,

"माझ्या कवितांची अनेक जण करत आहेत कॉपी,

पण ही सवय नाही तेवढी सोपी.

गुजरातमध्ये आहे एक गाव वापी,

परंतु राजकारणात कुणी असू नये पापी."

पुढे राज ठाकरे यांच्याविषयी ते म्हणतात,

"शरद पवारांच्या बरोबर जरी गेले असले राज ठाकरे,

तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बीजेपीमध्ये अनेक येत आहेत बकरे.

विरोधकांनी जास्त करू नयेत आमच्यासमोर नखरे,

कारण एकत्र आले आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे."

Image copyright Twitter

धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी कवितेच्या शैलीतून टीका केली.

"आजचा दिवस असल्यामुळे संडे,

आता कविता करू लागले आहेत धनंजय मुंडे.

मी तर नेहमीच खा असतो अंडे,

म्हणून बीडमध्ये निवडून येणार आहेत प्रीतम मुंडे."

तर आशिष शेलार यांची बाजू सावरताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ते म्हणतात,

"मंत्रीपद न मिळाल्यामुळे आशिष शेलार यांची झाली नाही दैना,

कारण त्यांच्यासमोर आहे नरेंद्र मोदींचा आयना.

राहुल गांधींकडे सध्या कुणीही जाईना, राष्ट्रवादीकडे कुणी पाहिना,

मग बघा कुणाची होत आहे दैना."

एकमेकांवर टीका करण्याच्या राजकारण्यांच्या या ट्रेंडविषयी आम्ही कवी अरुण म्हात्रे यांना विचारलं.

ते सांगतात, "हे जे काही चाललंय ते कवितेपुरतं मर्यादित आहे, इथपर्यंत ठीक आहे. भाषण नाही जमत तर चारोळ्यांच्या माध्यमातून टीका होते, ते इथपर्यंत ठीक आहे. पण यापुढे जाऊन परिस्थिती हातघाईवर येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. एका अर्थानं हे बरं लक्षण म्हणायला पाहिजेत, कारण राजकारणी कवितेतून एकमेकांवर बाण मारत आहेत. परवा बीडमध्ये मारहाण झाली. त्यापेक्षा हे बरं आहे."

"एकतर सगळ्यांच्या मनात खदखद आहे. ही खदखद आता राजकीय विचारधारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. काही जण अत्यंत वैयक्तिक हेव्यादाव्यांवर आले आहेत. हे हेवेदावे काढण्यासाठी त्यांना दुसरा मार्ग नाहीये. चारोळ्यातल्या टोमण्यांतून ही मंडळी शांत होत असतील तर होऊ द्यावी. फक्त याचं पर्यवसन वाईट गोष्टीत होऊ नये," ते पुढे सांगतात.

अरुण म्हात्रे पुढे राज्यकर्त्यांच्या या ट्रेंडवर टीका करताना कवितेच्याच मध्यमातून विचारतात,

"अरे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे,

तुझे कालचे दगदगणारे प्रहर कुठे रे,

तूच दिल्या ना क्रांतीसाठी उनाड हाका,

त्या हाकेनं झांजरणारी लहर कुठे रे,

शिव्या-टोमणे-चारोळ्या अन नुसती वखवख,

या सर्वांवर लोकशाहीची मोहोर कुठे रे?"

यानंतर आम्ही ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांच्या मते, "निवडणुकीतल्या या खेळाकडे लोक मनोरंजन म्हणून बघतात. या कविता व्यंगचित्रासारख्या असतात. त्या एखाद्या घटनेवर आधारलेल्या असतात. त्यांचा जीव त्या घटनेपुरताच मर्यादित असतो. दुसऱ्या कविता ज्या गांभीर्यानं लिहिलेल्या आहेत त्या अनेक वर्षं टिकतात."

"व्यक्तीवर न लिहिता, राजकीय प्रवृत्तीवर लिहिल्यास ती कविता जास्त दिवस टिकते. राजकीय प्रवृत्तींचा वेध घेणारी कविता वेगळी आणि एखाद्या प्रसंगावरून टीका करणारी प्रासंगिका वेगळी. या सगळ्या कविता प्रासंगिकामध्ये मोडतात. परंतु हा प्रकार स्तंभलेखकांना शोभून दिसतो. परंतु कुणी लोकप्रतिनिधी असेल तर त्यानं कधीतरी कवितांचा आधार घेणं हा भाग वेगळा, पण सातत्यानं त्याचा वापर केल्यास परिस्थितीचं आणि प्रश्नांचं गांभीर्य कमी होतं," ते पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)