IPL RCB vs MI: मलिंगाच्या इंचभराच्या नोबॉलने गिळला बेंगळुरूचा विजय, विराट कोहली अंपायरवर भडकला

Image copyright AFP
प्रतिमा मथळा लसिथ मलिंगाने शेवटचा बॉल टाकला होता.

स्थळ-बेंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम. रॉयल चॅलेंजर्सं बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेला.

बॉलर - लसिथ मलिंगा. ट्वेन्टी-20 क्रिकेटमधला अनुभवी आणि धोकादायक बॉलर.

बॅट्समन - शिवम दुबे. एक बॉल आणि 7 रन्स. बेंगळुरूच्या चाहत्यांचा श्वास रोखलेला.

सिक्स बसला तर मॅच टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता. मलिंगाने सगळा अनुभव पणाला लावून मिडल स्टंपवर स्लोअर फुलटॉस टाकला. शिवमने लाँगऑनच्या दिशेने तटवला. बॉल रोहित शर्माच्या दिशेने जाताच बेंगळुरूला एकच रन मिळणार, हे पक्कं झालं आणि मुंबईच्या खेळाडूंनी सेलिब्रेशनला सुरुवात केली.

पुढच्या काही मिनिटांत हँडशेक्सला सुरुवात झाली. मात्र खरं नाट्य पुढे होतं.

प्लेयर्स पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवर शेवटचा बॉल दाखवण्यात आला. मलिंगाचा पाय क्रीझच्या थोडा पुढे असल्याचं स्पष्ट दिसलं.

बेंगळुरूच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर राग आणि निराशाचे भाव उमटले, कारण अंपायरने नोबॉल दिला असता तर फ्रीहिट मिळाली असती आणि बेंगळुरूला खेळायला आणखी एक बॉल मिळाला असता आणि सामन्याचा निकाल बदलू शकता.

पण या सगळ्यासाठी खूप उशीर झाला, कारण मॅच औपचारिकदृष्ट्या संपली होती. मुंबई इंडियन्सने 6 रन्सनी ही मॅच जिंकली.

Image copyright Twitter / MIPaltan
प्रतिमा मथळा लसिथ मलिंगा

मलिंगाने चेंडू टाकल्यानंतर थर्ड अंपायरने मैदानावरच्या पंचांच्या लक्षात आणून द्यायला हवं होतं, असा सूर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांमधून उमटतो आहे.

अन्य वादग्रस्त निर्णयांवेळी मैदानावरील अंपायर तिसऱ्या पंचांकडे दाद मागतात. थर्ड अंपायर टीव्हीवर हा सामना बघत असतो. त्याच्या मदतीला तंत्रज्ञान असतं. मलिंगाच्या शेवटच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला असता, डीआरएस घेतलं असतं किंवा कॅचविषयी साशंकता असती तर थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली असती. त्यावेळी नोबॉल असल्याचं स्पष्ट झालं असतं. मात्र तसं काही घडलं नाही आणि मॅच मुंबईने जिंकली.

मॅच संपल्यावर विराटने खरमरीत शब्दांत पंचांच्या कामगिरीवर टीका केली.

"आपण IPLखेळत आहोत. एखाद्या क्लब लेव्हलचा प्रदर्शनीय सामना नाही. नोबॉल न देण्याचा निर्णय भयंकर होता. अंपायरने डोळे उघडे ठेऊन लक्ष द्यायला हवं होतं. तो इंचभर नोबॉल होता. अंपायरने नोबॉलचा निर्णय दिला असता तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता. हा गेम ऑफ मार्जिन्सचा खेळ आहे असं म्हटलं जातं, काय बोलावं मला समजत नाही. पंचांनी आपल्या कामात अचूक आणि काळजीपूर्वक असायला हवं", असं कोहली म्हणाला.

दरम्यान विजयी कर्णधार रोहित शर्मानेही पंचांच्या कामगिरीवर टीका केली. "पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मला नोबॉलचं कळलं. अशा चुका खेळासाठी चांगल्या नाहीत. १९व्या ओव्हरमध्ये बुमराहने टाकलेला चेंडू वाईड देण्यात आला. तो बॉल जराही वाईड नव्हता पण तरीही देण्यात आला", असं रोहितने सांगितलं.

पंचांविरुद्ध बोलण्याप्रकरणी विराट आणि रोहितवर कारवाई होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मॅच गमावल्यामुळे बेंगळुरूचे २ गुण निसटले आहेत. प्लेऑफ्समध्ये म्हणजेच बाद फेरीत जाताना बेंगळुरूला हे गमावलेले २ गुण निर्णायक ठरू शकतात.

दोन्ही संघांची कामगिरी

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांची मजल मारली. कर्णधार रोहित शर्माने ३३ चेंडूत ८ फोर आणि एका सिक्ससह ४८ रन्स केल्या. सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत ३८ धावा केल्या.

अनुभवी युवराज सिंगने युझवेंद्र चहलला तीन षटकार ठोकत तडाखेबंद सुरुवात केली मात्र पुढच्याच चेंडूवर चहलने त्याला तंबूत परतावले. त्याने १२ चेंडूत २३ रन्स केल्या. ६ बाद १४६ अशा स्थितीतून मुंबईला हार्दिक पंड्याने सुस्थितीत नेलं. त्याने १४ चेंडूत २ फोर आणि ३ सिक्ससह नाबाद ३२ धावा केल्या. मुंबईने १८७ धावांची मजल मारली. युझवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या.

Image copyright Twitter / RCBTweets
प्रतिमा मथळा डीव्हिलियर्सचं अर्धशतक

प्रत्युत्तरादाखल खेळताना विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी ४९ धावांची भागीदारी केली. कोहली ३२ चेंडूत ६ फोरसह ४६ धावा करून बाद झाला. एबीने एकाकी झुंज देत ४१ चेंडूत ४ चौकार आणि ६ सिक्सेस लगावत नाबाद ७० धावांची खेळी केली.

एबी बेंगळुरूला मॅच काढून देणार असं चित्र होतं. मात्र शिमोरन हेटमेयर, कॉलिन ग्रँडहोम आऊट झाले. १९व्या ओव्हरमध्ये फक्त ५ रन्स देत जसप्रीत बुमराहने सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शिवमने सिक्सर मारला. मात्र पुढच्या ५ चेंडूमध्ये मलिंगाने फक्त ५ रन्स देत मुंबईला विजय मिळवून दिला.

शिवमने ५ चेंडूत ९ रन्स केल्या. मात्र स्ट्राईक एबीला देण्यात त्याला अपयश आलं. मुंबईने १८१ रन्स केल्या. ४ ओव्हर्समध्ये अवघ्या २० रन्स देऊन ३ विकेट्स घेणाऱ्या बुमराहला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)