लोकसभा : 'भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोशल मीडियात तरुणांना मोदींचं आकर्षण असल्याचं जाणवतं’

सुनील मेंढे Image copyright facebook

'दिग्गजांना पराभूत करणारा' मतदारसंघ असं भंडारा-गोंदिया मतदारसंघाबद्दल बोललं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्रीकांत जिचकार आणि प्रफुल्ल पटेल यांना याच मतदारसंघातून हार पत्करावी लागली होती.

2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे सुनील मेंढे तर राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात आहेत. या दोघातच थेट लढत होईल असं म्हणत असताना भाजप नेते डॉ. खुशाल बोपचे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंतर त्यांनी अर्ज परत घेतला.

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेले बंडखोर नेते राजेंद्र पटले अद्यापही रिंगणात आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होईल असं बोललं जात आहे. ही लढत कशी होईल हे पाहण्याआधी आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ या.

मतदारसंघाचा इतिहास

1952च्या निवडणुकांवेळी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. आतापर्यंत एकूण 17 खासदार या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले आहेत. त्यापैकी 13 खासदार हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहेत. तर उरलेले चार खासदार भाजपकडून निवडून आले होते.

1954मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीसाठी याच मतदारसंघातून उभे राहिले. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 1999मध्ये चुन्नीलाल ठाकूर यांनी श्रीकांत जिचकार यांना तर 2014 मध्ये नाना पटोलेंनी प्रफुल पटेलांना पराभूत केलं होतं. त्यामुळे या मतदारसंघाला दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघही म्हणतात, असं दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे सांगतात.

Image copyright FACEBOOK/NANA PATOLE
प्रतिमा मथळा नाना पटोले याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते.

2014 मध्ये नाना पटोले यांनी मोदींची काही धोरणं पटत नाहीत, असं म्हणत राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमध्ये गेले.

यावेळी ते नागपूरमधून गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. बोपचे हे देखील 1989मध्ये भाजपच्याच तिकिटावर निवडून आले होते. आता त्यांनी बंडखोरी करत भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत.

Image copyright facebook @sunil mendhe

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. यावेळी त्यांना तिकीट मिळालं नाही तर नाना पंचबुद्धेंना तिकीट देण्यात आलं आहे.

मुख्य उमेदवार कोण आहेत?

भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात आहेत. ते भंडाऱ्याचे नगराध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. तसंच संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची या भागात ओळख आहे.

Image copyright facebook

राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे उभे आहेत. नाना पंचबुद्धे हे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री होते. त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे आणि या मतदारसंघात 'हेवीवेट' समजल्या जाणाऱ्या प्रफुलभाई पटेलांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. नानांना मत म्हणजेच मलाच मत असा प्रचार प्रफुल पटेल करत आहेत.

तिसरे उमेदवार आहेत राजेंद्र पटले. राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे आहेत. ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. दहा महिन्यांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मतदारसंघाचे प्रश्न?

मतदारसंघात विकासाची अनेक कामं रखडली आहेत असं लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे सांगतात. मतदारसंघात सर्वांत बिकट प्रश्न आहे तो रोजगाराचा.

Image copyright SOPA Images/getty

इथं बहुसंख्य शेतकरी हे धान उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अत्यंत कमी जमीन असते. एकदा का धान काढलं की त्यांच्याकडे काम नसतं. त्यांना मजुरी करून जगावं लागतं.

त्यामुळे गरीबी तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. जिल्ह्यात खाणी आहेत, पण या ठिकाणी असलेले मजूर हे बिहार किंवा इतर राज्यातले आहेत. उद्योगधंदे नाहीत. BHELचा प्रकल्प भंडाऱ्यात येणार येणार असं म्हणत होते पण फक्त तिथे कंपाउंडच बांधण्यात आलं आहे, ज्ञानेश्वर मुंदे सांगतात.

भंडाऱ्यात गोसे प्रकल्प आहे. धरण बांधून तयार आहेत पण कालवे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावतो.

Image copyright facebook@sunil mendhe

दुसरी गोष्ट म्हणजे 84 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे, पण तो मार्गी लागलेला नाही. त्यामुळे 84 गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवलं आहे, अशी माहिती मुंदे देतात.

लढत कशी होऊ शकते?

भंडारा-गोंदियात लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होईल, असं देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम सांगतात.

ही जागा निघावी म्हणून भाजप आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहे. मेंढे हे नवखे उमेदवार आहेत त्यांच्या आयुष्यातली ही दुसरीच निवडणूक आहे. त्यांच्या पाठीमागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पाठीशी उभे राहतील.

मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ भाजपकडे आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे. भंडारा शहराव्यतिरिक्त त्यांचा फार काही जनसंपर्क आहे, असं म्हणता येणार नाही. पण लोकसभेला मतदान हे पक्षानुसार होतं,असं भैरम सांगतात.

Image copyright facebook@praful patel
प्रतिमा मथळा नानांच्या प्रचारासाठी प्रुफल पटेल सर्व शक्तिनिशी उतरल्याचं सांगितलं जात आहे.

दुसऱ्या बाजूला नाना पंचबुद्धे आहेत. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासाठी अक्षरशः 'डोअर टू डोअर' प्रचार करत आहेत. इतकंच नाही तर पंचबुद्धेंसाठी प्रफुलभाई पटेल यांच्या पत्नी वर्षाबेन पटेल या देखील महिलांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत, असं मुंदे सांगतात.

प्रफुल पटेल यांच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिलं तर नाना पंचबुद्धेंच्या प्रचारार्थ घेतल्या जाणाऱ्या सभांचं वेळापत्रक आपल्याला दिसतं. ही निवडणूक जिंकण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

पंचबुद्धे विरुद्ध मेंढे ही लढत अटीतटीची होईल, असं भैरम यांना वाटतं. पण त्याचबरोबर पटलेंच्या उमेदवारीमुळे भाजप-शिवसेनेचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरच्या पोस्ट पाहिल्या तर तरुणांना मोदींचं आकर्षण असल्याचं जाणवतं, असं भैरम सांगतात.

मतदारसंघाची रचना

या मतदारसंघात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, भंडारा, साकोली, तुमसर हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. सहा पैकी पाच जागा या भाजपकडे आहेत. तर गोंदियाची जागा ही काँग्रेसकडे आहे.

2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीवेळी मतदारांची संख्या 16,56,284 इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदार 8,41,442 आहेत तर महिला मतदारांची संख्या 6,15,957 इतकी होती.

2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या 17,57,854 इतकी होती. तापर्यंत या मतदारसंघातून एकही महिला उमेदवार विजयी झालेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)