PM नरेंद्र मोदी चित्रपट वादात, विवेक ओबेरॉय निवडणूक आयोगासमोर हजर #5मोठ्याबातम्या

विवेक ओबेरॉय Image copyright Vivek Anand Oberoi/FACEBOOK

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात

1. PM नरेंद्र मोदी चित्रपट वादात, विवेक ओबेरॉय निवडणूक आयोगासमोर हजर

'PM नरेंद्र मोदी' या चित्रपटाने आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार काँग्रेसने दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली होती. त्याप्रकरणी मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय गुरुवारी दिल्ली येथे निवडणूक आयोगासमोर हजर झाला.

त्यांच्याबरोबर चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह हजर झाले होते, हे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

त्यांच्यावतीने त्यांचे वकील हितेश जैन यांनी उत्तर दिले. आम्ही याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे, अशी माहिती जैन यांनी माध्यमांना दिली.

आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे हा चित्रपट दाखवण्यात येऊ नये, अशी काँग्रेसने मागणी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल हे स्पष्ट होईल.

2. मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या विरोधात 184 उमेदवार

निझामाबाद येथून तेलंगणा राष्ट्र समितीच्या तिकिटावर उभ्या असलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या कन्या के. कविता यांच्याविरोधात तब्बल 184 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे निजामाबाद येथे EVM द्वारे नाही तर बॅलट पेपरनं मतदान होण्याची शक्यता आहे.

के. कविता यांचा निषेध म्हणून निजामाबाद येथील शेतकऱ्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला. ईव्हीएमच्या यादीत जास्तीत जास्त 64 उमेदवारांचा समावेश करता येतो त्यामुळे मतदान बॅलट पेपरनं घ्यावं लागेल, असं निवडणूक अधिकारी रजथ कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.

3. 'मुख्यमंत्री राज्याचे आहेत की एका राजकीय पक्षाचे?'

गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या पुरोगामी विचारवंतांच्या हत्यांचा तपास संथगतीने व ढिसाळपणे सुरू असल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारला.

Image copyright Twitter

गृह खात्यासह 11 खात्यांचा कारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही की काय, असं कोर्टाने विचारलं. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस हे नाव उच्चारलं नाही, हे वृत्त लोकमतनं दिलं आहे.

राज्याचं राजकीय नेतृत्व (मुख्यमंत्री) एका पक्षाचं नव्हे तर संपूर्ण राज्याचं असतं, असं उपरोधिक भाष्य करत न्यायालयाने याचीही जाणीव करून दिली की, गुन्ह्यांचा तपास आणि कायदा तसंच सुव्यवस्था ही शासनाची सार्वभौम कर्तव्यं आहेत, आणि ती अन्य कुणाकडून उरकून घेतली (आऊटसोर्सिंग) जाऊ शकत नाहीत.

4. शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेस प्रवेश निश्चित

भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे 6 एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 6 एप्रिलला त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे, असं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे.

भाजपने पटनासाहीब या ठिकाणाहून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे ते नाराज होते.

शिवाय याआधीही गेल्या काही महिन्यांपासून ते विरोधकांसोबतच दिसत होते. त्यामुळे ते भाजप सोडणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पटनासाहीब येथून भाजपने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.

5. 'पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी कुणाचाही पुलवामा हल्ल्याशी संबंध नाही'

भारताने पुलवामा हल्ल्याशी संबंधित कागदपत्रं (डॉसियर) पाकिस्तानकडे सुपूर्त केली होती. या कागदपत्रांमध्ये एकूण 90 संशयित कट्टरतावाद्यांची नावं होती. त्यानंतर पाकिस्तानने कारवाई करत अनेक कट्टरतावाद्यांना ताब्यात घेतलं होतं.

त्यापैकी कुणाचाच पुलवामा हल्ल्याशी संबंध नाही, असं पाकिस्तानने स्पष्ट केलं आहे. त्यावर भारतानवे नाराजी दर्शवली आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आपली नाराजी दर्शवली. आम्ही सविस्तर माहिती देऊन देखील पाकिस्तानने काहीच कारवाई केली नाही, असं रवीश कुमार म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)