IPL - SRH v RR: डेव्हिड वॉर्नरच्या झंझावतासमोर संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ

डेव्हिड वॉर्नर Image copyright Getty Images

'T-20 आल्यापासून क्रिकेट एकदम बदललं' असली वाक्यं आपण गेल्या काही वर्षांत वारंवार ऐकत आलो आहोत. पण क्रिकेट बदललं म्हणजे नेमकं काय झालं? शुक्रवारी झालेली राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे त्याचं 'क्लासिक' उदाहरणच म्हणावं लागेल.

राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये अंदाजे 10च्या रनरेटनं 198 धावा कुटल्या. पण त्याला तितकंच चोख प्रत्युत्तर देत सनरायजर्स हैदराबादने तितक्याच ओव्हर्समध्ये 201 धावा करून राजस्थानच्या उपकाराची परतफेड केली.

राजस्थान रॉयलचा कर्णधार अजिंक्य राहणेनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. मोठी धावसंख्या उभी करून ही मॅच जिंकू, असा निर्धार करूनच तो मैदानावर उतरला. त्याच्या टीमनं 198 धावांचा डोंगर रचला.

Image copyright PTI

त्यात संजू सॅमसनची शतकी खेळी आणि दस्तुरखुद्द अजिंक्य राहणेची शानदार अर्धशतकी खेळी देखील होती. पण सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या या खेळीला तोडीस तोड उत्तर दिलं. त्यांच्या या विजयाचा शिल्पकार ठरला डेव्हिड वॉर्नर. अवघ्या 37 बॉलमध्ये त्याने 69 धावा बनवल्या. त्याला सुरेख साथ मिळाली ती जॉनी बेयरस्टोची त्याने 28 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 45 धावा बनवल्या.

Image copyright BCCI
प्रतिमा मथळा संजू सॅमसन

पहिल्या विकेटसाठीच दोघांनी निर्णायक 110 धावांची भागीदारी केली. जे काही थोडं फार काम नंतर उरलं ते विजय शंकर आणि रशीद खान यांनी येऊन संपवून टाकलं. रशीद खानने 19 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या दोन बॉलमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारून आपल्या टीमकडे विजयश्री खेचून आणली. रशीद खान आणि युसुफ पठाण दोघांनी 15-15 धावा बनवल्या.

टॉस जिंकणं हे राजस्थान रॉयलच्या पथ्यावर पडेल, असं अजिंक्य राहणेला वाटलं होतं आणि तो बरोबर देखील होता. त्याची तसेच संजूची दमदार खेळी पाहिलं तर आपल्याला वाटतं त्याचा निर्णय योग्यच होता पण दुसऱ्या डावात आलेल्या वॉर्नरनं त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा संजू सॅमसनच्या जडण-घडणीत राहुल द्रविडचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं.

संजू सॅमसनचं हे IPLमधलं दुसरं शतक आहे. संजू सॅमसन हा राहुल द्रविडच्या तालिमीत तयार झालेला मल्ल आहे. 2016 मध्ये राहुल द्रविडनेच त्याला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघात स्थान दिलं होतं. राहुल द्रविड तेव्हा दिल्लीचा कोच होता. त्याच्या खेळात सुधारणा व्हावी यासाठी राहुल द्रविडने विशेष श्रम घेतल्याचं म्हटलं जातं.

शनिवारी (आज) आयपीएलचे दोन सामने होणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्समध्ये एक सामना होणार आहे तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सचा सामना होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)