लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदी म्हणतात, 'चौकीदार हवेत, राजा-महाराजा नको'

नरेंद्र मोदी Image copyright Reuters

"चौकीदारी हा महात्मा गांधींचा सिद्धांत आहे. गांधीजींच्या विचारातूनच आपल्याला प्रेरणा मिळाली आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'मैं भी चौकीदार' या अभियानांतर्गत पंतप्रधानांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेली कारवाई, मिशन शक्ती अशा वेगवेळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारातील त्रुटींवर बोट ठेवत 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं. काँग्रेसच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने 'मैं भी चौकीदार' ही मोहिम सुरू केली. या मोहिमेला निवडणूक प्रचाराचं स्वरूप देण्यासाठी पंतप्रधानांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमवरून चौकीदार संमेलनाला संबोधित केलं.

या संमेलनामधून त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 500 हून अधिक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.

चौकीदार संमेलनातील पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देः

 • 2014 मध्ये भाजपनं माझ्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिल्यानंतर देशभर फिरण्याचा योग आला. मी त्यावेळीच देशातील लोकांना म्हटलं होतं, की दिल्लीची जबाबदारी माझ्यावर देण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही एक चौकीदार नेमत आहात.
 • मी तेव्हाच आश्वासन दिलं होतं, की लोकांच्या पैशांवर कोणतंही संकट येऊ देणार नाही. एखाद्या चौकीदाराप्रमाणे माझं कर्तव्य पार पाडेन.
 • चौकीदार ही कोणतीही व्यवस्था नाहीये. कोणत्याही विशिष्ट युनिफॉर्म किंवा नियमांच्या चौकटीमध्ये चौकीदाराची ओळख मर्यादित नाही. चौकीदार हे एक 'स्पिरीट' आहे, भावना आहे.
 • देशातील जनतेला राजा-महाराजांची गरज नाहीये. हुकूमशहांची गरज नाहीये, तर चौकीदाराची गरज आहे.
 • देशातील जनता आम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. या देशातील तरुण दूरदृष्टिनं विचार करणारा आहे.
 • एक शिक्षक आपलं कर्तव्य पार पाडतो, तेव्हा विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारतं. पोलिस आपलं कर्तव्य पार पाडतो, तेव्हा तुमच्या समस्या सुटतात. त्याचप्रमाणे मला मिळालेल्या यशाचं रहस्य हे लोक सहभागात आहे.
 • बालाकोटचा हवाई हल्ला मी नाही केला, आपल्या देशाच्या जवानांनी केला. या कारवाईचं श्रेय माझं नाही, जवानांचं आहे. सर्वांतर्फे या जवानांना माझा सलाम.
 • राष्ट्रीय राजकारणापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या व्यक्तिला जनतेनं 30 वर्षानंतर पूर्ण बहुमत दिलं. पूर्ण बहुमतातलं सरकार किती महत्त्वाचं आहे, याची बहुतांशी राजकीय पक्षांना जाणीवच नाहीये.
 • आज जगभरात भारताच्या शब्दाला जो मान आहे, त्याचं कारण पूर्ण बहुमतातील सरकार आहे. जगातील कोणताही नेता जेव्हा माझ्याशी हात मिळवतो, तेव्हा त्याला मोदी नाही, तर 125 कोटी लोकांनी निवडून दिलेलं पूर्ण बहुमतातील सरकार दिसतं. त्यामुळेच बरोबरीच्या नात्यानं चर्चा होते.
 • पाकिस्तानला वाटलं होतं मोदी निवडणुकांमध्ये व्यस्त असतील. पण माझं प्राधान्य देशाच्या सुरक्षेला निवडणुकीला नाही.
 • जे देशाची संपत्ती घेऊन पळाले आहेत, त्यांना पै न् पै परत करावी लागेल. 2014 पासून सर्व गोष्टी सुरळीत करण्याचं काम करत आहे. देशातून पळालेल्या काहीजणांना जेलच्या दरवाजापर्यंत आणण्याचं काम तुमच्या मदतीनं केलं आहे. काहीजण जामीनावर आहेत, तर काही जण तारीख मागत आहेत.
 • काही जण परदेशातील न्यायालयात सांगतात, की भारतातील तुरूंग चांगले नाहीयेत. आता यांना महाल थोडीच मिळणार आहेत.
 • मिशन शक्तीद्वारे आपण जगातील केवळ तीन देशांकडे असलेली क्षमता मिळवली आहे. आपल्या वैज्ञानिकांकडे या पद्धतीचे क्षेपणास्त्र विकसित करण्याची क्षमता असताना धाडस करून निर्णय घेणं आवश्यक होतं.
 • आपले एक बुद्धिमान नेते म्हणत होते, की ही गोष्ट गोपनीय ठेवायला हवी होती. पण जर अमेरिका, रशिया आणि चीननं आपल्या यशाचा गाजावाजा केला, तर मग आपण का नाही करायचा? आपण ही चाचणी शत्रू राष्ट्रांसाठी नाही, तर आपल्या सुरक्षेसाठी केली आहे. त्यामुळेच 'मिशन शक्ती' आपल्यासाठी महत्त्वाची घटना
 • काही जणांना असं वाटतंय की देशावर आपली कौटुंबिक मालकी आहे. एक चहावाला पंतप्रधान बनला हे त्यांना सहनच होत नाहीये.
 • काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं असत्याचा प्रचार केला जात आहे. रोज नवनवीन खोटं सांगितलं जात आहे. तुम्ही सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)