IPL 2019: सुपर ओव्हरचा थरार आणि दिल्लीची बाजी

IPL Image copyright PTI
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं.

IPL 2019 हंगामात पहिल्यांदाच सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या मुकाबल्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताने 185 धावा केल्या. पृथ्वी शॉच्या 99 धावांच्या बळावर दिल्ली हे आव्हान सहज पेलणार अशी स्थिती होती मात्र कुलदीप यादवने टाकलेल्या शेवटच्या षटकात चित्र पालटलं आणि दिल्लीला 185 धावाच करता आल्या. मॅच टाय झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने कोलकाताला रोखत बाजी मारली.

186 लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीने पृथ्वी शॉ याच्या ९९ धावांच्या खेळीच्या बळावर दमदार वाटचाल केली. पृथ्वी बाद झाला तेव्हा दिल्लीला 9 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. कोलकाताच्या कुलदीप यादवने टिच्चून मारा केला आणि मॅच टाय झाली.

कोलकातातर्फे प्रसिद्ध कृष्णाने सुपर ओव्हरमध्ये 9 रन्स दिल्या. ऋषभ पंतने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला मात्र पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. पुढच्या 3 चेंडूत त्यांना 5 धावा करता आल्या.

सुपर ओव्हर पहिली- 1, 4, आऊट, 2, 2, 1- 10

सुपर ओव्हर दुसरी- 4, 0, आऊट, 1, 1, 1- 7

6 चेंडूत 11 धावांचे लक्ष्य मिळालेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली. कागिसो रबाडाच्या पहिल्याच चेंडूवर रसेलने चौकार लगावला. दुसरा चेंडू निर्धाव पडला. तिसऱ्या चेंडूवर रबाडाने रसेलला त्रिफळाचीत केलं. उरलेल्या तीन चेंडूत दिनेश कार्तिक आणि रॉबी उथप्पा यांना तीन धावाच करता आल्या आणि दिल्लीने बाजी मारली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आंद्रे रसेल

तत्पूर्वी कोलकाताने आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर 185 धावांची मजल मारली. हर्षल पटेलच्या बीमरने खांद्याला दुखापत झालेल्या रसेलने 28 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्याने ४ फोर आणि ६ सिक्सच्या साह्याने कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दिनेश कार्तिकने 36 चेंडूत 5 फोर आणि 2 सिक्सेससह 50 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 95 रन्सची भागीदारी केली. कोलकाताची एका क्षणी 5 बाद 61 अशी घसरगुंडी उडाली होती मात्र कार्तिक-रसेल जोडीने मॅरेथॉन भागीदारीसह डावाला आकार दिला. दिल्लीतर्फे हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या.

दिल्लीकडून पृथ्वी शॉ याने 55 चेंडूत 12 फोर आणि 3 सिक्सेससह 99 धावांची खेळी केली. लॉकी फर्ग्युसनने त्याला बाद केलं. श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)