लोकसभा निवडणूक 2019 : बुलडाण्यात प्रतापराव जाधव विजयाची हॅट्रिक साधणार की राजेंद्र शिंगणे त्यांना रोखणार?

प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे Image copyright facebook
प्रतिमा मथळा प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे

2009मध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे अशी तुल्यबळ लढत बुलडाण्यात झाली होती. या लढतीत 28 हजार मतांनी प्रतापराव जाधव यांचा विजय झाला होता. आता पुन्हा 2019मध्ये हे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

'बंद करा बाप लेकांचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे,' 1989च्या लोकसभा निवडणुकीत हा नारा बुलडाण्यात घुमला आणि भाजप-शिवसेनेनं बुलडाण्यात पाय रोवायला सुरुवात केली. या नाऱ्याला पार्श्वभूमी होती ती 1980 आणि 1985च्या लोकसभा निवडणुकीची.

1980मध्ये काँग्रेसनं बाळकृष्ण वासनिक यांना उमेदवारी दिली आणि ते बुलडाण्याचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर म्हणजेच 1985मध्ये बुलडाण्यातून बाळकृष्ण वासनिक यांचे सुपूत्र मुकुल वासनिक यांना काँग्रेसनं रिंगणात उतरवलं आणि तेही निवडून आले.

"1989च्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघात काँग्रेसनं मुकुल वासनिक आणि भाजपनं सुखदेव काळे यांना उमेदवारी दिली. वासनिक कुटुंबानं दहा वर्षं मतदारसंघावर राज्य केलं होतं. त्यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता. इतका की या निवडणुकीत स्वत: काँग्रेसमध्येच मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली. ती इतकी तीव्र होती की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपचे उमेदवार सुखदेव काळे यांना मतदान केलं," 1989च्या लोकसभा निवडणुकीविषयी बुलडाण्यातील ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ सावळे सांगतात.

याच निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेनं बुलडाणा जिल्ह्यात पाय रोवायला सुरुवात केली आणि गेल्या 20 वर्षांत बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला.

राष्ट्रवादी शिवसेनेला रोखणार?

"2009मध्ये जाधव विरुद्ध शिंगणे अशी तुल्यबळ लढत बुलडाण्यात झाली. या लढतीत जाधव फक्त 28 हजार मतांनी जाधव निवडून आले. पुढे 2014मध्ये देशात मोदी लाट निर्माण झाली आणि ते दीड लाख मतांनी पुन्हा एकदा निवडून आले. गेल्या 10 वर्षांच्या काळात प्रतापरावांनी खासदार निधी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असला तरी, खामगाव-जालना हा बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग अपूर्णच राहिला.

"जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न जैसे थे राहिलं. जिल्ह्याची मागास जिल्हा ही ओळख कायम राहिली. जिल्ह्यात नवे प्रकल्प आले नाहीत. जिल्ह्यात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असतानाही टेक्स्टाईल पार्क झाला नाही, यामुळे प्रतापरावांच्या विरोधात वातावरण तयार होईल का हा प्रश्न आहे," जाधव यांच्यासमोरील आव्हानांबद्दल सावळे सांगतात.

Image copyright Gajanan Ghayal

"आता 10 वर्षांनी पुन्हा हे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, आणि त्यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. कारण आता बुलडाण्यात 2014सारखी कोणतीही लाट नाही. शिवाय शिंगणे यांच्या कुटुंबाशी इथल्या जनतेचा चांगला संपर्क आहे. कारण त्यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी सहकाराची मुहूर्तमेढ बुलडाण्यात रोवली. आणि ते सहकाराचं जाळं कायम शिंगणेंच्या संपर्कात राहिलं.

"मतदारसंघातल्या 1265 गावांपैकी जवळजवळ 1000 गावांमध्ये ग्रामसेवा सहकारी सोसायट्या आहेत. आज जरी त्या तोट्यात असल्या तरी हा जो सहकारातला वर्ग आहे तो शिंगणेंशी कायम घट्ट जुळलेला आहे. नरेंद्र मोदींची लाट असूनही 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंनी 3 लाख 69 हजार मतं मिळवली होती. याहून 1 ते दीड लाख मतं जरी शिंगणेंना अधिक मिळाली तरी ते निवडून येण्याची शक्यता आहे," सावळे पुढे सांगतात.

पण शिंगणेंपुढे काही आव्हानं आहेत, असं बुलडाणा दिव्य मराठीचे ब्यूरो चीफ लक्ष्मीकांत बगाडे सांगतात.

"राजेंद्र शिंगणे गेली 5 वर्षं राजकारणात सक्रीय नव्हते, त्यामुळे कदाचित लोकांची नाराजी असू शकते. याशिवाय खामगावचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा त्यांना साथ देतील काय, हाही त्यांच्यापुढे प्रश्न आहे," असं बगाडे सांगतात.

Image copyright Dr.Rajendra B. Shingne/facebook

देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांच्या मते सद्यघडीला बुलडाण्यात शिवसेनेचं पारड जड आहे.

त्यांच्या मते,"सध्या जिलह्यात भाजप-शिवसेनेचं पारडं जड आहे. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीकडे कॉटन मार्केट, पंचायत समिती यासारख्या संस्था नाहीयेत. बुलडाणा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे. दुसरं असं की, शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा मैदानात आहेत. गेल्या दोन टर्ममुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. याऊलट राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून सत्ता नसल्यामुळे त्यांचा काही तेवढा जनसंपर्क नाही."

"भाजप आणि शिवसेनेनं अलीकडच्या काळात पक्षबांधणीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील त्यांचा मतदार वर्ग निष्ठावान आहे. काहीही झालं तरी तो इतर कुणाला मत देत नाही. शिवाय शिवसेनेत गट-तट पाहायला मिळत नाही, ही शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे," असं सावळे यांचं मत आहे.

आघाडीचं समीकरण काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीत सामील झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर शिंगणेंसोबत प्रचार करताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यातल्या स्वाभिमानीच्या व्होट बँकेबद्दल विचारल्यावर सावळे सांगतात, "इतके दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्यातील नेते रविकांत तुपकर हे बुलडाणा जिल्हा बँकेच्या प्रकरणात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात शंखनाद करत होते. तेच तुपकर आज शिंगणेंच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे त्यांचं हे विरोधी वागणं सामान्य मतदार स्वीकारतील हा प्रश्न आहे?"

Image copyright Gajanan ghayal

बुलडाणा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाविषयी पुण्यनगरीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक अनिल म्हस्के सांगतात, "वंचित बहुजन आघाडीला मतं मिळाल्यास त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल. पण, वंचित बहुजन आघाडीनं बाहेरचा म्हणजेच अकोला जिल्ह्यातला उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा एवढा प्रभाव पडेल, असं वाटत नाही."

तर सावळे यांच्या मते, "वंचित बहुजन आघाडीकडे दलित-मुस्लीम मतदार वळला नाही किंवा बहुजन मतदार वळला नाही, तर त्याला काँग्रेसकडे वळण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. पण हे उमेदवार काँग्रेसकडे वळाले नाहीत, तर त्याचा प्रतापरावांना फायदा होईल. वंचित बहुजन आघाडीनं 80 ते 90 हजार मतं मिळवले, तर प्रतापरावांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल."

सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण?

"प्रतापरावांबद्दल अँटि-इन्कबन्सी आहे. विकासापेक्षा स्वत:चं राजकारण, अंतर्गत गटबाजी यामुळे शिवनसैनिक दुखावले गेले आहेत. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला उमेदवारी द्यावी, असं जिल्ह्यातल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं. इतकी प्रतापरावांबद्दल नाराजी होती," असं बगाडे सांगतात.

तर "अँटि-इन्कबन्सी हा फॅक्टर असला तरी तो प्रतापराव यांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित राहिल. यामुळे कदाचित इथं त्यांना कमी मतं पडू शकतात. पण, बाकीच्या सर्व मतदारसंघातून त्यांना चांगली मतं मिळण्याची शक्यता आहे," असं राजोरे सांगतात.

जाधव आणि शिंगणे यांचं म्हणणं काय?

प्रतापराव जाधव हे अतिशय निष्क्रिय खासदार ठरले आहेत, असं डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणतात, "गेल्या 10 वर्षांमध्ये ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं ते अतिशय निष्क्रिय खासदार ठरले. केंद्र शासनाच्या माध्यमातून जी काही विकासकामं करायला हवी होती, त्यातलं एकही काम त्यांनी जिल्ह्यात आणलं नाही. जिल्ह्यातील खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागलेला नाही."

Image copyright Dr.Rajendra B. Shingne/facebook

5 वर्षं तुम्ही राजकारणापासून दूर होते आणि याचा फटका बसेल, असं म्हटलं जातं, यावर शिंगणे सांगतात, "5 वर्षं मी राजकारणापासून दूर नव्हतो. मी फक्त सरकारी बैठकांना गैरहजर होतो, कारण मी सरकारच्या कोणत्याही पदावर नव्हतो. मी स्वत:च्या ताकदीवर 9 जागा जिल्हा परिषदेवर निवडून आणल्या. 2 पंचायत समिती आणि एका नगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावला. राजकारणापासून अलिप्त असतो, तर एवढ्या जागा आल्याच नसत्या. आजही माझा जनसंपर्क चांगलाच आहे. राजकारणापासून दूर होतो, असं म्हणणं चुकीचं आहे."

यानंतर आम्ही प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला.

निष्क्रीय खासदार या विरोधकांच्या टीकेवर प्रतापराव जाधव म्हणतात, "खामगाव-जालना रेल्वे मार्गाला 2016-17च्या बजेटमध्ये 3,000 कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण, राज्य सरकारनं अजून त्यासाठी जमीन अधिग्रहण केलेलं नाही, म्हणून ते काम थांबलंय. एवढंच नाही तर जिल्ह्यातल्या 15 राज्य मार्गाला अपग्रेड करून त्यांचं नॅशनल हायवेमध्ये रुपांतर केलं, यासाठी सरकारनं 5,000 कोटी रुपये मंजूर केले. या दोन वर्षांमध्ये सिंचनाच्या 9 प्रकल्पांसाठी सरकारनं 5,300 कोटी रुपयांचा निधी बुलडाण्याला मिळालेला आहे. याशिवाय समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून गेलेला आहे, ज्याची 87 किलोमाटरची लांबी बुलडाण्यात आहे. एवढ्या मोठ्या गतीनं कामं झाली आहेत."

Image copyright Gajanan ghayal

"राजेंद्र शिंगणे 11 वर्षं मंत्री होते. या 11 वर्षांत त्यांनी जिल्हा बँक बुडवली, सहकार क्षेत्र बुडवलं. कारखाने आणि सुतगिरण्या विकल्या. यामुळे त्यांच्याइतकं निष्क्रिय कुणीच नाही," जाधव पुढे म्हणतात.

तुम्ही स्थानिक पातळीवर कामं केली नाहीत, या आक्षेपावर जाधव उत्तर देतात, "ही देशाची निवडणूक आहे आणि केंद्रीय मुद्द्यांवरच ही निवडणूक लढली पाहिजे. वास्तविकपणे खासदाराचा आणि स्थानिक कामांचा फारसा संबंध येत नाही. कारण स्थानिक कामं ही राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. त्यामुळे केंद्राचा लोकप्रतिनिधी असलेल्या खासदाराचा स्थानिक कामांशी काही संबंध येत नाही."

असा आहे बुलडाणा मतदारसंघ?

बुलडाणा मतदारसंघ हा 1952 ते 1989 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. 1985च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं तरुण मुकूल वासनिक यांना उमेदवारी दिली. 1984मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर वासनिक निवडून आले.

पण 1989च्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आणि भाजपचे उमेदवार सुखदेव काळे विजयी झाले.

1996, 1999 आणि 2004मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ खासदार म्हणून निवडून आले. 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी सलग दोनदा विजय मिळवला.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील 2 मतदारसंघ भाजप, 2 शिवसेना तर 2 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)