IPL 2019 - KXIP v DC: पंजाबविरुद्ध दिल्लीचा खेळ खल्लास, 8 रन्समध्ये 7 विकेट्स

दिल्ली कॅपिल्टल, किंग्ज इलेव्हन पंजाब Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सॅम करन

हातातोंडाशी आलेला विजय कसा गमवावा, याचं उदाहरण 'दिल्ली कॅपिल्टस'ने 'किंग्ज इलेव्हन पंजाब'विरुद्ध सादर केलं. 8 रन्समध्ये त्यांनी 7 विकेट्स गमावल्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने 14 धावांनी खळबळजनक विजय मिळवला.

167 धावांचा पाठलाग करताना दिल्लीने योग्य दिशेने आगेकूच केली होती. 16व्या षटकात दिल्लीचा संघ 137/3 असा सुस्थितीत होता. त्यांना 24 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. त्यांच्या हातात 7 विकेट्स होत्या.

मात्र दिल्लीने पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. शेवटच्या 17 चेंडूत 8 धावांमध्ये दिल्लीने 7 विकेट्स गमावल्या.

17व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने ऋषभ पंतला त्रिफळाचित केलं तर ख्रिस मॉरिस अश्विनच्या अचूक धावफेकीमुळे बाद झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेली ही जोडी माघारी परतल्याने दिल्लीची लय बिघडली.

18व्या ओव्हरमध्ये सॅम करनने कॉलिन इन्ग्राम आणि हर्षल पटेलला तंबूत धाडलं. 19व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने हनुमा विहारीला बाद केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रवीचंद्रन अश्विन

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कागिसो रबाडा आणि दुसऱ्या चेंडूवर संदीप लमाचीनेला बाद करत सॅमने ब्रोकन हॅट्ट्रिक साजरी केली आणि किंग्ज इलेव्हन पंजाबला सनसनाटी विजय मिळवून दिली. करनने 2.2 ओव्हरमध्ये 11 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 166 धावांची मजल मारली. डेव्हिड मिलरने 43 तर सर्फराझ खानने 39 धावा केल्या. मनदीप सिंगने 21 चेंडूत 29 धावांची खेळी केली. दिल्लीकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना शिखर धवन (30), श्रेयस अय्यर (28), ऋषभ पंत (39), कॉलिन इन्ग्राम (38) यांनी दिल्लीला विजयपथावर नेलं मात्र शेवटच्या षटकांमध्ये हाराकिरी केल्याने दिल्लीवर पराभवाची नामुष्की ओढवली.

सॅम करनला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)