बीड लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पत्नीवर हल्ल्याची अफवा - बीड पोलीस #5मोठ्याबातम्या

सारिका बजरंग सोनवणे Image copyright Facebook / सौ.सारिका बजरंग सोनवणे
प्रतिमा मथळा सारिका बजरंग सोनवणे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात

1. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पत्नीवर हल्ला झाल्याची अफवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील लोकसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांच्यावर हल्ला झाल्याची अफवा आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

"भाजपच्या गुंडांनी बीडचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर केज तालुक्यातील धर्माळामध्ये कोयत्याने हल्ला केला. भाजप दहशत पसरवत आहे," असा आरोप करणारं ट्वीट राष्ट्रॅवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं.

बीडला अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम नावाच्या दोघा व्यक्तींमधील आपापसातील हा वाद होत. यातील गणेश कदमने वैजनाथ सोळंकेवर हल्ला केला आहे. संध्याकाळी 7.30च्या सुमारास वैजनाथ कदम घरासमोर थांबले असताना मद्यधुंद अवस्थेत गणेश कदम कोयता घेऊन आला. वैजनाथ यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्यावर गणेशने त्यांच्यावर हल्ला केला. या हलल्यात वैजनाथ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेपासून 150 फूट अंतरावर सारिका सोनवणे यांची प्रचाराची बैठक सुरू होती. सारिका सोनवणे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, असं अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी सांगितलं. ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.

2. सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करू - राहुल गांधी

"जर आपला पक्ष सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करू आणि पुन्हा नियोजन आयोग सुरू करू," असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केलं आहे.

हरियणामधील कर्नाल येथील प्रचारसभेत त्यांनी हे विधान केलं आहे. या आयोगामध्ये काही अर्थतज्ज्ञ आणि 100 हून कमी कर्मचारी असतील असेही राहुल यांनी सांगितलं. ही बातमी आज तकने प्रसिद्ध केली आहे.

Image copyright CONGRESS

"केवळ मार्केटिंग करणे आणि खोटी आकडेवारी तयार करण्याशिवाय पंतप्रधानांकडे दुसरं काम नाही, असा आरोपही राहुल यांनी या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला," असंही ते यावेळी म्हणाले.

2 एप्रिल रोजी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी जाहीरनामा प्रसिद्ध करतील, असं ANIने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

3. '... तर लोकसभेच्या निकालांना 6 दिवस विलंब होईल'

प्रत्येक मतदारसंघातील एकूण VVPAT स्लीपपैकी 50 टक्के स्लीप्सची तपासणी करायचं ठरवलं तरी लोकसभा निवडणुकांच्या निकालांना 6 दिवसांचा विलंब होईल, असं मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडलं आहे.

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची VVPAT 99.9936 ट्कके अचूक आहे, असंही आयोगाने आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे. ही बातमी द हिंदूने प्रसिद्ध केली आहे.

Image copyright SAM PANTHAKY/GETTY IMAGES

VVPATची अचूकता तपासण्यासाठी अधिक संख्येने नमुने गोळा करण्यात यावे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण मांडले होते. त्याचप्रमाणे एका मतदारसंघात एकाच मतदान केंद्रावर VVPAT स्लीपची तपासणी करण्याच्या नियमाविरोधता 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

4. भाजपला मत नको: देशभरातील 100 निर्माते दिग्दर्शकांची मोहीम

"आपल्या देशाच्या राज्यघटनेपुढे अलीकडच्या काळात मोठे संकट उभं ठाकलं आहे. देशावर सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीतर्फे संविधानाची वेळोवेळी पायमल्ली केली जात आहे. हे वेळीच थांबवायचे असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला निवडून देऊ नका," असं जाहीर आवाहन देशातील निर्माते आणि दिग्दर्शकांनी केले आहे.

यामध्ये देशातील सुमारे 100 प्रसिद्ध व्यक्तीमत्वांचा समावेश आहे. या मोहिमेत आनंद पटवर्धन, अंजली माँटेरिओ, सनलकुमार शशिधरन, दीपा धनराज, पुष्पेंद्र सिंह, प्रदीप नायर, असे अनेकजण सहभागी आहेत. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

"येत्या निवडणुकीत जर पुन्हा भाजपाला निवडून दिले तर पुढच्या निवडणुका होतील की नाही, याबद्दल खात्री बाळगता येणार नाही, ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आताच खबरदारी बाळगली पाहिजे," असे मत आनंद पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.

5. प्रकाश आंबेडकर यांना मिळालेलं 'हे' चिन्ह

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना अखेर निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांना कपबशी चिन्ह मिळालं आहे.

प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दिन ओवेसी यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली होती. त्यांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह नव्हते.

Image copyright FACEBOOK@OFFICIALPRAKASH AMBEDKAR

प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि विदर्भात अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)