लोकसभा निवडणूक 2019: राज ठाकरे आणि पु.ल. देशपांडेंची तुलना ना.धो.महानोरांनी का केली?

ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी 2019च्या निवडणुकीची तुलना 1977 सालच्या निवडणुकीशी केली आहे. हे करत असतानाच त्यांनी 77 सालच्या पु.ल. देशपांडेंच्या भूमिकेशी 2019 सालच्या राज ठाकरेंशीही तुलना केली आहे.

ना.धों. महानोर यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं आहे:

व्यंग दाखवण्याची व सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका आल्या. आदरणीय पु.ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आपण करत आहात.

पण पु.ल. देशपांडेंनी 1977 साली नेमकं काय केलं होतं?

महानोर सांगतात, "आणीबाणी 1975 मध्ये लागू करण्यात आली होती. 1977 मध्ये निवडणुका झाल्या. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर प्रचंड प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. बोलण्यावर, लिहिण्यावर गदा आली होती. आम्ही करतो ते बरोबर, तुम्ही करता ते चुकीचं अशी सरसकट भूमिका इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. शेती आधारीत अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. सामान्य नागरिकांची फरफट होत होती."

ते पुढे सांगतात, "आणीबाणीनंतरच्या निवडणुकांवेळी पु.ल.देशपांडे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या भूमिकेवर झोड उठवली. त्यावेळी पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली."

आपल्या लेखणीने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या पुलंनी आणीबाणीनंतरच्या निवडणुकांवेळी काय भूमिका घेतली होती? त्यांनी अशी भूमिका का घ्यावी लागली?

महानोर सांगतात, "पु.ल.देशपांडे लेखक-कवी होते, संगीतकार, गायक, अभिनेते, दिग्दर्शक होते. पण या सगळ्यांपेक्षाही समाजसेवक, समाजसुधारक होते. त्यांनी जाहीर भाषणांमधून सरकारच्या दडपशाही वृत्तीविरोधात ठामपणे भूमिका घेतली. मी अमुक पक्षाचा नाही, असं ते सांगत. आपल्या व्यक्त होण्यावर निर्बंध आणणाऱ्या काँग्रेसला घरी बसवा असं ते सांगत. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांना अतोनात गर्दी होत असे. सामान्य माणसाला पु.लंच्या रूपात आपल्याला समजून घेणारा, प्रतिनिधित्व करणारा माणूस भेटला. या सगळ्याचा परिणाम निवडणुकांच्या निकालात दिसला. मात्र त्यानंतरच्या विजयी सभेला पु.ल उपस्थित राहिले नाहीत. कारण त्यांची विशिष्ट पक्षाशी बांधिलकी नव्हती."

'पुलंनी सामान्यांच्या वेदनांना शब्दबद्ध केलं'

आणीबाणीच्या काळात कऱ्हाडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. दुर्गाबाई भागवतांनी या संमेलनात आणीबाणीवर कडाडून टीका केली. पु.ल.देशपांडे यांनीही जोरदार टीकास्र सोडलं होतं. या संमेलनावेळी यशवंतराव चव्हाण समोर बसले होते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकांवेळी वेगळंच वातावरण होतं.

फोटो कॅप्शन,

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली होती.

राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षीं सांगतात, "पुलंचं बोलणं सर्वसामान्यांना आपलंसं वाटत असे. तोपर्यंत आणीबाणी म्हणजे लष्कराशी संबंधित काहीतरी आहे, असं लोकांना वाटे. आणीबाणीअंतर्गत बोलण्या-लिहिण्यावर निर्बंध येतात, हे पु.ल. देशपांडे यांच्या भाषणातून लोकांना समजलं. इंडियन एक्स्प्रेसने संपादकीयच्या माध्यमातून सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्यांविरोधात भूमिका घेतली होती. अमोल पालेकर यांनी रॅली काढली होती. दुर्गाबाई भागवतांनी टीका केली होती. श्रीराम लागूंनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याला पाठिंबा दिला. पु.ल.देशपांडेंनी लोकांच्या मनातील वेदना शब्दबद्ध केल्या. हे लोकांना भावण्याचं कारण म्हणजे पु.ल. हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संदर्भ जाणून होते. त्यांचे कोणतेही हितसंबंध नव्हते."

मूलभूत हक्क हे पॅकेज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कांचा एक भाग आहे. जेपी अर्थात जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी असलेल्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. जेलमध्येही समाजात काय होतंय याविषयी चर्चा व्हायची.

पु.लंनी ठाम भूमिका घेतली होती

आणीबाणीच्या काळात पु.ल.देशपांडे सक्रीय नव्हते. मात्र आणीबाणीनंतर झालेल्या निवडणूक प्रचाराच्या काळात पु.ल.देशपांडे यांनी ठामपणे भूमिका घेतली. पु.ल हे लोकप्रिय कलाकार होते. त्यांच्या भाषणांना गर्दी व्हायची. पण त्यांच्या भाषणांचा थेट परिणाम झाला असं वस्तुनिष्ठपणे सांगता येणार नाही. कारण त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला नाही मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फटका बसला.

फोटो कॅप्शन,

पु.ल.देशपांडे

पु.लंची भूमिका प्रामाणिक आणि उत्स्फूर्त

''पु.ल. देशपांडे हे राष्ट्र सेवा दलाशी संलग्न होते. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या स्वगत या पुस्तकाचा अनुवाद केला होता. ते पुरोगामी विचारांचे होते. ते राजकीय व्यासपीठांवरूनही बोलत असत. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात ते सामाजिक संस्थांच्या व्यासपीठावरून बोलत असत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निर्बंध लागू केले होते. त्यांच्या धोरणाविरोधात लढणाऱ्या विचारप्रवांहांचे ते प्रतिनिधी होते. मात्र तेव्हा जनता पक्षाची स्थापनाच झाली नव्हती. त्यामुळे पु.ल.देशपांडे राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नव्हते'', असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, ''आणीबाणीच्या काळात सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती. वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये सरकारी अधिकारी असे. सगळा मजकूर या अधिकाऱ्याने मंजुरी दिल्यानंतर छापण्यासाठी जात असे. या दडपशाहीविरोधात पु.लंनी आवाज उठवला होता. त्यांची भूमिका प्रामाणिक आणि उत्स्फूर्त होती''.

दरम्यान सद्य सरकारच्या ध्येयधोरणांवर राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि पु.ल.देशपांडे यांनी आणीबाणी पर्वादरम्यान घेतलेली भूमिका या दोन घटनांना एकच फूटपट्टी लावणं योग्य नसल्याचं राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)