PAN CARD 'आधार'ला लिंक करण्याच्या मुदतीत वाढ #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात

1. PAN कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या मुदतीमध्ये वाढ झाल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्च 2019 पर्यंत पॅन कार्डला आधार लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं वाढवली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पॅन कार्डला आधार लिंक करता येणार आहे. मात्र तरीही 1 एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे.

केंद्र सरकारनं बोगस पॅनकार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार आणि पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तीकर कायद्याच्या कलम '139 एए' हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देण्याचं सक्तीचं करण्यात आलं होतं. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार

"लालूप्रसाद यादव यांनी मला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असणाऱ्या काँग्रेस पक्षात आपण प्रवेश करणार असल्याचं", भाजपाचे विद्यमान खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी केली.

Image copyright AFP

"गेली पाच वर्षे शत्रुघ्न सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर नाराज होते. भाजपा सोडून जाताना खूप दुःख होत आहे. या पक्षाशी माझे दीर्घकाळ संबंध होते. पण लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा यांना पक्षाने जी वागणूक दिली त्याने अस्वस्थ झालो आहे". असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. डेटिंग अॅपद्वारे वृद्धाला 46 लाखांचा गंडा

फसव्या डेटिंग अॅपद्वारे एका तरूणीशी मैत्री आणि वर्षभर डेट करण्याच्या आमिषाला भुललेल्या एका सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल 46 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या वृद्धाने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गोरेगाव पूर्व भागात राहाणाऱ्या एका वृद्धाला गेल्या वर्षी मे महिन्यात मोबाइलवर डेटिंग अफची माहिती मिळाली. गर्ल्स फॉर डेट अशी जाहिरात पाहून त्या वृद्धाने ऑनलाइन पैसे भरून नोंदणी केली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क करून प्रोफाइल व्हेरिफिकेशन आणि प्रीमियम मेंबरशिपसाठी त्या वृद्धाकडून 46 लाख रूपये उकळले.

इतके होऊनही तरूणीची भेट न झाल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली.

4. जेटच्या वैमानिकांचे आंदोलन लांबणीवर

जेट एअरवेज वैमानिकांनी 1 एप्रिलपासून काम थांबवण्याबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नॅशनल अॅव्हिएटर्स गिल्ड (एनएजी) या वैमानिकांच्या संघटनेने रविवारी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलले. यामुळे विविध समस्यांशी झुंजणाऱ्या जेट एअरवेजमधील मोठे संकट तात्पुरते तरी टळले नाही.

Image copyright Getty Images

रविवारी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी झालेल्या या दोन्ही एनएजी सदस्यांच्या खुल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जेट एअरवेजमधील एकूण 1600 पैकी सुमारे 1100 वैमानिकांचे आपण प्रतिनिधित्व करत असल्याचा एएनजीचा दावा आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. भारतीय वायुसेनेचं मिग-27 राजस्थानमध्ये कोसळलं

भारतीय वायुसेनेचं मिग-27 राजस्थानमध्य़े जोधपूरजवळ कोसळलं आहे. या दुर्घटनेदरम्यान वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही. नेहमीप्रमाणं सरावासाठी उड्डाण केल्यानंतर हे विमान काहीच वेळात कोसळले. उड्डाणानंतर वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात आलं.

बिघाड लक्षात आल्यावर वैमानिकाने आपण शिवगंजजवळ सिरोही गावात प्रतीताशी 120 किमी वेगामध्ये असल्याचे वायुदलाला सांगितले, त्यानंतर काही वेळातच विमान कोसळल्याचे वैमानिकाने सांगितले. वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवला. एबीपी माझाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)