इस्रोच्या उभारणीत नेहरूंचं योगदान होतं की नव्हतं? जाणून घ्या वस्तुस्थिती - फॅक्ट चेक

नेहरू Image copyright Getty Images

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इस्रोच्या निर्मितीत काहीही सहभाग नव्हता अशा आशयाच्या काही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASAT ची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा केल्यानंतर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्राला उद्देशून अनपेक्षितपणे भाषण केलं. भारत अंतराळविज्ञानात एक महाशक्ती म्हणून उदयाला आला आहे असं त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावरील उजव्या विचारसरणीच्या अनेक पेजवर या घटनेचं स्वागत केलं. मात्र विरोधी पक्षाचं समर्थन करणाऱ्या लोकांनी मोदींवर या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा आरोप लावला आहे.

पंडित नेहरूंचा मृत्यू 27 मे 1964 मध्ये झाला तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाल्याचा उल्लेख व्हायरल पोस्टमध्ये केला आहे.

ही पोस्ट हजारोंच्या संख्येने पाहिली गेली आहे.

पण हा दावा खरा नाही, असं आम्हाला लक्षात आलं.

वस्तुस्थिती

इस्रोची स्थापना नेहरूंनी केली नाही असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून नाही.

इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली. Indian National Committee for Space Research च्या पुढाकाराने इस्रोची स्थापना करण्यात आली. या समितीची स्थापना 1962मध्ये करण्यात आली. म्हणजे नेहरूंच्या मृत्यूच्या दोन वर्षं आधी या समितीची स्थापना झाली होती.

नेहरू आणि प्रख्यात वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रोची स्थापना करण्यात आली होती.

इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर या संस्थेच्या निर्मितीतील योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे.

"केंद्र सरकारने 1962मध्ये Indian National Committee for Space Research (INCOSPAR) ची स्थापना केली आणि अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यात आलं. डॉ. विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली या समितीने तिरुवनंतपुरम येथे Thumba Equatorial Rocket Launching Station(TERLS)ची स्थापना केली. पर्यावरणाच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी या स्टेशनची स्थापना करण्यात आली. INCOSPAR ची जागा पुढे इस्रोने घेतली."

ऑगस्ट 1969मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. त्या काँग्रेस पक्षाच्याही अध्यक्षा होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)