विजय माल्या यांची प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली : #5मोठ्याबातम्या

विजय मल्या Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. विजय माल्या यांचा अर्ज फेटाळला

लंडनमधल्या न्यायालयानं विजय माल्या यांची प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळून लावली आहे, यामुळे विजय माल्या यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी बातमी सकाळनं दिली आहे.

भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या यांनी दाखल केलेली याचिका इग्लंडमधील न्यायलयानं फेटाळली आहे.

भारतीय बँकांचे जवळपास 9हजार कोटी रुपये बुडवून विजय माल्या परदेशात गेले होते.

दरम्यान, सरकारी बँकांनी माझ्याकडून पैसे घ्यावे आणि आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर विजय माल्या यांनी दिली होती.

2. मनसे नाही तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मनसे नाही तर उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"राज ठाकरेंचा पक्ष आहे मनसे. आधी तो होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मग तो झाला मतदान नसलेली सेना आणि आता तो झालाय उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना. राज ठाकरे पूर्णपणे फस्ट्रेटेड आहेत. त्यांना कुणी सोबत घ्यायला तयार नाहीये. बटईवर जशी जमीन दिली जाते, तसं बटईचं काम चाललंय," असं ते म्हणाले आहेत.

Image copyright GETTY IMAGES/INDRANIL MUKHERJEE

मुख्यमंत्र्यांच्या या मतावर मनसे उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्हीच खरंच पारदर्शक असाल, तर व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेऊन दाखव्यात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

3. दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय - शरद पवार

दुसरा मोदी तयार होऊ नये, याची काळजी घेतोय, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright Matthew Lewis/GETTY IMAGES

नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो, असं विधान बारामतीत केलं होतं. त्याच वक्तव्याचा आधार घेत शरद पवारांनी म्हटलं की, "मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत आहे."

तर तप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी काँग्रेस सरकारच्या काळात काहीच झाले नाही, असं सांगत फिरतात. पण, गेल्या 5 वर्षांत त्यांनी काय दिवे लावले, हे सांगत नाहीत. नरेंद्र मोदी हे केवळ संकट नाही, तर राष्ट्रीय आपत्ती आहे, अशी घणाघाती टीका पवार यांनी अमरावतीतल्या सभेत केली आहे.

4. पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचं बिल एअर इंडियानं पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

मोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे.

मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे.

5. फेसबुक जाहिरातींवर भाजपचा सर्वाधिक खर्च

'फेसबुक अँड लायब्ररी'च्या अहवालानुसार, फेब्रुवारी ते 30 मार्च या कालावधीत 51,810 राजकीय जाहिरातींवर 10.32 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. द वायर हिंदीनं ही बातमी दिली आहे.

यामध्ये भाजप आणि भाजपच्या समर्थक संघटनांनी सर्वाधिक खर्च केला आहे.

या जाहिराती राजकारण आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांशी संबंधित होत्या, असं फेसबुकनं म्हटलं आहे.

या कालावधीत भाजपनं जवळपास 1,100 जाहिराती दिल्या आणि त्यासाठी 36.2 लाख रुपये खर्च केले. तर काँग्रेसनं 410 जाहिराती दिल्या आणि त्यासाठी 5.91 लाख रुपये खर्च केले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)