लोकसभा निवडणूक : राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा प्रचार करत आहेत - दिलीप गांधी

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजते आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलीप गांधी यांनी बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी गांधी यांच्याशी खास बातचीत केली. राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघात भाजपला मदत करत आहेत, असा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला आहे. या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला असून त्यांची मुलाखत नियोजित आहे.

प्रश्न :नगर दक्षिण मतदारसंघाची निवडणूक फार गाजतेय. तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी का नाकारली?

गांधी : मी 1999मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलो. 2004 मध्येसुद्धा पक्षाने सांगितलं म्हणून मी थांबलो. 2009 ला परत निवडून आलो. 2014 मध्येही मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज द्यायचा आहे.

काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगा आमच्या पक्षात येतो ही माझ्यासाठीही एक अभिमानाची गोष्ट होती. पक्षाची भूमिकाही त्या दृष्टीने होती.

प्रश्न :म्हणजे तुमची नाराजी दूर झालीये आता?

गांधी : सुरुवातीला नाराजी होती. पण पक्षाने जेव्हा पूर्ण भूमिका समजावून सांगितल्यानंतर समाधान झालं.

प्रश्न :तुमचा मुलगा बंडखोरी करत आहे असं बोललं जातंय. त्यात कितपत तथ्य आहे?

गांधी : सुरेंद्रने गेल्या 10-15 वर्षांपासून वेगवेगळ्या पदांवर काम केलंय. खासदार म्हणून मोठ्या कार्यक्रमाला मी जायचो. लहानसहान कार्यक्रमांना तो जायचा. प्रत्येका गावात, वाडी वस्तीवर तो पोहोचला आहे. कारण मी दिल्लीत असायचो. त्याच्यामुळे लोकांशी त्यांचा संपर्क चांगला आला. लोकांनी त्याला आग्रह केला की त्यानेही निवडणूक लढवावी. त्यातून एक वातावरणनिर्मिती झाली. मात्र आम्ही आतापर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही.

Image copyright Facebook @Dilip Gandhi

प्रश्न :साधारण कधीपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे?

गांधी : आताच नक्की असं काही सांगता येत नाही.

प्रश्न :काल राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील तुम्हाला येऊन भेटले. तुमची मनधरणी त्यांनी केली का?

गांधी : मी विद्यमान खासदार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा नगर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्षसुद्धा आहे. संघटनेच्या माध्यमातूनच उमेदवार यशस्वी होत असतात. या दृष्टिकोनातू काल राधाकृष्ण विखे पाटील येऊन गेले, आज सुजय विखेही येऊन भेटून गेले. काही राजकीय चर्चा आणि कशा पद्धतीने काम करायचं असा विषय होता.

प्रश्न :राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा प्रचार करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ते काँग्रेसचे नेते आहेत. नक्की तुमच्यात काय चर्चा झाली?

गांधी : सामान्य माणसाला अपेक्षित असा प्रश्न तुम्ही विचारला. निवडणुकीचं वातावरण आहे त्यामुळे निवडणुकीवर चर्चा होतच असते.

प्रश्न :तुमच्या घराण्याने बंडखोरी करू नये म्हणून मनधरणी करायला आले होते?

गांधी : प्रत्येक जण वेगवेगळे कयास लावतो. त्यांचा मुलगा उमेदवार आहे, मी विद्यमान खासदार आहे त्यामुळे येऊन भेटणं स्वाभाविक आहे. ही प्रक्रिया सुरू असते. माझा आणि विखे पाटलांचा 1980 पासून संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांशी माझे सुख, दु:खाचे संबंध आहेत.

प्रश्न :राधाकृष्ण विखे पाटील भाजपला मदत करत आहेत का?

गांधी : निश्चितच. (थोडंसं सावरून) उमेदवाराला मदत करताहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करत आहेत. त्यांचा मुलगा आहे ना..

प्रश्न : आतून कुठूनतरी पाठिंबा आहे असं दिसतंय

गांधी : ते विरोधी पक्षनेते आहेत. त्या नात्याने ते भेटीगाठी करत आहेत. त्यांनाही काही बंधनं आहेतच ना.

Image copyright FACEBOOK/Sujay Vikhe-Patil

प्रश्न : तुम्ही सुजय विखेंचा प्रचार करणार का?

गांधी : मी सुरुवातीपासून संघटनेला मानलं आहे. मी संघटनेच्या माध्यमातून खासदार झालो आहे. मंत्रिपद ही मिळालं. खासदार निवडून आल्यानंतर तो देशाचा असतो. आम्ही सर्वांचे प्रश्न मांडतो. त्यामुळे मी पक्षाचा आभारी आहे.

प्रश्न :पण प्रचार करणार का? आतापर्यंत तुम्ही कुठेच दिसला नाहीत.

गांधी : याचं कारण असं आहे प्रत्येकाने योग्य पद्धतीने संवाद साधण्याची गरज असते. जेव्हा विश्वासाचं वातावरण तयार होतं तेव्हा कामाला गती येते. आम्ही तर हाडाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्याशी चांगल्या पद्धतीने चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही प्रचार का करायचा?

प्रश्न : विखे पाटलांनी तुमचा विश्वास संपादन केला आहे का?

गांधी : चांगली चर्चा झाली आहे. कमळाला विजय मिळावा हाच आमचा उद्देश असतो. त्यात समोर उमेदवार कोण आहे, ते आम्ही पाहत नाही. प्रचारात आम्ही उतरणारच. मी या परिस्थितीतून आधीही गेल्यामुळे संघटनेने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार करणार. मेळाव्यातही मी जाहीर केलं. त्यांना जेव्हा पक्षात घेतलं तेव्हाही मी हे जाहीर केलं. मी सगळ्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आहे. कर्तव्यात कसूर केली नाही. पण नशिबाची साथ नव्हती. त्यामुळे मला तिकीट मिळालं नाही. त्यामुळे नाराज न होता संघटनेसाठी काम करायचं, त्याही पलीकडे जाऊन देशासाठी काम करायचं. मोदींना सत्ता मिळवून द्यायचं काम आम्हा कार्यकर्त्यांचं आहे आणि ते मी करणार आहे.

प्रश्न : तुमचा मुलगा उभा राहिला तर तुम्ही कुणाचा प्रचार करणार?

गांधी :मी भाजपचा प्रचार करणार. तो माझा मुलगा आहे. कुठे थांबायचं ते मी त्याला योग्य वेळी सांगेनच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)