आंतरराष्ट्रीय महिला दिन : तृप्ती धोडमिसे यांनी कुटुंब आणि नोकरी सांभाळून देशात 16वा क्रमांक असा पटकावला

  • रोहन नामजोशी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC तर्फे घेतल्या गेलेल्या 2018 सालच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण 759 उमेदवारांची विविध सेवांसांठी निवड करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशभरातून 16व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तृप्ती धोडमिसे यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.

तृप्ती मूळच्या पुण्याच्या आहेत. COEP महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 2010 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी L&T या कंपनीत काही वर्षं काम केलं.

नोकरी करता करताच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. MPSC च्या परीक्षेतून त्यांची सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर त्यांची निवड झाली.

या पदावर काम करताना त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचीही तयारी सुरू केली. एक वर्षांचं अंतर ठेवून त्यांनी UPSC च्या परीक्षांची तयारी सुरू केली. अनेक चढ उतारानंतर त्यांची आज सनदी सेवेत निवड झाली.

यशाची वारंवार हुलकावणी

पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा होते. स्पर्धा परीक्षेतल्या या प्रदीर्घ प्रवासाबद्दल त्या सांगतात, "पहिल्या प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा पास झाले नाही. दुसऱ्या प्रयत्नात मी मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र अंतिम यादीत माझी निवड झाली नाही, त्या अपयशातून मी सावरू शकले नाही, त्यामुळे माझा नीट अभ्यास झाला नाही त्यामुळे मी तिसऱ्या प्रयत्नात पूर्वपरीक्षेतच नापास झाले. चौथ्या प्रयत्नात शेवटी मला हे यश मिळालं."

आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं

वर उल्लेखलेला प्रवास वाचायला जरी सोपा असला तरी तो प्रत्यक्षात तितकाच अवघड होता. तरी या आव्हानांकडे तृप्ती यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिलं.

त्या म्हणतात, "मी त्यांना आव्हानं म्हणणार नाही खरंतर. त्यांचा मला फायदाच झाला. माझं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यात मी नोकरीही करत होते. त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका एकाचवेळी निभावत होते. त्याचा फायदा मला परीक्षांमध्येही झाला. मला अनेक अडचणी जवळून पाहता आल्या.

"आधी अभियांत्रिकी क्षेत्रात काम केल्यामुळे तिथल्या अडचणी, मग प्रशासनात काम करताना तिथल्या अडचणी, कौटुंबिक पातळीवरही अनेक गोष्टी नव्याने कळल्या. दोन्हीकडच्या कुटुंबांनी मला खूपच पाठिंबा दिला. विशेषत: अनेकदा अपयशाचा सामना केल्यावरही माझा नवरा ठामपणे माझ्या पाठिशी होता," तृप्ती सांगतात.

फोटो कॅप्शन,

युपीएससी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थिनी (प्रातिनिधिक छायाचित्र)

तिमिरातून तेजाकडे

तीन प्रयत्नांत वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळालेल्या अपयशाने खचून न जाता तृप्ती लढत राहिल्या.

"अपयश आलंय याचा अर्थ काही चूका होतात आपल्याकडून. 2015 मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा माझा नीट अभ्यासच झाला नव्हता, तरीही मी परीक्षा देऊन तो प्रयत्न वाया घालवला. दुसऱ्या प्रयत्नात मी योग्य अभ्यास केला तरी काही गोष्टींकडे नीट लक्ष दिलं नाही. ज्या गोष्टीत जास्त मार्क मिळतात त्यांच्याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. ते मी द्यायला हवं होतं. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या प्रयत्नातलं अपयश यामुळे मला खूप शिकायला मिळालं. खरंतर तेव्हापर्यंत मी फारसं अपयश पाहिलं नव्हतं," तृप्ती सांगतात.

"मात्र या काळात मला बरंच काही शिकायला मिळालं. ते स्वीकारलं. त्यानंतर काही काळ मी जरा ब्रेक घेतला. स्वत:कडे मी नीट बघायला शिकले. स्वत:ला स्थिर केलं. पुन्हा कामाला लागले. जे जे परीक्षेला लागतं तेच करायचं असं यावेळी ठरवलं होतं.

त्याला सकारात्मक वातावरणाची साथ मिळाली. महिलांना हल्ली असं वातावरण मिळत नाही. त्यातच मी स्वत: नोकरी करत असल्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते. अनेक गोष्टी माझ्या बाजूने असल्यामुळे माझ्याकडे गमावण्यासारखं फारसं काही नाही अशी भावना ठेवून मी अभ्यास करत होते," तृप्ती सांगतात.

अशी होती दिनचर्या

नोकरी करत असल्यामुळे सकाळी फक्त पेपर वाचणं, मग दिवसभर ऑफिस आणि मग संध्याकाळी अभ्यास अशी तृप्ती यांची दिनचर्या होती.

त्यांचे पती बऱ्याच कामात मदत करायचे. त्यांनी गेले दोन ते तीन वर्षं व्हॉट्स अप वापरलेलं नाही. फेसबुकपासूनही त्या दूर होत्या. ती परीक्षेची गरज होती असं त्या सांगतात.

"मी घरी टीव्हीही घेतलेला नाही. त्यामुळे आज माझं नाव कदाचित टीव्हीवर येतही असेल तरी मला ते पाहता येत नाहीये," तृप्ती हसत हसत सांगतात.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

काय करू नये?

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काय करू नये याविषयी तृप्ती सांगतात,

"मला असं वाटतं की संपूर्णपणे स्पर्धा परीक्षेवर अवलंबून न राहता एक प्लॅन बी कायम तयार ठेवावा. विशेषत: दोन-तीन वर्षं झाल्यानंतर मनासारखं पद नाही मिळालं तर हा प्लॅन बी कामास येतो. त्यामुळे एक मानसिक स्थिरता राहते. अभ्यास किती आणि कसा करायचा हे सगळीकडे उपलब्ध असलं तरी आपल्याला हव्या तितक्याच टीप्स घ्याव्यात. भारंभार सल्ले घेऊ नये. परीक्षेची नीट माहिती घ्या. परीक्षेसाठी काय हवं आहे ते नीट समजून घ्या."

निकालाचा आनंद आणि आता परीक्षेचा अभ्यास करावा लागणार नाही याचं समाधान त्यांच्या बोलण्यातून दिसत असलं तरी पुढे आव्हानं अधिक आहेत हे सांगायलाही तृप्ती विसरल्या नाहीत .

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)