भाजपनं किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं, शिवसेना-भाजपमध्ये एवढं सामंजस्य आलं तरी कुठून?

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Getty Images

किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारून भाजपनं शिवसेनेची साथ त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही दिवसांपूर्वीच कचाकचा भांडणारे हे पक्ष सर्वच कठीण मुद्द्यांवर सामोपचारानं जुळवून घेताना दिसत आहेत. त्याची कारणं काय आहेत?

आम्ही एकत्र आल्याचं पाहून काही लोकांच्या पोटात दुखतंय. पण त्यांच्या पोटदुखीचा इलाज माझ्याकडे आहे, अमित शहांकडे आहे आणि मुख्य म्हणजे मतदारांकडे आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या सभेत म्हटलं होतं.

भाजप अध्यक्ष अमित शहांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या सहकारी पक्षांचे नेते अहमदाबादमध्ये हजर झाले होते. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील होते. अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका करणाऱ्या शिवसेनेनं आपला पवित्रा बदलला.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की 'आम्ही प्रत्येकावर टीका करतो. जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा देखील सामनातून सरकारी धोरणांवर टीका व्हायची.'

काही महिन्यांपूर्वी झालेल्या टीकेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये म्हणाले की 'आम्ही फक्त एकमेकांच्या हातात हात घेतले नाहीत तर आमची मनं देखील जुळली आहेत.'

गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि भाजपने एकमेकांना नाराज न करण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसत आहे. जालन्यात अर्जुन खोतकर बंड करण्याच्या पवित्र्यात होते त्यांची समजूत उद्धव ठाकरे यांनी काढली.

त्यानंतर पालघरची जागा भाजपकडे होती. ती जागा भाजपने तर दिलीच पण त्याबरोबर आपला उमेदवार राजेंद्र गावित यांना देखील भाजपनं शिवसेनेला दिलं. त्या ठिकाणी श्रीनिवास वनगा हे बंडखोरी करतील अशी शक्यता होती, पण त्यांना विधीमंडळावर पाठवण्याचं वचन शिवसेना पक्षप्रमुखांनी देऊन संभाव्य बंडखोरी रोखली.

तर आता, शिवसेना नेतृत्वावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध होता.

खरंच दिलजमाई की पर्याय नाही?

शिवसेना आणि भाजप एकत्र आले की विरोधकांचं पोट दुखतं असं उद्धव ठाकरे म्हणतात पण तरी देखील हा प्रश्न उरतोच की शिवसेना-भाजप यांची खरंच दिलजमाई झाली आहे की एकमेकांशिवाय पर्याय नाही?

सोमय्यांचं तिकीट जाण्यामागे काय कारण असावं असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की शिवसेना नेतृत्वावर टीका केल्यामुळे त्यांची उमेदवारी गेली असावी.

फोटो स्रोत, Getty Images

"भारतीय जनता पक्षाने यावेळी शिवसेनेसमोर मान झुकवली असाच किरीट सोमय्यांच्या पत्ता कापण्याचा अर्थ काढावा लागेल," असं अकोलकर सांगतात.

"जेव्हा युती झाली त्यानंतर शिवसेनेनी जालना आणि पालघर या ठिकाणी नमती भूमिका घेतली. जालन्याला अर्जुन खोतकर हे बंडाच्या पवित्र्यात होते त्यांचं बंड शिवसेनेनं शांत केलं. तर पालघरला भाजपचाच उमेदवार त्यांना घ्यावा लागला."

"पण सोमय्यांनी थेट उद्धव यांच्यावरच टीका केली होती. ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हाच संदेश शिवसेनेनं दिला. शिवसेना नेतृत्वावर टीका केल्यामुळे शिवसैनिकांचा रोष सोमय्यांना ओढावून घ्यावा लागला," अकोलकर सांगतात.

'भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची'

"हिंदी भाषक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला आता पूर्वी इतक्या जागा मिळतील की नाही याबद्दल साशंकता वाटत आहे. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जास्त खासदार असणारं राज्य हे महाराष्ट्रच आहे. त्यामुळे राज्यातली प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. थेट मातोश्रीवरच टीका केल्याने सोमय्यांना तिकीट दिलं जाऊ नये अशी शिवसैनिक तसंच नेतृत्वाची इच्छा होती. त्यांच्या संतापामुळे ही जागा हातची जाईल, अशी भाजपला भीती वाटत असावी," अकोलकर सांगतात.

'शिवसेना नेतृत्वावर टीका खपवून घेतली जाणार नाही'

शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केल्यामुळेच सोमय्यांचं तिकीट कापलं गेलं असावं का, असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "किरीट सोमय्यांनी जी टीका केली होती ती शिवसेना नेतृत्वाला जिव्हारी लागली. भारतीय जनता पक्षाने सोमय्यांना सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंचं हृदय परिवर्तन करून पाहा. पण सोमय्यांना भेट नाकारण्यात आली.

भाजपनं शिवसेनेची अट मान्य का केली असावी असं विचारलं असता भिडे सांगतात, "शिवसेनेशी युती करणं ही भाजपची गरज आहे. कशाही परिस्थितीत त्यांना जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्याच आहेत. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेव्हा शिवसेनेच्या काही अटी त्यांना मान्य कराव्याच लागतील हे साहजिकच आहे. त्या त्यांनी मान्य केल्या."

'त्यांच्यात आघाडीत तर आपल्यात बिघाडी का?'

शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख अहमदाबादला गेले. युती व्हावी यासाठी जितके प्रयत्न भाजपने केले तितकेच प्रयत्न शिवसेनेनेदेखील केल्याचं दिसतं. याबाबत राही भिजे सांगतात, "शिवसेनेनी जो विरोध केला होता तो मुळातच युती व्हावी आणि त्यात शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठीच होता. जितकी युतीची गरज भाजपला होती तितकीच शिवसेनेला होती. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून दोन्ही पक्ष प्रयत्न करतच होते."

फोटो स्रोत, Twitter

"युतीची गरज तेव्हा जास्त वाढली जेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांच्यात आघाडी आणि आपल्यात बिघाडी कशासाठी असा प्रश्न देखील दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांना पडला असावा. यामुळे त्यांच्यात युती झाली," असं भिडे सांगतात.

दरम्यान, तिकीट नाकारल्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. पक्षाने मला संधी दिली होती आता त्यांनी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. ते माझ्या भावासारखेच आहेत.

तर मनोज कोटक यांनी असं म्हटलं आहे की सोमय्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादानेच मी ईशान्य मुंबईतून विजयी होऊन मतदारसंघाचा विकास साधला जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)