लोकसभा निवडणूक 2019 : विखे-पाटील EXCLUSIVE... 'पक्षात मोठ्या पदांवर असलेले संघटना वाढीकडे लक्ष देत नाहीत'

"काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आघाडीमध्ये कायम दुय्यम स्थान दिलं जातं," असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं.

बीबीसी प्रतिनिधी प्राजक्ता पोळयांच्याशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्या मुलाखतीचा सारांश...

नगरमध्ये तुम्ही नेमका कोणाचा प्रचार करत आहात...आघाडीच्या उमेदवाराचा की युतीच्या उमेदवाराचा?

नगरमध्ये मी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असं मी आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे कोणाच्या प्रचाराचा प्रश्नच नाही.

Image copyright Getty Images

युतीचा उमेदवार म्हणून तुमचा मुलगाच उभा आहे. तेव्हा पडद्यामागून तुम्ही काही हालचाली करत आहात, असं दिसतंय.

नगर जिल्ह्यामध्ये आमच्या वडिलांच्या काळापासूनच आमचा मोठा लोकसंग्रह आहे. आणि लग्नकार्यासारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त लोक मला बोलवत असतात. त्यामुळे मी निवडणुकीसाठीच फिरतोय असं नाहीये. लोकांनीच मी निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असल्याची चर्चा सुरू केली आहे.

तुम्ही दिलीप गांधींची भेट घेतली. त्यांच्यासोबत काय चर्चा झाली?

दिलीप गांधींकडे मी आज जात नाहीये. माझा आणि त्यांचा जुना स्नेह आहे.

त्यांचे बँकेचे काही प्रश्न होते. मी नगरला आलो होतो. त्यांची इच्छा होती मला भेटण्याची. म्हणून मी घरी येतो, असं म्हटलं. दिलीप गांधींना राजकीयदृष्ट्या भेटायचं असतं, तर मी लपूनछपून भेटलो असतो. आमचे संबंध स्नेहपूर्ण आहेत. त्यामुळे आमच्या भेटीतून काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये.

दिलीप गांधींचा मुलगा नगरमध्ये बंडखोरी करणार अशा चर्चेनंतर तुम्ही त्यांची भेट घेतली. तुम्ही भाजपलाचा पाठिंबा देणार असल्याचं दिलीप गांधींनी थेटपणे म्हटलं आहे.

त्यांच्या मुलानं उभं रहावं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. पण व्यक्तिगत पातळीवर मी त्यांना भेटणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि आताच नाही, ते नेहमीच विनोदानं मला म्हणतात, की आमच्या पक्षाला तुमचा पाठिंबा आहे. मैत्रीमध्ये अशा गोष्टी होतात. त्यातून नेहमीच काही राजकीय अर्थ काढला पाहिजे, असं नाही.

म्हणजे दिलीप गांधी जे बोलताहेत ते खोटं आहे, असं तुम्हाला म्हणायचंय?

ते काय म्हणाले आहेत, हेच मला माहीत नाहीये. दिलीप गांधी म्हणत आहेत म्हणून माझा भाजपला पाठिंबा आहे किंवा नाही हे ठरत नाही. त्याचं म्हणणं हे मापदंड असू शकत नाही.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत तुम्ही आहात. तुम्ही नेमका कुठे कुठे प्रचार करणार आहात?

महाराष्ट्राच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे आहेत. प्रचाराकरता पक्ष सांगेल त्या ठिकाणी जायचं. अजूनपर्यंत प्रचाराचा कार्यक्रम पक्षाकडून आलेला नाहीये. पण जो काही कार्यक्रम प्रचार समिती ठरवेल त्याप्रमाणे प्रचाराला जायचं.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नगरमध्ये सभा घेतली होती. सभेत बोलताना त्यांनी म्हटलं होतं, की डोक्यात हवा गेलेला उमेदवार आम्हाला नगरमध्ये नको होता. त्यांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

शरद पवारांबद्दल मला अतिशय आदर आहे. सुजय खरंतर त्यांच्या नातवासारखा आहे. त्यांनी असं वक्तव्य करणं हेच अतिशय खेदजनक होतं. सुजयची उमेदवारी ही काही राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हती.

शिर्डी आणि नगरची जागा काँग्रेसला सोडावी, असा आमचा आग्रह होता. काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून सुजय उमेदवारी मागत होता. त्याच्या उमेदवारीचा निर्णय पक्षानं घ्यायचा होता. शरद पवारांनी त्याबद्दल काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचं भाष्य केलं आहे. त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. पण त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य टाळावं, असं मला वाटतं.

सुजय विखेंबद्दल पवारांना असं वाटण्यासारखं काही घडलं होतं का?

त्यांना असं का वाटलं किंवा कशामुळं त्यांनी स्वतःचं हे मत तयार केलं, याची मला कल्पना नाही. हे त्यांचं वैयक्तिक मत असावं. एकूणच विखे कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात जो उद्वेग आहे, तो त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.

नगरमधले काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपला मदत करत आहेत, असा आरोप संग्राम जगताप यांनी केला आहे.

Image copyright FACEBOOK/SANGRAMJAGTAP

कोणतीही चर्चा किंवा विचारविनिमय न करता कार्यकर्त्यांनी सुजयबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. मी कार्यकर्त्यांसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं, की ही लढाई आता पक्षाची नाहीये. यामध्ये बाळासाहेब विखे-पाटलांबद्दल प्रेम आहे. त्यांनी नेहमी नगर जिल्ह्यातल्या जनतेला आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून मानलं होतं.

त्यांच्याबद्दल पवारांनी केलेली विधानं, लोकांच्या खूप वर्मी लागली आहेत. लोकांच्या मनात याबद्दल चीड आहे. त्यामुळं निवडणूक पक्षीय पातळीवर राहिलीच नाहीये. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सुजय यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पण या कार्यकर्त्यांवर आता काँग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं, की पक्ष कारवाई करू शकतो. पण त्याची त्यासाठी तयारी आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत कार्यकर्ते थांबू शकतात. परंतु व्यक्तिगत पातळीवर लढाई जाते, तेव्हा पक्ष स्वतःच अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे पक्षानं कारवाई केली तरी आम्ही तयार आहोत, या मानसिकतेत कार्यकर्ते आहेत.

तुम्हीसुद्धा पक्षाच्या विरोधात काम करत आहात, अशी चर्चा होत आहे. तुमच्यावर कारवाई कधी होणार, अशीही विचारणा होत आहे. पक्षश्रेष्ठींनी याबद्दल तुम्हाला काही विचारणा झाली का?

मला पक्षाकडून अजूनपर्यंत काही विचारणा झालेली नाही.

Image copyright FACEBOOK/SUJAY VIKHE-PATIL

जेव्हा सुजयनं निर्णय घेतला होता, तेव्हा सर्व परिस्थिती मी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून कळवली होती. माझ्याबाबतचा निर्णय मी पक्षश्रेष्ठींवर सोपवला आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य करायचा.

काही दिवसांपूर्वी तुमच्या राजीनाम्याच्या अफवा पसरल्या होत्या. तुम्ही स्वतःहून राजीनामा देणार आहात का?

मी जे काही वास्तव आहे, ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडलं होतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ज्या काही राजकीय भूमिका घेतल्या जात आहेत, त्याबद्दल एकूणच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. माझ्या राजीनाम्यामुळं हा प्रश्न सुटणार आहे का, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे.

एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही फारसे सक्रिय दिसत नाहीये. याचं कारण काय? तुम्हीसुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे.

आमच्याच पक्षातील काही लोकांनी हा प्रचार खूप दिवसांपासून सुरू केला आहे. माध्यमांनीही मी भाजपत जाणार, पक्ष सोडणार हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. माझ्या जाण्या न जाण्याची उत्सुकता माध्यमांनाच जास्त आहे. माध्यमांनाच मी आता एकदा विचारणार आहे, की तुमची काय इच्छा आहे?

माध्यमांचा मुद्दा बाजूला ठेवू. पण तुम्ही निवडणुकीत सक्रिय दिसत नाही, त्याची कारणं काय आहेत?

काँग्रेस पक्षाचा विधीमंडळ नेता म्हणून जेव्हा मी सभागृहात किंवा सभागृहाबाहेर काम करतो तेव्हा मनात एक भावना असते, की विशिष्ट प्रसंगामध्ये पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी उभं रहायला पाहिजे.

Image copyright Getty Images

पक्षाची तशी भूमिका दिसत नाही. त्याचं दुःखसुद्धा आहे. पण याचा अर्थ मी पक्ष नेतृत्वाबद्दल नाराज नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मी स्वतःलाच थांबवून घेतलंय. आता औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलीये. उद्या तिथं जाऊन काय काम करायचं असेल किंवा प्रचार करायचा असेल, तो मी करणारच आहे.

नाराज नसल्याच तुम्ही म्हणत असला, तरी काही बैठकांना तुमची अनुपस्थिती दिसते. त्याचं कारण काय?

महाआघाडीची जी संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्याचा निरोप मला आदल्या दिवशी मिळाला. मी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना सांगितलं, की एवढी मोठी पत्रकार परिषद आपण घेतोय, त्याचा निरोप दोन-तीन दिवस आधी मिळायला पाहिजे.

आमचेही काही कार्यक्रम ठरले आहेत. त्यामुळे मी त्या पत्रकार परिषदेत त्यांनाच खुलासा करायला सांगितला होता. कालच्या (शनिवार) काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला मी हजर होतो. मी म्हटलं तसं पक्ष नेतृत्वावर मी नाराज नाहीये.

नगर वगळता इतर जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का?

माझ्याकडे जबाबदारी औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची दिली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

स्टार प्रचारक म्हणून आघाडीच्या उमेदवारांनी तुम्हाला बोलावलं तर तुम्ही जाणार नाही?

सध्याच्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे, त्याचा विचार व्हायला हवा. राज्यभरात काँग्रेस पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

तुम्ही ही भावना पक्ष श्रेष्ठींसमोर मांडली का?

मला असं वाटतं, की पक्ष नेतृत्वानं समजून घेण्याची आवश्यकता असते. ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात आहे, ते पाहता लोकसभेपेक्षाही मोठ्या घडामोडी विधानसभेच्या वेळेस होतील.

याबाबतीत तुमच्या काही सूचना तुम्ही देणार आहात का? पक्ष नेतृत्व किंवा प्रदेशाध्यक्षांशी यासंबंधी काही चर्चा करणार आहात का?

काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणे तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, हा खरा प्रश्न आहे. आघाडी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, अशी भूमिका तुम्ही घेणार असाल तर पक्षातले कार्यकर्ते कधीच सक्षम होणार नाहीत. हेच चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे.

विधानसभेला आघाडी करू नये, असं तुम्हाला वाटतं?

हा पक्षाचा निर्णय आहे.

पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे?

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आज वैयक्तिक लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षात पदांवर कामं केली आहेत. म्हणजे अगदी मुख्यमंत्रीपदापासून अनेक मोठ्या पदांवर ज्यांनी काम केली आहेत, ते आज पक्ष संघटनेकडे लक्ष देताना दिसत नाहीत.

Image copyright Getty Images

पक्षानं त्यांना जी विचारणा करायला हवी, ती पक्षाकडूनही केली जात नाहीये. त्यामुळं दुर्दैवानं काँग्रेसला आघाडीचा घटक म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे आणि पक्षाचे जे काही तथाकथित नेते आहेत, तेसुद्धा पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना किंवा कार्यकर्त्यांना सक्षम करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे फार नाराजीचं वातावरण दिसून येतंय.

तुम्ही कोणत्याही नेत्याचं नाव घेत नाहीये. पण ही सगळी परिस्थिती पक्ष नेतृत्वाला सांगितली तर विधानसभेला आघाडी न होण्याची शक्यता आहे का?

आघाडी करावी की नाही करावी हा माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये. हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. पण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी या सगळ्या कामकाजामध्ये आम्ही काही सुधारणा केली नाही, तर मोठे प्रश्न उभे राहू शकतात.

मी याबद्दल जाहीर भाष्य करणं उचित नाही. कारण पक्षाच्या चौकटीत राहूनच सूचना करणं आवश्यक आहे. पण आज वस्तुस्थिती अशी आहे, की ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्त्यांमध्ये जो नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता होती, तो आम्ही करू शकलो नाही.

2014 मध्ये आमचा दारूण पराभव झाला. काँग्रेसला नीचांकी जागा मिळाल्या. त्याचं कारण काय तर नेतृत्वाची क्षमता नसलेल्यांना विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व दिलं गेलं. त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतात. आणि त्यातून पक्ष उभा कसा राहणार, हा खरा प्रश्न आहे. अजूनही आम्ही आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला तयार नाही.

प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं?

कोणाला बदलून काही होत नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर पक्ष पुन्हा उभा करणं हे मोठं आव्हान होतं. अशोकरावांनी त्याबद्दल चांगलं काम केलं आहे.

2014 चं अपयश हे दिल्लीतल्या नेतृत्वामुळं होतं की महाराष्ट्रातल्या?

दिल्लीतल्या नेतृत्वाचा संबंध कोठे येतो. महाराष्ट्राच्या अगदी स्थापनेपासून पाहिलं तर एवढा दारूण पराभव पक्षाच्या वाट्याला कधीच आला नव्हता. मी कोणाला दोष देत नाहीये. पराभवातून सुधारणा करण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले ते पुरेसे नव्हते.

लोकसभेला काँग्रेस किती जागा जिंकेल असं वाटतं?

उत्तरः मी काही भविष्यवेत्ता नाहीये. प्रदेशाध्यक्षांवर ही जबाबदारी दिलीये आणि त्यांनीच याबद्दल बोलणं योग्य आहे. उगाच आमच्यामध्ये मतमतांतरे नकोत. त्यामुळे त्यांनीच हे सांगायला हवं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)