IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच सुपर किंग, राजस्थान रॉयल्सवर विजय

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीच्या 75 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सवर 8 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा यंदाच्या हंगामातला सलग तिसरा विजय आहे.

घरच्या मैदानावर प्रथम पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची 28 बाद 3 अशी अवस्था झाली. मात्र सुरेश रैना आणि धोनी यांनी 61 धावांची भागीदारी करत डाव सावरला. रैना 36 धावांवर बाद झाला. धोनीने 75 धावांची खेळी करत चेन्नईला 175 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. ड्वेन ब्राव्होने 16 चेंडूत 27 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना, राजस्थानची 3 बाद 14 अशी अवस्था झाली. यानंतर राहुल त्रिपाठी (39), स्टीव्हन स्मिथ (28) यांनी डाव सावरला. बेन स्टोक्सने 46 धावा करत राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. जोफ्रा आर्चरने 11 चेंडूत 24 धावा करत त्याला चांगली साथ दिली. शार्दूल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी टिच्चून मारा करत चेन्नईला थरारक विजय मिळवून दिला. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वॉर्नर-बेअरस्टोचा तडाखा

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी झळकावलेल्या तडाखेबंद शतकांच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा धुव्वा उडवला.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने सलग तीन शतकी भागीदाऱ्या साकारण्याचा विक्रम रचला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने आयपीएलमधलं पहिलवहिलं शतक झळकवताना 56 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याने 12 चौकार आणि 7 षटकारांसह ही खेळी सजवली. बॉल टेंपरिंगप्रकरणी वर्षभराची बंदीची शिक्षा पूर्ण करून परतलेल्या वॉर्नरने 55 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारासह 100 धावांची खेळी केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड वॉर्नर

प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांच्या भेदक माऱ्यासमोर बेंगळुरूने शरणागती पत्करली. बेंगळुरूतर्फे कॉलिन डी ग्रँडहोमने 37 धावा केल्या. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या नबीने 4 षटकात अवघ्या 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. संदीपने 19 धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या.

बेअरस्टोला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)