उर्मिला मातोंडकर : पाच वर्षं सुडाच्या आणि द्वेषाच्या राजकारणाने भरलेली

बॉलीवूडमध्ये करिअर घडवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी आता राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामागचं कारण काय? सोशल मीडियावर त्यांना कोणाकडून त्रास होतोय, राजकारणात येऊन त्यांना काय करायचंय या सगळ्याविषयी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

''लोकशाही, मूलभूत हक्कं, सर्वधर्मसमभाव धोरण आहे. आपल्या देशाचं नाव म्हणजे हे सगळं ओघाने येतं. संविधानाचा गाभा असणाऱ्या या गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असहिष्णूता वाढली आहे. द्वेषाचं आणि सूडाचं राजकारण होतं आहे. नॉर्मल राजकारण जसं होतं तसं होत नाही.

पाच वर्षं द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणात गेली. अशी वेळ आली आहे की काही गोष्टी करायला भाग पाडलं जातंय. गेल्या 5 वर्षात देशात ज्या घडामोडी घडल्या आहेत ते बघता सामान्य नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी जागृत होते. त्याविषयी लोकांना तत्परतेने सांगावसं वाटतं. त्याकरता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला'', असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.

अचानक राजकारणात का यावंसं वाटलं यावर त्या सांगतात, ''जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह बोलले. इतके मोठे लोक आहेत. आपण बोलून काय होणार? असं मला वाटलं. काय बोलून फरक पडणार आहे. ही मानसिकता लोकांची झाली आहे. उदासीनता आली आहे. कोणत्याही गोष्टींबाबत असो. कोणत्याही विषयावर भूमिका घेणं त्यांना उचित वाटत नाही. त्यातलीच मी एक होते. त्यात काय चुकीचं आहे?

तीन-चार वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. आयुष्यातल्या नवीन पर्वात होते. मात्र अशी वेळ येते जेव्हा आपण स्वत:ला प्रश्न विचारू लागतो. जसा आपण विचार करतोय तसा पूर्वीच्या लोकांनी केला असेल. स्वातंत्र्यलढ्यातल्या लोकांनी केला असेल. समाजसुधारकांनी केला असेल. त्यांनी दगडधोंडे खाल्ले, लोकांची टीका पचवली. स्त्रियांच्या शिक्षणाकरता प्रयत्न केले. सामाजिक बदलांकरता झटले. ते सगळे गप्प बसले असते तर काहीच झालं नसतं''.

घरी राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी आहे का यावर त्यांनी सांगितलं की, ''मी अशा घरातली मुलगी आहे जिथे सामाजिक बांधिलकी हा मुद्दा लहानपणापासून आमच्या मनात रुजलेला आहे. आपण आपापल्या परीने करावं. तेवढ्यातच मला काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली.

माझा कोणताही हेतू नाहीये. तसं असतं तर मी काँग्रेसबरोबर नसते, भाजपबरोबर असते. जो पक्ष केंद्रात सत्तेवर नाही अशा पक्षाबरोबर नसते. माझी विचारधारा आहे, ती काँग्रेसच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी सामाजिक उपक्रमात सहभागी होत होते.

गेली 20 वर्ष मी चित्रपट करिअरमध्ये व्यग्र होते. नंतर लग्न झालं त्यामुळे वेळ देता येणं शक्य नव्हतं. त्याआधी मी सामाजिक व्यासपीठांवर जायचे मात्र त्याला प्रसिद्धी द्यावी असं मला वाटलं नाही. माझे वडील राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. मी लहानपणी स्मिता पाटील यांच्यासारख्या अभिनेत्रीला या व्यासपीठावर पाहिलं.

अनेक लहानमोठे कार्यक्रम, शिबिरं यांना मी जात असे. एका कार्यक्रमात जयवंत दळवी यांची भेट झाली होती. तेव्हा मला राजकारणात प्रवेश करण्याची आवश्यकता वाटली नाही. आपण समाजासाठी केलं तर ते समाजावर उपकार नाहीत. त्याला प्रसिद्धी देणं मला कधीच गरजेचं वाटलं नाही. सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तीनेच या क्षेत्रात यावं''.

प्रतिमा मथळा उर्मिला मातोंडकर

भाजप सरकारच्या काळातील घटनांवर बोलताना त्या म्हणाल्या, ''ज्या पक्षाने देशाला विकासाची वाट दाखवली नाही. बुद्धिजीवी वर्गाला घाबरुन विचारात कोंडून टाकलं आहे. भाजपमुळे समाज म्हणून आपण मागे गेलो. उचलली जीभ लावली टाळ्याला असं वागणं आहे. लोकांना ट्रोल केलं जातं. असहिष्णुता दाखवणं या सगळ्या गोष्टींनी व्यथित झाले. म्हणूनच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मॉब लिंचिंगविषयी तुम्ही आधी कधी ऐकलं होतं का? मांस खाताय तर त्यावरून लोकांच्या हत्या होत आहेत. मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे की काय? हे प्रश्न विचारायला नकोत का आपण? असा मुख्यमंत्री आहे, ज्यांच्या राज्यात दिवसाढवळ्या विचारवंतांची हत्या होते. कोर्ट सरकारला प्रश्न विचारत आहे. अकरा खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत. पण या तपासाचं काय? असं कोर्टाने विचारलं आहे. अशावेळी आम्ही कोण आहोत?''.

राजकारणात प्रवेश झाल्यापासून आणि विशेषत: उमेदवारी जाहीर झाल्यापासून ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ''मी बराच काळ सोशल मीडियावर आहे. मला कधीही ट्रोलिंग झालं नाही. मला कधीही निगेटिव्ह कमेंट्स आल्या नाहीत. मी माझं करिअर मॅनेज केलं.

जेव्हापासून मी राजकारणात येणार हे निश्चित झालं तेव्हापासून माझ्या फोटोंवर निगेटिव्ह कमेंट्स दिसू लागल्या. ट्रोलिंग सुरू झालं. कोण करतं हे? मी क्रिटिसिझमच्या विरुद्ध नाही. लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. प्रश्न विचारा- काही हरकत नाही. स्वत:चं आयुष्य नीट जगावं. लोकांच्या आयुष्यावर बोट दाखवू नये. यांनी असं वागावं, त्यांनी तसं वागावं हे सांगू नये.''

प्रतिमा मथळा उर्मिला मातोंडकर

''भाजपची आयटी मशिनरी यामागे आहे त्यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मला माझ्या नावावरून, धर्मावरून ट्रोल केलं जातंय. मला माझ्या धर्मावरून प्रश्न विचारणारे तुम्ही कोण आहात? माझं हिंदुत्व मला माहिती आहे. तुम्ही त्यासंदर्भात सर्टिफिकेट देणारे कोण आहात? वैयक्तिक टीका दर्जा घसरल्याचं लक्षण आहे.

मला उत्तर द्यावंसं वाटत नाही. प्रश्न विचारण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही. राजकीय पक्षाला तर नक्कीच नाही. मी धर्म बदलला का नाही? हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तो पुढे का यावा? यावर विचार करण्याची गरज आहे. सूडाचं आणि द्वेषाचं राजकारण अशा पद्धतीने पाच वर्षात सुरू आहे.'', अशा शब्दांत उर्मिला यांनी भाजपवर टीका केली.

मुंबईतल्या उत्तर मतदारसंघातून उर्मिला उमेदवार आहेत. निवडणुकीच्या गणितांबाबत थोडा वेळ प्रतीक्षा करावी असं त्यांनी सांगितलं. मला जे बोलायचं आहे ते मी बोलणार. आज मी बोलले नाही, आपण बोललो नाही तर देशाकरता खूप उशीर झालेला असेल.

राजकारण ही मंगळावरची गोष्ट नाही. मी मंगळावरून आलेली नाही. या देशाची मी नागरिक आहे. मुंबईकर आहे. या सगळ्या गोष्टींची मला पूर्ण जाणीव आहे.

प्रतिमा मथळा उर्मिला मातोंडकर

हेमा मालिनी, जयाप्रदा, जया भादुरी, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्यापैकी कुणालाही आदर्श मानत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मी व्यक्तिश: कोणाहीविरुद्ध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कोणताही वैयक्तिक आकस नाही. विचारधारेशी मतभेद आहेत. संकुचित विचारधारेविरुद्ध माझा लढा आहे असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)