धोनीच्या एका ओरड्याचा चेन्नई सुपर किंग्सला फायदा, KKR वर 7 विकेट्सनी मात

दीपक चहर, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दीपक चहर

दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 विकेट्सनी मात केली.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. शनिवारी पंजाबविरुद्ध झालेल्या लढतीत बेशिस्त गोलंदाजीसाठी धोनी गोलंदाज दीपक चहरवर भडकला होता.

त्या सामन्यात दीपकने सर्फराज खानला दोन बीमर टाकले होते. धोनीच्या ओरडण्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी झालेल्या लढतीत पाहायला मिळाला. दीपकने 3 विकेट्स घेत या सामन्याचं चित्र पालटवून टाकलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा धोनीच्या ओरडण्याचा दीपकच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला.

चेन्नई सुपर किंग्स कोलकाताच्या आंद्रे रसेलचा झंझावात कसा रोखणार? अशी चर्चा सामन्यापूर्वी रंगली होती.

मात्र दीपक चहरने ख्रिस लिन, रॉबी उथप्पा आणि नितीश राणा यांना झटपट माघारी धाडले. दीपकला हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांची तोलामोलाची साथ मिळाली.

हरभजनने 15 धावांत 2, जडेजाने 17 धावांत 1 तर ताहीरने 21 धावांत 2 विकेट्स घेतल्या. दीपकने 20 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

हे करताना 20 निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रमही नावावर केला. एकामागोमाग एक सहकारी बाद होत असतानाही रसेलने 44 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 50 धावांची खेळी केली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनी

प्रत्युत्तरादाखल खेळताना फॅफ डू प्लेसिसच्या 43 धावांच्या बळावर चेन्नईने सहजपणे हे लक्ष्य गाठले. दीपक चहरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)