मिशन शक्ती: इस्रोचा उपग्रह बैलगाडीवर तर राहुल गांधी यांचा वाढदिवस विमानात? फॅक्ट चेक

गांधी घराणं, इस्रो Image copyright SM viral post
प्रतिमा मथळा गांधी कुटुंबीयांचा फोटो

'मिशन शक्ती' यशस्वी झाल्याच्या घोषणेनंतर सध्या सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत. आपल्या शास्त्रज्ञांना द्यायला पैसे नसताना इंदिरा गांधी आपल्या कुटुंबीयांसोबत देशाच्या पैशावर चैन करत होत्या, असा संदेश या फोटोंसोबत पसरवला जात आहे.

"भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आर्थिक चणचणीचा सामना करत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कुटुंब देशाचा पैसा उडवत होत्या," असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

यातला एक फोटो इंदिरा गांधींचा आहे. या फोटोत त्या आपल्या कुटुंबीयांसोबत एका विमानात बसल्या आहेत.

तर दुसरा फोटो इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आहे, ज्यात ते एका बैलगाडीत उपग्रह घेऊन जाताना दिसत आहे.

उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला संबोधित केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर पसरवले जात आहेत.

भारत अंतराळ क्षेत्रात चौथी महाशक्ती बनली आहे आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेर फिरणारे एक सक्रिय उपग्रह पाडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते.

Image copyright Sm viral post
प्रतिमा मथळा व्हायरल झालेल्या या फोटोत इंदिरा गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी तसंच बालपणीचे राहुल आणि प्रियंका आहेत.

उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप, ट्विटर आणि शेअरचॅटवर या घटनेला 'मोदी सरकारच्या काळात देशाला मिळालेलं मोठं यश' म्हटलं आहे.

तर दुसरीकडे ज्या यशाचा गवगवा करून पंतप्रधान मोदी लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते काँग्रेस सरकारच्या काळातच भारताने मिळवलं होतं, असा विरोधकांचा दावा आहे.

गांधी घराण्याला लक्ष्य

मात्र बुधवारच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर एक बाब लक्षात आली ती म्हणजे उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुप्सवरून शास्त्रज्ञांच्या अवहेलनेसाठी काँग्रेस पक्षासह इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला दोषी ठरवण्यात येत आहे.

ज्या फोटोंविषयी इथे चर्चा सुरू आहे, ते फोटो अनेक मोठ्या ग्रुप्सवर शेअर करण्यात आले आहेत आणि हजारो लोकांनी ते शेअरही केले आहे.

Image copyright iSRO.gov.in
प्रतिमा मथळा प्रायोगिक कम्युनिकेशन सॅटेलाईट अॅप्पलचा फाईल फोटो

या फोटोंसोबत अनेकांनी लिहिले आहे, "ज्यावेळी रॉकेट नेण्यासाठी इस्रोला बैलगाडी देण्यात आली, त्यावेळी गांधी घराणं एका चार्टर्ड विमानात वाढदिवसाचा जल्लोष करत होतं, हे विसरू नका."

आम्ही या बातमीची पडताळणी केली. त्यात हे फोटो खरे असल्याचं आढळलं. मात्र फोटोंचे संदर्भ पूर्णपणे बदलण्यात आले आहेत, हेही लक्षात आलं.

इस्रोचा फोटो

इस्रोचे शास्त्रज्ञ बैलगाडीवरून उपग्रह घेऊन जात असतानाचा फोटो जून 1981 सालचा आहे.

हा अॅप्पल नावाचा एक प्रायोगिक संवादवहन उपग्रह होता. जो 19 जून 1981 रोजी प्रक्षेपित करण्यात आला.

इस्रोकडे आर्थिक चणचण असल्यामुळे हा उपग्रह बैलगाडीतून नेण्यात आला, असं सोशल मीडियावर पसरवण्यात आलं आहे. मात्र हे पूर्णपणे चूक आहे.

Image copyright iSro.gov.in
प्रतिमा मथळा इस्रोचा उपग्रह बैलगाडीवरून नेला जात असतानाचे दृश्य

विज्ञान विषयाचे जाणकार पल्लव बागला यांनी या फोटोमागची हकीगत बीबीसीला सांगितली. ते म्हणाले, "अॅप्पल उपग्रहाला बैलगाडीवरून नेण्याचा निर्णय इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण विचारांती घेतला होता. ती त्यांची लाचारी नव्हती."

बागला सांगतात, "त्या काळी भारतीय शास्त्रज्ञांकडे 'Electromagnetic Interference Reflection' तंत्रज्ञानाविषयी फार माहिती नव्हती. त्यामुळे वैज्ञानिकांना हा उपग्रह कुठल्याही इलेक्ट्रिक मशीनवर ठेवून न्यायचा नव्हता आणि म्हणूनच बैलगाडीची निवड करण्यात आली."

इस्रोच्या एका माजी अध्यक्षांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचं बागला सांगतात.

इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर हा फोटो आणि फोटोशी संबंधित माहिती, दोन्ही उपलब्ध आहे. मात्र इस्रोला कधी खरंच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला आहे का?

याचं उत्तर देताना पल्लव बागला म्हणतात, "कुठल्याच सरकारच्या काळात आम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण किंवा चणचण भासली नाही, असं इस्रोच्या प्रतिनिधींनीच आम्हाला नेहमी सांगितलं आहे. विशेषतः नवीन प्रकल्प सुरू करताना संसाधनांची चणचण भासली, असं कधीच झालं नाही."

गांधी कुटुंबाचा फोटो

या फोटोबाबत इंदिरा गांधी यांनी पदावर असताना देशाचा पैसा आपल्या कुटुंबावर उडवला, असा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

मात्र बातम्यांनुसार गांधी कुटुंबाचा हा फोटो 1977 सालचा आहे, म्हणजेच इस्रोच्या त्या प्रक्षेपणाच्या चार वर्षांपूर्वीचा.

Image copyright Sm viral post
प्रतिमा मथळा उपग्रह प्रक्षेपणावेळी हा फोटो काढलेला नाही.

हा फोटो राहुल गांधींच्या सातव्या वाढदिवसाचा (19 जून) असल्याचं काही वृत्तांवरून कळतं. हे वृत्त खरे मानले तर त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान नव्हत्या.

जून 1977 मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान होते आणि सरकार जनता पक्षाचं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)