हिंदुत्वाच्या विरोधकांना देशद्रोही ठरवलं जातं- नयनतारा सहगल #5मोठ्या बातम्या

साहित्य, हिंदू राष्ट्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही असं नयनतारा सहगल म्हणाल्या.

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात:

1. हिंदुत्वाच्या विरोधकांना देशद्रोही ठरवलं जातं- नयनतारा सहगल

प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे.

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं असं साहित्यिक नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त नयनतारा यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

"मतं मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे.सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे अशी आहे," त्या पुढे म्हणाल्या.

एकीकडे सगळ्यात मोठी लोकशाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची हे विसंगत आहे, असंही त्या म्हणाल्या.

2. जितेंद्र आव्हाड आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस

आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला. सकाळने ही बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी ही निवड केली असण्याची शक्यता आहे. आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासकीय रचनेत सरचिटणीसपद महत्त्वाचे मानले जाते.

3. भाजप नेत्याच्या घरावर धाड; 17 बॉम्बसह 116 काडतुसं जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी पोलिसांकडून छापेमाराची कारवाई केली. मध्य प्रदेशातले भाजप नेते संजय यादव यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 17 बॉम्ब, 13 पिस्तूलं, 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

पोलीस अधीक्षक यांगचेन डी.भुटिया यांच्या पथकाला ही माहिती मिळाली होती. संजय यादव यांच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

4. जेट एअरवेजची आणखी 15 विमानं जमिनीवर

कर्जाच्या गाळात रुतलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीची आणखी 15 विमानं सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जेटच्या विमानांची संख्या घटून वीस एवढी झाली आहे. मुंबईत मुख्य कार्यालय असलेल्या जेट एअरवेजने आतापर्यंत 54 विमानं सेवेतून बाद केली आहेत. देणी चुकती न केल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं जेटच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जेट एअरवेजने देणी चुकती न केल्याने 15 विमानं सेवेतून बाद केली आहेत.

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहेत. त्या निषेधात त्यांनी 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. कंपनीची देशांतर्गत 600 आणि 380 आंतरराष्ट्रीय उड्डाणं होत होती. पण आता ती निम्म्यावर आली आहेत.

5. भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना बेटिंगप्रकरणी अटक

भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना बडोदा इथे बेटिंग प्रकरणात कथित सहभागाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

सोमवारी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान बेटिंगप्रकरणी आरोठे यांच्यासह १८ जणांना अटक करण्यात आल्याचं बडोदा क्राईम ब्रँचचे उपायुक्त जे.एस. जडेजा यांनी सांगितलं.

बडोदा शहरातील शगुन एक्सोटिका इथून २१ मोबाईल्स, अनेक गाड्या तसंच प्रोजेक्टर ताब्यात घेण्यात आला आहे.

आरोठे यांनी संघातील वरिष्ठ खेळाडूंशी पटत नसल्याच्या कारणावरून गेल्या वर्षी जुलै महिन्यात महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या आरोठे यांनी एप्रिल २०१७ मध्ये पौर्णिमा राऊ यांनी पदभार सोडल्यानंतर प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. २००८ ते २०१२ या कालावधीतही ते भारतीय महिला संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)