CRPF च्या ताफ्याजवळ कारमध्ये सिलिंडर स्फोट #5मोठ्याबातम्या

सीआरपीएफ Image copyright TWITTER/ANI

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात

1. CRPF च्या ताफ्याजवळ कारमध्ये सिलिंडर स्फोट

शनिवारी सीआरपीएफच्या ताफ्याजवळ एका कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. श्रीनगर-जम्मू महामार्गावरून सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती.

तसेच पुलवामामधील सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला केला आहे. स्टेट बँकेच्या बाहेर हे बंकर होते. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. या स्फोटानंतर सीआरपीएफच्या गाडीचं नुकसान झालं आहे.

14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान मृत्युमुखी पडले होते. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2. घुसखोरीविरोधात चौकीदारच संरक्षण करणार- मोदी

"आसाम आणि ईशान्येच्या इतर राज्यांमध्ये 1970 पासून काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे घुसखोरी होत राहिली, त्याचा फटका या राज्यांमधील लोकांना बसला आहे. पण आता चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करील", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केले.

Image copyright AFP

"काँग्रेसने कधीही देशाच्या आणि आसामच्या विकासाचा विचार केला नाही. काँग्रेसने देशाला फसवले पण चौकीदारच लोकांचे घुसखोरीपासून संरक्षण करेल", असे पंतप्रधान म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील लोकांनी देश सुरक्षित ठेवणऱ्या चौकीदाराला मते द्यावीत. "लोकांनी विरोधी पक्षांना धडा शिकवावा", असे आवाहनही त्यांनी अरुणाचल प्रदेशातील सभेमध्ये लोकांना केले. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. तो जवान मोदींविरुद्ध लढणार

सीमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादूर यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सैनिकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते हे सांगणारा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाला होता.

"निवडणूक लढविण्यासाठी आपल्याशी अनेक पक्षांनी संपर्क केला होता मात्र आपण अपक्ष लढणार आहोत", असं त्यानं सांगितलं होतं. "आपला हेतू जिंकणं किंवा पराभूत होणं नाही.

सुरक्षा दलांच्या बाबतीत सरकार अपयशी ठरलं आहे. पंतप्रधान मोदी जवानांच्या नावावरून मतं गोळा करतात परंतु त्यांच्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही", असं त्यानं मत व्यक्त केलं आहे.

जानेवारी 2017मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील बीएसएफ जवानांच्या तळावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते हे दाखवणारा व्हीडिओ तेज बहादूरने प्रसिद्ध केला होता. इंडिया टुडेने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. नागपूरचे तापमान 43.3 अंशांवर

गेल्या दोन दिवसांमध्ये नागपूरचे तापमान सतत वाढत असून एप्रिल महिना सुरु होण्यापूर्वीच नागपूरचे तापमान 43.3 अंशांवर गेले आहे.

अकोला येथे तापमान 43.6 अंशांवर गेले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच विदर्भात उन्हाळ्याची सुरुवात झाली. तसेच तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली.

शनिवारी बुलढाणा सोडल्यास विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान 40 अंशांपेक्षा जास्त होते. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. औषध परवाना रद्द केल्याने महिला अधिकाऱ्याची हत्या

चंदिगढमध्ये एका महिला अधिकाऱ्याची तिच्या कार्यालयात घुसून हत्या केल्याची घटना घडली आहे. नेहा शोरी असं त्यांचं नाव असून त्या पंजाबच्या आरोग्य विभागामध्ये औषध परवाना अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

केमिस्ट दुकानाचा परवाना रद्द केल्याच्या रागातून नेहा यांची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बलविंदर सिंह नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली असून त्यानंतर स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली आहे. नेहा यांच्यावर गोळ्या झाडल्यावर तो पळून जात होता. मात्र नागरिकांनी घेरल्यावर त्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)