राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात हिंदू मतदार अधिक की मुस्लीम? : फॅक्ट चेक

राहुल आणि प्रियांका गांधी Image copyright ANI

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

गुरुवारी जेव्हा राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंका गांधींसह वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले त्यावेळी ट्विटरवर #RahulTharangam (राहुल लाट) हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

काँग्रेसने गेल्याच आठवड्यात राहुल गांधी उत्तर प्रदेशातील त्यांच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघाशिवाय केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवतील, अशी घोषणा केली होती.

अर्ज दाखल करण्याआधी राहुल गांधी म्हणाले, "मी दक्षिण भारताला हा संदेश देऊ इच्छित होतो की आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. याच कारणामुळे मी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून तीन वेळा खासदार झालेत. 2014 साली त्यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव करत ही जागा राखली होती.

Image copyright TWITTER/@INCINDIA

पक्षाच्या या निर्णयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दक्षिण भारतात पाया भक्कम करण्यासाठी राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतल्याचा दावा पक्षाने केला आहे.

मात्र सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने 'हा घाबरून घेतलेला निर्णय' असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी भाजपला घाबरून पळत असल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं.

Image copyright TWITTER/@INCINDIA

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी 'धर्माच्या आधारावर' जागा निवडल्याचा टोला लगावला होता आणि या निर्णयावर त्यांनी प्रश्नही उपस्थित केला होता.

उजव्या विचारसरणीच्या ट्विटर युजर्स आणि फेसबुक ग्रुपवरचे काही लोक मीडियातील बातम्यांच्या आधारे 'वायनाडमध्ये हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळेच राहुल गांधी तिथून निवडणूक लढवत आहेत', अशी माहिती पसरवत आहेत.

Image copyright SM VIRAL POST

मात्र सोशल मीडियावरच एक वर्ग असाही आहे, ज्यांना उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हा तर्क मान्य नाही. त्यांचे म्हणणं आहे की वायनाड लोकसभा मतदारसंघात मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांची संख्या हिंदूंहून कमी आहे.

याबाबत आम्ही सोशल मीडियावरील या दोन्ही बाजूंची सत्यता पडताळून पाहिली.

पहिला दावा : वायनाड मतदारसंघात हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे.

सत्य स्थिती : सोशल मीडियावर जे लोक वायनाड मतदारसंघात 50% हिंदू असल्याचे म्हणत आहेत ते खरंतर वायनाड जिल्ह्याच्या लोकसंख्येची आकडेवारी देत आहेत.

हे लोक वायनाड जिल्हा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघ यात फरक करत नाहीत.

Image copyright SM VIRAL POST
प्रतिमा मथळा या ट्वीटमधील लोकसंख्या ही वायनाड जिल्ह्याची

हे लोक गृहमंत्रालयाने 2011 सालच्या जनगणनेची जी माहिती दिली आहे ती शेअर करत आहेत.

या डेटानुसार वायनाड जिल्ह्यात हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

2011 सालापर्यंत वायनाड जिल्ह्यात 50% टक्के हिंदू तर 30% मुस्लीम होते.

Image copyright SM VIRAL POST

मात्र वायनाड जिल्ह्यातील लोकसंख्येला वायनाड लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या म्हणून दाखवण्यात आलं. हे चुकीचं आहे.

दुसरा दावा : वायनाडमध्ये मल्लापूरम जिल्ह्यामुळे मुस्लीम मतदारांची संख्या 50 टक्क्यांहून जास्त आहे.

हा दावा योग्य असल्याच्या पुराव्यादाखल सोशल मीडियावर बरेच नंबर शेअर करण्यात आले आहेत. यात वायनाड लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या 50 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान सांगण्यात आली आहे.

Image copyright SM VIRAL POST

वायनाड मतदारसंघात मुस्लीम बहुल मल्लापूरम जिल्ह्याचा बराचसा भाग येतो. त्यामुळे वायनाड मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फॅक्ट: 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात कोजीकोड, मल्लापूरम आणि वायनाड या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.

कोजीकोड जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकाच मतदारसंघाचं क्षेत्र वायनाड लोकसभा मतदारसंघात येतं.

वायनाड जिल्ह्यातले तीन विधानसभा मतदारसंघ या वायनाड लोकसभा मतदारसंघात येतात.

Image copyright ATUL LOKE/GETTY IMAGES

मल्लापूरम जिल्ह्यात 16 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील केवळ 3 विधानसभा मतदारसंघांचा वायनाड लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे.

2011 सालच्या जनगणनेत मल्लापूरम जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा खूप जास्त आढळली.

सरकारी आकडेवारीनुसार या जिल्ह्यात जवळपास 74% मुस्लीम तर जवळपास 24% हिंदू राहतात.

मात्र या मल्लापूरम जिल्ह्याचं केवळ एक चतुर्थांश क्षेत्रच वायनाड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

वायनाड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या तिन्ही जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या आहे 13,25,788.

नोंदणीकृत मतदारांची संख्या या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खूप कमी आहे.

केरळच्या निवडणूक आयोगानुसार वायनाड मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीनंतर जवळपास 75,000 नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे.

मात्र यातील हिंदू मतदार किती? आणि मुस्लीम मतदार किती? याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाकडे नाही.

'मतदारांच्या धर्माचा हिशेब नाही'

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, "2014 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघात नोंदणीकृत मतदारांची संख्या 12,47,326 होती. ती आता वाढली आहे."

Image copyright ATUL LOKE/GETTY IMAGES

मात्र यात किती हिंदू मतदार आणि किती मुस्लीम याचा निवडणूक आयोग हिशेब ठेवत नाही.

'दोघांची लोकसंख्या सारखीच'

'डेटा नेट' नामक एका खासगी वेबसाईटने धर्माच्या आधारावर भारतातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांचा डेटा तयार केला आहे.

डॉ. आर. के. ठकराल या वेबसाईटचे संचालक आहेत. त्यांनी 'इलेक्शन अॅटलास ऑफ इंडिया' हे पुस्तकदेखील लिहिलं आहे.

त्यांनी सांगितले की, 2001 आणि 2011 या वर्षांतील लोकसंख्येची आकडेवारी, भारत सरकारने 2008 साली मतदारसंघ पुनर्रचनेची प्रसिद्ध केलेली माहिती आणि ग्राम पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या आधारे हा डेटा तयार केला आहे.

Image copyright ATUL LOKE/GETTY IMAGES

ठकराल सांगतात की बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या या वायनाड लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिमांची संख्या जवळपास सारखीच आहे.

त्यांच्या अंदाजाप्रमाणे या लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम दोघेही 40-45 च्या दरम्यान आहेत आणि 15 टक्क्यांहून जास्त ख्रिश्चन समाजातील लोक आहेत.

(या खासगी वेबसाईटने दिलेल्या अंदाजे आकडेवारीची निवडणूक आयोग अधिकृतपणे पुष्टी करत नाही आणि बीबीसीनेदेखील स्वतंत्रपणे याची पडताळणी केलेली नाही.)

वायनाडमध्ये खरी लढत कोणामध्ये?

2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकल्यास वायनाडमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये लढत आहे.

वायनाड केरळच्या 20 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. 2009 साली एकूण सात विधानसभा मतदारसंघांना एकत्र करत हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला.

वायनाड मतदारसंघातील काही भाग तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेजवळ आहे.

वायनाड जिल्ह्यात केरळमधील सर्वाधिक वेगवेगळ्या जाती समुदायाचे लोक राहतात. यात 90 टक्क्यांहून जास्त ग्रामीण भाग आहे.

निवडणूक आयोगानुसार 2014च्या निवडणुकीत 9,14,222 मतं (73.29%) पडली. यातील 3,77,035 (41.20%) मतं काँग्रेस पक्षाला मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 3,56,165 (39.39%) मतं मिळाली होती.

2014 साली भाजपने देशातील इतर भागात उत्तम कामगिरी केली होती, त्यावेळी वायनाडमध्ये भाजपला जवळपास 80 हजार मतं मिळाली होती आणि पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)