EMISAT चं इस्त्रोकडून यशस्वी प्रक्षेपण.. आता अवकाशातही हेरगिरी शक्य

उपग्रह Image copyright TWITTER/ANI

भारतीय अंतराळ विज्ञानसंस्था इस्रोने (ISRO) इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट म्हणजेच एमिसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.

तसेच या उपग्रहाबरोबर 28 लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. 28 उपग्रहांमध्ये अमेरिका, लिथुआनिया, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे. हे प्रक्षेपण PSLV-C45द्वारे हे प्रक्षेपण पार पडलं आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पीएसएलव्ही-सी 45 चे यश हा इस्रोच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे असं मत इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे केवळ आपल्या देशाचेच उपग्रह नाही तर इतर देशांचे उपग्रहही प्रक्षेपित करता येतील. विविध उपग्रह तीन वेगवेगळ्या कक्षांमध्ये पाठविण्यात येऊ शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एमिसॅटचं वजन 436 किलोग्रॅम असून विविध देशांच्या इतर 28 उपग्रहांचं एकूण वजन 220 किलो आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

देशाची राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने डीआरडीओने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

शास्त्रज्ञांचं अभिनंदन- पंतप्रधान

वर्धा येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. "पीएसएलव्ही सी 45 यशस्वी झाल्याचा आणि 5 देशांचे दोन डझनाहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. अशा प्रकारच्या प्रक्षेपणाच्यावेळी इस्रोच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये केवळ वैज्ञानिक बसलेले दिसायचे मात्र आता पहिल्यांदाच सामान्य लोकांनाही अशा महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी देण्यात आली. शेकडो लोकांनी उपस्थित राहून हा सोहळा अनुभवला" असे पंतप्रधानांनी वर्ध्यातील भाषणाच्या सुरुवातीस सांगितले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)