लोकसभा 2019: रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये असा सामना

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये असा सामना होत आहे. Image copyright Facebook
प्रतिमा मथळा रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये असा सामना होत आहे.

2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची ही गोष्ट. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे 1999 पासून 2014 पर्यंत आमदार राहिलेले काँग्रेसचे नितीन राऊत यांच्याविरुद्ध भाजपकडून डॉ. मिलिंद माने लढत होते. तर बहुजन समाज पक्षाकडून सेवानिवृत्त IAS अधिकारी किशोर गजभिये मैदानात होते.

नितीन राऊत नागपूरच्या आघाडीच्या काँग्रेस नेत्यांपैकी एक होते. त्यांनी तोवर महाराष्ट्र सरकारमध्ये विविध महत्त्वाची खाती सांभाळली होती. पण मोदी लाटेवर स्वार होत मिलिंद माने यांनी या निवडणुकीत बाजी मारली. नितीन राऊत तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आणि त्यांना वरचढ ठरत दुसऱ्या स्थानी होते बसपचे किशोर गजभिये.

पण काळ असा फिरला आहे की, ज्या राऊतांना गजभियेंनी 2014 साली मागे पाडलं होतं, त्याच गजभियेंसाठी निवडणूक प्रचार करण्याची वेळ नितीन राऊतांवर आता आली आहे. ही आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाची गोष्ट.

रामटेक लोकसभा मतदारसंघ

रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख देशाला P. V. नरसिंह राव यांच्यामुळे झाली. 1984 आणि 1989 अशा दोन लोकसभा निवडणुका ते इथून लढले आणि त्यापैकीच दुसऱ्या पर्वात ते पंतप्रधानही झाले.

Image copyright HT / Getty Images
प्रतिमा मथळा 1997 साली संसदेत अटल बिहारी वाजपेयी आणि P. V. नरसिंह राव. राव रामटेकमधून दोन वेळा लोकसभेत गेले होते.

1957 साली अस्तित्वात आलेल्या रामटेकच्या मतदारसंघात साधारण 1,700 गावं येतात, म्हणजे नागपूर जिल्ह्यातला नागपूर शहर वगळता उर्वरित ग्रामीण आणि निमशहरी भाग. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही रामटेकमध्ये विशेष रस होता. त्यांची महाराष्ट्रातल्या पहिल्या युती सरकारपूर्वीची रामटेकची सभा विशेष गाजली होती, अशी आठवण 'लोकमत' नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.

त्यामुळेच कदाचित 1999 साली प्रथम शिवसेनेच्या सुबोध मोहितेंना काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावता आला. 2004 सालीसुद्धा मोहिते पुन्हा निवडून आले.

मग 2009 मध्ये मुकुल वासनिकांनी रामटेक काँग्रेसच्या तंबूत परत आणलं. पण 2014च्या मोदी लाटेत पुन्हा रामटेकच्या गडावर सेनेचा भगवा फडकला. केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले वासनिक यांना कृपाल तुमाने यांनी तब्बल 1,75,791 मतांनी पराभूत केलं.

काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. म्हणूनच एवढा मोठा विजय मिळविणाऱ्या तुमाने यांना शिवसेनेने यंदाही उमेदवारी देऊ केली आहे.

रामटेक लोकसभा मतदान 2014 - एक दष्टिक्षेप
मतदान केंद्रांची संख्या 2,231
मतदारांची संख्या 1,050,640
महिला मतदारांची संख्या 473,377+
मतदान 53%

नितीन राऊत विरुद्ध गजभिये

2009 मध्ये निवडून आल्यानंतर 2014 मध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक यंदाही रामटेकमधून लढण्यास इच्छुक होते, असं सांगितलं जातं. त्यांच्या कार्यकर्त्यांचीही तसा जोर लावला होता. पण काँग्रेसमधल्या इतर गटांचा विरोध पाहून स्वतः वासनिकांनीच आपली तलवार म्यान केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नितीन राऊत हेसुद्धा रामटेकसाठी इच्छुक होतेच. पण तितक्यात त्यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी गजभिये यांनी काँग्रेसमध्ये एन्ट्री घेतली आणि पाठोपाठ रामटेकचं तिकीटही.

Image copyright Twitter / MWasnik_INC
प्रतिमा मथळा मुकुल वासनिक (उजवीकडून तिसरे) राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात.

2014 सारखी मोदी लाट यंदा दिसत नाही, अशा आशेचे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात होते. पण आपल्या नेत्यांना तिकीट नाकारलं गेल्यामुळे त्यांचं मनोबल खालावलंय, असं 'ABP माझा'च्या नागपूर प्रतिनिधी कौशिक सांगतात.

1987 बॅचचे IAS असलेले गजभिये यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये समाज कल्याण विभागात सचिव म्हणून काम केलं आहे, जिथं एकेकाळी नितीन राऊत मंत्री होते. मुकुल वासनिकसुद्धा केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री होते.

2010 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर खासगी क्षेत्रात काम सुरू केलं आणि नंतर राजकारणात उतरले. 2018 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बसपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण रामटेकच्या अनुसूचित जागेसाठी आधीच इतके लोक बाशिंग बांधून बसलेले असताना पक्षात नव्याने आलेले गजभिये यांना तिकीट कसं मिळालं?

Image copyright Twitter/NitinRaut_INC
प्रतिमा मथळा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नितीन राऊत

एक मुद्दा हा असू शकतो की त्यांनी 2014च्या उत्तर नागपूर विधानसभा निवडणुकीत राऊतांपेक्षा 5,145 मतं अधिक मिळवली होती. पण काही हजार मतांची विधानसभा आणि काही लाख मतांची लोकसभा, यांच्यात अंतर नक्कीच आहे.

त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत किशोर गजभिये यांचं नाव आल्यानंतर नितीन राऊत यांनी दिल्लीचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर 25 मार्च म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नाट्य घडलं.

गजभिये यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राऊत आधी त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळाने ते आणि आमदार सुनील केदार काही कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात परतले.

Image copyright Twitter / NitinRaut_INC
प्रतिमा मथळा आता नितीन राऊत काँग्रेसच्या स्टार प्रचाकरांपैकी एक आहेत.

दिल्ली हायकमांडने आपल्यालाही अर्ज भरण्याची सूचना दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यासाठी आवश्यक पक्षाचं अधिकृत पत्र (A आणि B फॉर्म) त्यांना काँग्रेस पक्षाकडून वेळेत मिळालं नाही आणि त्यांना अर्ज दाखल करता आला नाही.

म्हणजे दिल्लीला राऊत हवे होते तर अशोक चव्हाणांना गजभिये. या घटनेतून महाराष्ट्र काँग्रेसमधलं अंतर्गत द्वंद पुन्हा एकदा समोर आलं, असं निरीक्षण 'लोकमत' नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर नोंदवतात.

काँग्रेसमधला गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर

'माझं पक्षात कुणी ऐकत नसून मी हतबल आहे,' अशा आशयाचं अशोक चव्हाण यांचं एक फोन संभाषण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

चंद्रपूरमधून विनायकराव बांगडे यांना तिकीट वासनिकांच्या म्हणण्यावरून देण्यात आलं, असं ते या कॉलमध्ये म्हणत होते. तो कॉल व्हायरल झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये बांगडे यांचं तिकीट काढून ते शिवसेनेतून नुकतेच आलेले सुरेश धानोरकर यांना देण्यात आलं.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव मुकुल वासनिक हे पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. तर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हाती आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधले मतभेद यामुळे चव्हाट्यावर आले.

Image copyright Twitter / AshokChavanINC
प्रतिमा मथळा 'माझं पक्षात कुणी ऐकत नसून मी हतबल आहे,' असं अशोक चव्हाण एका फोनकॉलदरम्यान कथितरीत्या म्हणाले होते.

"किशोर गजभिये हे मान्य करतात की त्यांना वासनिकांमुळेच तिकीट मिळालं. वासनिकांच्याच मनासारखं झालं, म्हणजे तेच अशोक चव्हाणांना वरचढ आहेत, हे पुन्हा सिद्ध झालं," असं जानभोर सांगतात.

त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे का, हा प्रश्न इथे पुन्हा एकदा उपस्थित होतो.

'काँग्रेसच्या गटबाजीचा विरोधकांनाच फायदा'

पण या सगळ्या गोंधळाचा फायदा विरोधकांना होणार का, याचं उत्तर राजकीय विश्लेषक होकारार्थीच देतात.

"रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी गजभिये आणि कृपाल तुमाने यांच्यातील सामाजिक समीकरण मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे," असं गजानन जानभोर सांगतात.

रामटेक मतदारसंघात आणि एकंदरच पूर्व विदर्भात तेली समाजाची प्रचंड मतं आहेत. काँग्रेसने या समाजातून कुणालाही उमेदवारी दिली नाही. आणि चंद्रपुरात दिली होती ती विनायक बांगडे यांची उमेदवारीही काढून घेण्यात आली, त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Image copyright Facebook / Kishore Gajbhiye
प्रतिमा मथळा किशोर गजभिये प्रचारादरम्यान.

हा कास्ट इम्बॅलन्सचा प्रश्न आहे, असं सरिता कौशिक सांगतात. "या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जातीचं राजकारण होत आहे, हे खरंच आहे. पण आजपर्यंत विदर्भात लोकसभेला जातीचं राजकारण कधी झालेलं नाही. आजपर्यंत असा माहोलच नव्हता, त्यामुळे अशा राजकारणाचा नेमका कसा परिणाम होईल, हे पाहावं लागेल आहे," त्या सांगतात.

"जर नितीन राऊत यांना तिकीट मिळालं असतं तर सुनील केदार यांनी प्रचंड काम केलं असतं. राऊत स्वतः काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आता त्यांचाही हिरमोड झाला आहे, त्यामुळे ते गजभिये यांना किती साथ देतील, ते पाहावं लागेल," असं जानभोर सांगतात.

"या मतदारसंघात 2,000 ग्राम पंचायती आहेत, तुमाने हे खासदार म्हणून पाच वर्षांपासून लोकांमध्ये, गावांमध्ये वावरत आहेत. सोबतच त्यांना भाजपचाही स्पष्ट पाठिंबा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे किशोर गजभिये यांना कमी वेळात एवढ्या मतदारांपर्यंत पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे प्रचारात सध्यातरी तुमाने पुढे दिसत असले तरी ही तुल्यबळ लढत असेल," असं 'सकाळ' विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची नागपुरात सभा होणार आहे, त्या सभेकडून काँग्रेसच्या उमेदवारांना खूप आशा आहेत, असंही जानभोर सांगतात. पण दिल्लीतून स्टार प्रचारक आले तर स्थानिक नेतृत्वातला गुंता सुटणार का, हाही प्रश्न उरतोच.

शेतकऱ्यांचा राग युतीला नडणार?

रामटेक मतदारसंघात चौराई धरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असं 'ABP माझा'च्या सरिता कौशिक सांगतात. "मध्य प्रदेशातून चौराई धरणाचं पाणी नागपूर जिल्ह्यात येत होतं. पुरेसा पाऊस झाला नाही, म्हणून करारानुसार मध्य प्रदेशने नागपुरात पाणी सोडलं नाही. ही वेळ येणारच होती, पण त्यासाठी पर्यायी सोयच शासनाने केली नाही, म्हणून गेल्या वर्षभरापासून खूप गंभीर समस्या सुरू झाली आहे."

दोन राज्यांमधला हा मुद्दा मध्य प्रदेशात भाजप सरकार होतं, तेव्हापासूनचा आहे. त्यामुळे शेतकरी भाजप सरकारवरच नाराज आहेत. "रामटेकच्या शेतकऱ्यांची अवस्था राज्यातल्या इतर भागांमधल्या शेतकऱ्यांइतकीच वाईट होती. पण या वेगळ्या मानवनिर्मित समस्येमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे आणि हा मुद्दा शिवसेना-भाजपवर उलटू शकतो," अशी शक्यता कौशिक वर्तवतात.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना गजभिये सांगतात की, "मी उच्चशिक्षित आहे आणि मला प्रशासनाची संपूर्ण माहिती आहे, अनुभव आहे. त्याचा संपूर्ण फायदा मला होणार आहे. त्यामुळे मी लोकांचे प्रश्न अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडू शकतो. ते लोकसभेत आणि मंत्रालयात मांडू शकतो. माझे सहकारी शासनामध्ये सचिव आहेत, तर त्यांच्याकडून मी लोकांचे प्रश्न जलदगतीने सोडवू शकतो."

पण नागपूर शहरामध्ये नाना पटोले यांना तर रामटेक या ग्रामीण मतदारसंघातून गजभिये यांना तिकीट देण्यात काँग्रेसकडून गफलत झाल्याचं विश्लेषक सांगतात. "पटोले यांचं नागपुरात काम आहे का, जसं हे विचारलं जातंय, तसंच गजभियेंचं रामटेकमध्ये काय काम, असाही सूर उमटतोय," सरिता कौशिक सांगतात.

वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला?

या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात मागासवर्गीय जातीचे तसंच बहुजन मतदार बहुसंख्याक आहेत. म्हणून थेट लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी दिसत असली तरी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल, असं जाणकार सांगतात.

रामटेकमध्ये बहुजन समाज पक्षाकडून सुभाष गजभिये मैदानात आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे रिंगणात आहेत.

Image copyright Facebook / Krupal Balaji Tumane
प्रतिमा मथळा कृपाल तुमाने गेल्या पाच वर्षांपासून आपल्या मतदारसंघात खासदार म्हणून फिरत असल्याने ते प्रचारात पुढे दिसत आहेत.

"वंचित बहुजन आघाडी आणि बसप यांचा टार्गेट मतदार एकच आहे. साधारणतः तिसऱ्या स्थानी येणारा बहुजन समाज पक्ष मतं फोडण्याचं काम करतो. सोबतच ते स्वतःचं अस्तित्व आणि संख्याबळ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. 2014मध्ये मोदी लाटेत कृपाल तुमाने यांना मिळालेली मतं आता कमी होतील, अशी जरी काँग्रेसला आशा असली तरी ती फक्त काँग्रेसच्याच खात्यात जातील, असं नाही. या पक्षांची भूमिका इथेच महत्त्वाची ठरेल," असं सरिता कौशिक सांगतात.

'सकाळ'चे शैलेश पांडे यांनाही वाटतं की वंचित आघाडीला मतं जातील तर ती काँग्रेसच्याच खात्यातूनच जातील, त्यामुळे या आघाडीचा तोटा काँग्रेसला होऊ शकतो.

हे पाहिलंत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)