राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवणार

राहुल गांधी Image copyright Getty Images

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी लोकसभेची निवडणूक दक्षिणेतील एखाद्या मतदारसंघातून लढवतील असे संकेत आधीच देण्यात आले होते.

"राहुलजींनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्यास संमती दिली असून, ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत हे कळवताना मला आनंद होत आहे", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी हा निर्णय घोषित करताना सांगितले.

केरळमधून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर डाव्या पक्षांनी मात्र काँग्रेसवर जबरदस्त टीका करायला सुरुवात केली आहे. "केरळमधून निवडणूक लढवणं म्हणजे डाव्यांशी लढण्यासाठीच येणं", अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे. "जिथं भाजपा लढत आहे तिथं राहुल गांधी यांनी जायला हवं होतं", असंही विजयन म्हणाले आहेत. तर "वायनाडमध्ये राहुल यांचा पराभव करू" असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितलं.

केरळमध्ये एकूण 20 लोकसभा मतदारसंघ आहेत. केरळ राज्यातील कोळीकोड, वायनाड आणि मलाप्पुरम जिल्ह्यांमध्ये वायनाड मतदारसंघ पसरलेला आहे. वायनाड मतदारसंघामघ्ये मनतवडी, कालपेटा, सुलतान बॅटरी, तिरुवंबडी, निलांबर, वांदूर, एरानाड या विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र येते.

2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे एम.आय. शानवास विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत शानवास यांना 3 लाख 77 हजार 35 मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात सीपीआयच्या सत्यन मोकरी यांना 3 लाख 56 हजार 165 मते मिळाली होती.

भाजपाच्या पी. आर. रसमिलनाथ यांना 80 हजार 752 मते मिळाली होती. 2009 साली शानवास यांनी सीपीआयच्या एम. रहमतुल्ला यांचा 1 लाख 53 हजार 439 मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्या निवडणुकीत शानवास यांना 4 लाख 10 हजार 703 मते मिळाली होती.

केरळमधून का लढवणार निवडणूक ?

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील राज्यांनी भारतीय जनता पार्टीला विशेष मदत केली. तसेच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळालं. आता यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेष प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस दक्षिण भारतातील लोकांच्या बाजूने आहे असा संदेश देण्यासाठी राहुल गांधी यांनी केरळची निवड केली असावी असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

इंदिरा गांधी यांनी 1967ते 1971, 1971 ते 1977 या कालावधीत रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 1978 साली इंदिरा गांधी त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर 1980 ते 1984 या कालावधीत त्यांनी आंध्रप्रदेश (सध्याच्या तेलंगण)मधील मेडक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

18 जानेवारी 1980 ते 23 जून 1980 या कालावधीत अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संजय गांधी यांनी केलं होतं. त्यानंतर 1981 पासून 1991 पर्यंत राजीव गांधी अमेठीचे खासदार होते. त्यानंतर 1999ते 2004 या कालावधीत सोनिया गांधी यांनी अमेठीचे प्रतिनिधित्व केले. 1998 साली झालेल्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी यांनी कर्नाटकमध्ये बेल्लारीमध्ये भाजपच्या सुषमा स्वराज यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.

2004 पासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत तर सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत.

मेनका गांधी 1989 साली पिलिभित मतदारसंघात विजयी झाल्या. त्यानंतर 1996 पासून 2009 पर्यंत त्यांनी पिलिभितचे प्रतिनिधित्व केले. मेनका गांधी यांनी 2009 साली झालेली निवडणूक आंवला मतदारसंघातून लढवली आणि तेव्हा पिलिभितचे 2014 पर्यंत प्रतिनिधित्व वरुण यांनी केले.

2014नंतर मेनका गांधी पुन्हा पिलिभितच्या खासदार झाल्या. 2014 साली वरुण यांनी सुलतानपूरमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता यंदाच्या निवडणुकीत वरुण गांधी पुन्हा पिलिभितमधून निवडणूक लढवतील तर मेनका गांधी सुलतानपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)