राज ठाकरे आपलं बंद पडलेलं इंजिन दुसऱ्याला जोडायला पाहत आहेतः विनोद तावडेंची टीका

विनोद तावडे-राज ठाकरे

"राज ठाकरेंनी इतकी मेहनत स्वतःच्या पक्षासाठी घेतली असती, तर दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आज त्यांच्यावर आली नसती. तुमचं स्वतःचं इंजिन बंद पडलं आहे. ते आता दुसऱ्यांना लावून चालवायचा प्रयत्न तुम्ही करता आहात," असा टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी लगावला आहे.

गुढीपाडव्याला दादर इथं झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली होती.

राज यांच्या या भाषणावर माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं, "राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल इतका राग व्यक्त केला, की राहुल गांधींना पंतप्रधान करून बघू असं ते म्हणाले. ते देश खड्ड्यात तरी घालतील किंवा चालवतील. देश म्हणजे काय मनसे आहे का खड्ड्यात घालायला? सव्वाशे कोटीं लोकांचा हा देश आहे."

"ज्या संजय निरूपम यांनी राज ठाकरेंवर फेकू म्हणून टीका केली होती, मनसे कार्यकर्त्यांना त्या निरूपम यांना मतदान करायला सांगणार का," असा प्रश्नही विनोद तावडेंनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त हजारो मनसैनिकांना दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर संबोधित केलं.

'हे वर्ष सर्वांना वैभवशाली, संपन्नतेचं, सत्तेचं जावो' अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. याबरोबरच मोदीमुक्त भारत व्हावा अशा 'शुभेच्छा' त्यांनी दिल्या.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी देशाला घातक आहे. दुर्दैवाने काही बरं-वाईट झालं आणि ते निवडून आले तर ते निवडणुकाच बंद करून टाकतील. तुमच्यापर्यंत कुठल्याच गोष्टी पोहोचू दिल्या जाणार नाहीत. तुमची गळचेपी होईल. तुमचे लोकतांत्रिक अधिकार हिरावले जातील. जे पाच वर्षांत पत्रकारांना उत्तर देऊ शकले नाही तुम्हाला काय उत्तर देणार आहे असं ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. "राज ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या माणसाचे कार्यकर्ते टिकत नाहीत, नेते टिकत नाहीत त्या व्यक्तीच्या वक्तव्याला किती किंमत द्यायची याचं मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. त्यांनी केलेल्या वल्गना, त्यांनी केलेले आरोप हे 100 टक्के नाही तर 200 टक्के खोटे आहेत," असं भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.

मार्चमध्ये भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले होते की 2019 मध्ये निवडणुका झाल्यावर 2024 मध्ये पुन्हा निवडणुका होणार नाहीत. त्यावेळी देखील भाजपवर सोशल मीडियामध्ये टीका झाली होती.

'मोदी-शाह हे देशावरचं संकट'

राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे वापर करून घेत आहेत असं म्हटलं जातं पण कुणी वापर करून घेईल इतका मी वेडा नाही असं राज ठाकरे म्हणाले.

"देशावर अमित शाह आणि नरेंद्र मोदीं यांचं संकट आहे. ते टळावं यासाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी सर्व करेन असं राज ठाकरे म्हणाले. इंदिरा गांधी यांना बांग्लादेशच्या निर्मतीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी पाठिंबा दिला होता. आणीबाणीनंतर असंख्य काँग्रेस समर्थकांनी इंदिरा गांधीविरोधात मतदान केलं होतं. तर इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा जनता पक्षाच्या समर्थकांनी राजीव गांधींना मतदान केलं होतं. त्या त्या वेळी जी परिस्थिती असते ते पाहून निर्णय घ्यावे लागतात," असं ते म्हणाले.

ज्या ज्या वेळी देश संकटात आहे त्यावेळी वेगळा विचार करायला हवा, असं ठाकरे म्हणाले.

"जेव्हा केंद्रातून काँग्रेस जाते तेव्हाच त्या पक्षाचं महत्त्व कळतं. मोदींनी काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलली. बेसिक्स सेव्हिंग्स बॅंक डिपॉजिट अकाउंटचं नाव बदलून त्यांनी जन-धन-योजना ठेवण्यात आलं. बेटी बचाओ, बेटी पढाओ, प्रधानमंत्री आवास योजना या सर्व योजना आधी काँग्रेसच्याच होत्या. त्यांची नावे बदलली," असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी मोदींच्या दोन क्लिप्स दाखवल्या. पंतप्रधान होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर त्यांचे आधारकार्डबाबत परस्परविरोधी विचार होते असं ठाकरे म्हणाले.

"पंतप्रधान मोदी हे आधार कार्डाच्या विरोधात बोलत होते पण पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आधारकार्ड हे प्रत्येक योजनेसाठी आवश्यक बनवलं. जर तुम्हाला आधारकार्डाबाबत शंका होती तर ही योजना लागू कशी केली? हा प्रश्न मला मोदींना विचारावासा वाटतो," असं ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप महाराष्ट्रने प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचा आक्षेप हा आधारकार्डाला नव्हता तर बेकायदेशीर आधारकार्ड वाटपाला होता असं भाजपने म्हटलं आहे.

मुद्दे नसले की अशी गल्लत स्वाभाविक आहे अशा चिमटा भाजपने काढला आहे.

'हिटलरने देखील असंच केलं होतं'

अॅडॉल्फ हिटलर देखील लोकापर्यंत सत्य पोहोचू देत नव्हता असं ठाकरे म्हणाले.

" सध्या लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचू दिली जात नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही, पत्रकारांना धमकावलं जातं, प्रेसच्या मालकांना धमकावलं जात आहे. अॅडॉल्फ हिटलरनं देखील असंच केलं होतं. खरी परिस्थिती काय आहे हे तो कळूच देत नव्हता," असं ठाकरे म्हणाले.

हिटलरविरोधात जो कुणी बोलत असे त्याला देखील देशद्रोही म्हटलं जात असे. आता देखील भाजपला कुणी प्रश्न विचारला की सर्वांना देशद्रोही ठरवलं जातं.

जर तुम्ही सैन्याचा वापर निवडणुकांच्या प्रचारासाठी करणार असाल तर आम्ही तुम्हाला प्रश्न देखील विचारू नये का? असं ते म्हणाले.

'युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल असं मी म्हटलं होतं'

निवडणुका परत जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल असं मी म्हटलं होतं. अगदी त्याप्रमाणेच झालं. पुलवामात हल्ला झाला पण आरडीएक्स कुठून आलं याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं.

काश्मीरमध्ये मोदींनी मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. त्यांच्याशी हात मिळवणी करण्याची लाज तुम्हाला वाटली नाही का? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.

अमित शाहांनी सांगितलं होतं की एअर स्ट्राइकमध्ये 250 लोक मारले गेले. एअरफोर्सच्या प्रमुखांनी सांगितलं की आमच्याकडे आकडा नाही मग यांच्याकडे आकडा कुठून आला? असा प्रश्न त्यांनी विचारला.

गोरक्षेभोवती राजकारण फिरतं. पण भाजपच्या राज्यातच गाईंची स्थिती खराब आहे असं ठाकरे म्हणाले.

डिजिटल इंडियाची आजची स्थिती काय आहे? हे दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी 'हरिसाल' या डिजिटल गावाची फिल्म दाखवली. सरकारच्या 'मी लाभार्थी' या घोषणेवरही त्यांनी टीका केली.

मी लाभार्थी या जाहिरातीमध्ये काम केलेल्या युवकाची मुलाखत त्यांनी दाखवली. तो मुलगा हरिसाल येथे एक छोटं दुकान चालवतो. त्याच्या दुकानात पेटीएम किंवा स्वाइप मशीन नसल्याचं त्याने सांगितलं. ही फिल्म दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले 'भाजपचे दावे खोटे आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर तर देत नाहीत निदान भाजपने तरी द्यावीत.'

'राहुल गांधींकडूनही चांगल काम घडू शकतं'

"देशाचा पंतप्रधान राहुल गांधी झाले तर काय वाईट आहे? पंतप्रधान पदी कोण व्यक्ती बसणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा पर्याय तुमच्यासमोर कधीच नसतो. मोदींनी देश खड्ड्यात घातला आहे. यापेक्षा कोण काय वाईट करू शकेल असं ते म्हणाले. जर देशाच्या नशीबात असेल तर राहुल गांधीच्या हातून काही चांगलं घडेल," असं राज ठाकरे म्हणाले.

काँग्रेसविरोधी राज ठाकरे मोदीविरोधी का झाले?

राज ठाकरे हे आधी काँग्रेसविरोधी म्हणून ओळखले जात होते आता ते मोदीविरोधी का बनले असा प्रश्न पडतो. याचं उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला.

"आजपर्यंतचं 'ठाकरे राजकारण' हे काँग्रेस विरोधी म्हणून ओळखलं जायचं. पण यावेळी राज ठाकरे यांनी मोदीविरोधी भूमिका घ्यावी लागली आहे. कारण 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातला शहरी मतदार जो आधी राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंट आणि आश्वासनाने प्रभावित झाला होता तो मोदींकडे सरकला आहे," असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात. "दुसरं म्हणजे, भाजपला पराभूत करणं म्हणजे शिवसेनेला पराभूत करणं होय. असं केल्यानं मनसेपासून दुरावलेला शहरी मतदार परत वळवता येईल असं राज ठाकरे यांना वाटत असावं," असंही ते पुढं म्हणाले.

राज ठाकरे सडेतोड भाषण करतात. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला इतक्या प्रभावीपण विरोध करणं जमत नाही किंबहूना ते सार्वजनिकरित्या टाळतात. यामुळे ती जागा राज ठाकरे यांनी भरून काढली याचा फायदा येत्या निवडणुकित काँग्रेस, राष्ट्रवादीला नक्कीच होईल, असं प्रधान सांगतात. मोदींचा पराभव करणं हे ठाकरे आणि विरोधी पक्षांची गरज बनली आहे. असं झालं नाही तर महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करतील, असं प्रधान यांना वाटतं.

'पक्षातली गळती थांबण्यासाठी मोदीविरोध?'

राज ठाकरे यांच्या पक्षाची पडझड होत आहे ती थांबवण्यासाठी राज ठाकरे मोदीविरोध करत आहेत असं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना वाटतं.

"गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान झाल्यानंतरचे मोदी यातला विरोधाभास राज ठाकरे यांनी मांडला. मोदी बदलले म्हणूनच आपण त्यांचा विरोध करत आहोत, असं जरी ते म्हटले असले तरी यामागचं कारण वेगळं आहे. मनसेचे अनेक नगरसेवक, नेते पक्ष सोडून सेना भाजपमध्ये जात असल्याचं लक्षात आल्यावर राज ठाकरे यांनी मोदीविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली.

"पक्षाची पडझड होत असल्याचं दिसल्यावर राज ठाकरेंनी मनसेचा खरा शत्रू कळाला असावा. त्याचवेळी त्यांनी मोदींची स्तुती करण्याचं सोडून त्यांचा कडाडून विरोध करण्याचं ठरवलेलं दिसत आहे," असं दैनिक पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे सांगतात.राज ठाकरेंच्या मोदी विरोधाची दोन कारणं असू शकतात, एक म्हणजे स्व:तच्या पक्षाची पडझड थांबवणं आणि दुसरं म्हणजे येत्या निवडणुकीत लोकांना मनसेचा पर्याय उभा करणं, असं त्या पुढं सांगतात. मोदी परत निवडून आले तर परत देशात निवडणुका होणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. यावर भिडे सांगतात, "देशातली एकंदर परिस्थिती पाहिली तर लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो असं मत केवळ राज ठाकरे यांनीच नाहीतर अनेकजणांनी व्यक्त केलं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)