लोकसभा निवडणूक : शिवसेनेचा किरीट सोमय्यांच्या नावाला इतका विरोध का?

किरीट सोमय्या Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीने मुंबईतल्या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या पाचही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांनाच युतीने उमेदवारी देऊ केली आहे.

पण मुंबईतल्या सहाव्या म्हणजेच उत्तर-पूर्व मतदारसंघातल्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. सध्या भाजपचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. हा मतदारसंघही भाजपच्याच वाट्याला आहे. पण अजूनही सोमय्या यांच्या नावाची घोषणा भाजपने केलेली नाही.

यामागे सोमय्या यांच्या नावाला असलेला शिवसेनेचा प्रखर विरोध हे मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. पण नेमका हा विरोध कोणत्या कारणांमुळे आहे?

सोमय्या विरुद्ध शिवसेना

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सेना-भाजपच्या गेल्या चार वर्षांच्या इतिहासात डोकवावं लागेल. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी असलेली युती शिवसेना-भाजपने त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोडली.

या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या महापालिका निवडणुकांदरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली. शिवसेनेच्या 'सोमय्या विरोधा'ची पायाभरणी याच काळात झाली.

लोकसत्ताचे वरिष्ठ सहाय्यक संपादक उमाकांत देशपांडे सांगतात, 'सेना-भाजपमधून विस्तव जात नव्हता, त्या वेळी भाजपचे आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आणि त्याहीपेक्षा जास्त 'मातोश्री' व थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली होती. शिवसैनिकांच्या ते खूपच वर्मी लागलं होतं. आत्ता सोमय्या यांना होणाऱ्या विरोधामागे ही आगपाखडच कारणीभूत आहे.'

पण याबाबत थोडंसं वेगळं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी मांडलं. ते म्हणतात, 'राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने भाजपशी युती केली, हे अनेक शिवसैनिकांना पटलेलं नाही. त्यामुळे 'युती केली, तरी आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाही' असा संदेश देणं शिवसेनेला गरजेचं आहे. सोमय्या यांना विरोध करून शिवसेना नेमका हाच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.'

शिवसेनेला राग का?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आणि प्रसंगी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात की, सोमय्या नक्कीच पक्षाच्या इशाऱ्यावरूनच बोलले असतील. पण टीका कुठपर्यंत करावी, याचं भान त्यांना राहिलं नाही.

'त्या वेळी सोमय्या म्हणाले होते की, मातोश्रीवर माफियाराज चालतो. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खंडणीखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते', प्रधान सांगतात.

Image copyright Twitter

सोमय्या यांनी त्या वेळी केलेले अनेक आरोप गंभीर स्वरूपाचे होते. 'झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमुळे कोणाचं उखळ पांढरं झालं, हे मी जाहीर करेन' असं ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले होते.

या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत उद्धव ठाकरे यांनीही सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना सोमय्या यांनी 'मी माझी संपत्ती माझ्या संकेतस्थळावर जाहीर करतो. माझ्या बँक खात्यांची सगळी माहिती लोकांसमोर ठेवतो. आता उद्धव ठाकरे यांनीही आपली खातेवही लोकांसमोर उघडी करावी,' असं आव्हान उद्धव यांना दिलं होतं.

तसंच सोमय्या यांनी सात कंपन्यांची नावं जाहीर करून या सात कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या कोणत्या नेत्याचा पैसा गुंतला आहे, ते जाहीर करावं, असं म्हणत शड्डू ठोकले होते.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हाही सोमय्या यांनी शिवसेनेवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. मनसेच्या नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप करत सोमय्या यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांनी चौकशी करावी, अशी मागणीही केली होती.

शिवसेनेच्या इतर नेत्यांवर आरोप करणं आणि थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणं, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. थेट उद्धव यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे सामान्य शिवसैनिकांच्या मनात सोमय्या यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे, असं उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाचा इतिहास

सोमय्या यांच्या उमेदवारीचं काय होणार, हे जाणून घेण्याआधी ते ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत, त्या उत्तर-पूर्व मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

या मतदारसंघात सध्या मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

१९६७पासून आतापर्यंत या मतदारसंघातील मतदारांनी आलटून-पालटून कल दिला आहे. तो कसा, तेदेखील बघू या.

१९६७मध्ये काँग्रेसचे स. गो. बर्वे इथून निवडून आले होते. त्याच वर्षी त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तारा गोविंद सप्रे या काँग्रेस खासदार बनल्या. १९७१च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम कुलकर्णी यांनी निवडणूक जिंकली.

Image copyright Twitter

१९७७ आणि १९८०मध्ये जनता पक्षाकडून सुब्रह्मण्यम स्वामी इथून संसदेत गेले. आपल्या अनेक वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वामींच्या राजकीय कारकि‍र्दीची ही सुरुवात होती.

१९८४मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले. पण १९८९मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी त्यांचा पराभव करत खासदारकी मिळवली.

१९९१मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पुन्हा गुरुदास कामत यांनी सरशी साधली. पण पुढल्या १९९६च्या निवडणुकांमध्ये भाजपचं त्या वेळचं युवा नेतृत्व असलेल्या प्रमोद महाजन यांनी कामतांचा पराभव केला. १९९८मध्ये पुन्हा गुरुदास कामत निवडून आले.

देशात १९९९मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यात पहिल्यांदा भाजपचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले.

२००४मध्ये मतदारांनी पुन्हा गुरुदास कामत यांना निवडून दिलं. २००९मध्ये राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना निवडून देत मतदारांनी कामत यांच्याविरोधातील आपली नाराजी दाखवून दिली. या निवडणुकीत मनसेने जवळपास दोन लाख मतं घेत सोमय्या यांचा विजय हिरावला.

२०१४च्या मोदीलाटेत मात्र सोमय्या यांनी जवळपास तीन लाखांच्या मताधिक्याने संजय दिना पाटील यांचा धुव्वा उडवला.

'हा मतदारसंघ नेहमीच फिरता राहिला आहे. मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर १९७७ आणि १९८०मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता सलग दोन टर्म एकही व्यक्ती निवडून आलेली नाही. गुरूदास कामत यांनाही ही किमया जमली नाही. २००९मध्ये मनसे फॅक्टरमुळे सोमय्या पडले. यंदाही त्यांच्यासाठी सेना फॅक्टर निर्णायक ठरणार आहे', उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

सध्या परिस्थिती काय?

सध्या या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहेत. राजेंद्र गावित यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांना सोमय्या यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ते उठून गेले.

या मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी मिळणार का, तुमचं नाव कधी जाहीर होणार, याबाबत खासदार डॉ. किरीट सोमय्या यांना विचारलं असता, 'याचा निर्णय पक्ष घेणार आहे. मी याबाबत काहीच बोलणार नाही. पक्षाचे प्रवक्तेच याबाबत बोलतील' असं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

पक्षप्रवक्ते राम कदम आणि केशव उपाध्ये यांच्याशीही आम्ही संपर्क साधला.

'भाजपचा उमेदवार कोण असेल, हे भाजप ठरवेल आणि सेनेचं सेना बघेल. सोमय्यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही. लवकरच या मतदारसंघातील उमेदवाराचं नाव जाहीर होईल,' असं भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी सांगितलं.

तर भाजपचे दुसरे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या म्हणण्यानुसार आत्ता तरी या जागेवरून काहीच मतभेद नाहीत.

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या मते सोमय्या यांनी केलेली टीका पक्षाच्या इशाऱ्यावरूनच होती. त्यामुळे मुख्यमंत्री किरीट यांना सांभाळून घेतील, असं त्यांना वाटतं.

'उद्धव आता अमित शाह यांना अहमदाबादमध्ये भेटणार आहेत. या भेटीदरम्यान सोमय्या यांच्या उमेदवारीविषयी चर्चा होऊ शकते. सोमय्या यांच्याकडून लेखी माफीनामा घेतला जाऊ शकतो. कदाचित तो 'सामना'च्या पहिल्या पानावरही छापला जाईल. त्यानंतर सोमय्या यांच्या उमेदवारीला कदाचित शिवसेनेचा होकार मिळू शकतो,' संदीप प्रधान सांगतात.

'सोमय्या यांच्याऐवजी शिवसेना भाजपमधील मनोज कोटक यांचं नाव पुढे करत आहे. या नावाबाबत भाजपचा विचार काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,' असं उमाकांत देशपांडे सांगतात.

प्रवीण छेडा यांना उमेदवारी?

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. छेडा हे काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी २९ वर्षं भाजपमध्येच होते.

सोमय्या यांना होत असलेला शिवसेनेचा विरोध आणि त्याच वेळी छेडा यांची भाजपमध्ये झालेली घरवापसी यामुळे भाजप छेडा यांना उमेदवारी देणार का, अशी चर्चा रंगली होती.

Image copyright Facebook@Pravin Chheda
प्रतिमा मथळा प्रवीण छेडा

याबाबत थेट प्रवीण छेडा यांना विचारलं असता त्यांनी आपल्याला लोकसभा उमेदवारीत कोणताही रस नसल्याचं स्पष्ट केलं.

'काँग्रेसमध्ये जाण्याआधी २९ वर्षं मी भाजपमध्ये होतो. काही वैयक्तिक मतभेदांमुळे मी पक्ष सोडला होता. पण आता मतभेदाची ती कारणं उरलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा मातृपक्षात परतण्याचा निर्णय घेतला', छेडा यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

सुनील राऊत यांचं बंड

याच वेळी भाजपने किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर युती झाली आहे याचा विचार न करता आपणही लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरू, असं शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी जाहीर केलं.

सुनील राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत.

'सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्येच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांचा छळ केला आहे. भाजपने त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन. मतांचं विभाजन होऊन प्रतिस्पर्ध्यांना फायदा होऊ नये, असं भाजपला वाटत असेल, तर त्यांनी सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये,' बीबीसी मराठीशी बोलताना राऊत यांनी सांगितलं.

भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी, ही त्यांची अंतर्गत बाब नाही का, असं त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की, हा भाजपचा अंतर्गत विषय असला, तरी आम्हा शिवसैनिकांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. या वेळी 'ईशान्य मुंबईके शिवसैनिकों में एक ही स्पिरिट, आनेंवाले इलेक्शनमें हमें नहीं चाहीये किरीट' हीच आमची घोषणा आहे, असंही ते म्हणाले.

उद्धव यांनीही मोदी-शहा यांच्यावर कडवी टीका केली होती, याची आठवण करून दिल्यावर राऊत यांचं म्हणणं होतं की, ते आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी काय करावं, हे आम्ही त्यांना सांगणार नाही. पण आम्ही शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांवर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या सोमय्या यांचा प्रचार करणार नाही.

युतीवर परिणाम होईल?

या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना-भाजप यांच्या युतीवर परिणाम होऊ शकतो, असं संदीप प्रधान यांना वाटतं.

ते म्हणतात, 'आधी स्वबळाची भाषा करत एकमेकांवर यथेच्छ टीका करणारे हे दोन पक्ष आता एकत्र आले आहेत. नेत्यांच्या पातळीवर मनोमिलन झालं असलं, तरी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अजूनही कटूता आहे. सोमय्या यांच्या प्रकरणात शिवसेनेने खूपच विरोध केला आहे. याचा परिणाम या मतदारसंघाच्या आजूबाजूच्या मतदारसंघात नक्कीच होऊ शकतो.'

Image copyright Getty Images

'सोमय्या यांना विरोध करत शिवसैनिकांनी प्रचार करायला नकार दिला, तर जिथे सेना-भाजपमध्ये नाराजी आहे, त्या त्या मतदारसंघांमध्ये संघर्ष होऊ शकतो. हा संघर्ष अंतर्गत असेल. तो कदाचित थेट दिसणार नाही. पण त्याचा परिणाम निकालांवर होऊ शकतो', प्रधान सांगतात.

या मतदारसंघातील युतीचा उमेदवार ६ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्यानंतर घोषित केला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना ही बाब ताणून धरते की, भाजप आपल्या मित्रपक्षाची नाराजी करण्यात यशस्वी होतो, यावर या मतदारसंघातील उमेदवार आणि कदाचित खासदारही ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)