कमलनाथ यांच्या अधिकाऱ्याच्या घरात नेमकी किती रक्कम मिळाली?

कमलनाथ Image copyright AFP

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कक्कड यांच्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे.

प्राप्तिकर विभागाने त्यांच्या इंदुरच्या घरी सात एप्रिलला धाड टाकली. कक्कड यांनी बीबीसीला सांगितलं की तेव्हा त्यांचं कुटुंब झोपलं होतं. त्याचवेळी आयकर विभागाचे दोन अधिकारी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले.

प्राप्तिकर विभागाच्या धाडीनंतर विरोधीपक्ष भाजप आक्रमक झाला त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचा आरोप लावला. मग प्रश्न असा आहे की प्रवीण कक्कड यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाला मिळालं तरी काय?

आठ एप्रिलला नऊ वाजून तेवीस मिनिटांनी प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून सांगितलं, "मध्यप्रदेशात झालेल्या छापेमारीमुळे अवैध प्रकरणं समोर आली आहेत. राजकारण, व्यापार शासकीय सेवा यांच्याशी निगडीत अनेक व्यक्तींकडून 281 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्या पैशांचा काहीही हिशेब नाही.

यात मजेशीर बाब ही आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले, "मध्य प्रदेशातून तबादला एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झाली आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र त्यात 281 कोटींचं नुकसान झालं.

विजयवर्गीय यांच्या वक्तव्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत निवेदनाआधीच कैलाश विजयवर्गीय यांना हा आकडा कळला तरी कसा? ही धाड सरकारच्या इशाऱ्यावरून टाकण्यात आली आहे हे स्पष्ट झालं आहे असा आरोप काँग्रेसने लावला आहे.

Image copyright Twitter

प्रवीण कक्कड यांच्या घरून मग अधिकारी नेमकं काय घेऊन गेले या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणतात, " ते माझ्या घरून काहीही घेऊन गेलेले नाहीत. त्यांना पैसे मिळाले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे दागिने मिळाले नाहीत. जे दागिने सापडले त्यांचा हिशेब होता. आमच्याकडे काहीही बेहिशेबी नाही. आम्ही त्याबदद्ल सगळी कागदपत्रं तपासली आहेत.

कक्कड यांना अपमानित करण्यासाठीच आयकर विभागाने त्यांच्या घरावर छापे मारले आहेत आणि त्यामागे राजकारण आहे, अशा आशयाची याचिका त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कक्कड यांची ही याचिका कोर्टाने स्वीकारली आहे आणि त्यांच्या वतीने काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल कोर्टात हा खटला लढवणार आहे.

प्रवीण कक्कड यांच्या मुलाचा मध्य प्रदेशात मोठा व्यापार आहे. ते सुरक्षा रक्षक, पर्यटन आणि कंप्युटरच्या व्यापारांशी निगडीत आहेत. मालमत्तेच्या व्यापारातूनही त्यांनी बराच पैसा कमावला आहे. प्राप्तिकर विभागाच्या इंदुर विभागाने सगळ्यांत जास्त प्राप्तिकर भरला म्हणून त्यांचा सत्कारही केला आहे.

काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी सांगतात की, कक्कड यांच्याकडे त्यांच्या संपत्तीचा पूर्ण हिशेब आहे. ते सांगतात, "प्रवीण कक्कड यांनी सगळी कागदपत्रं दाखवली आहेत. त्यात काहीही अवैध नाही. मग भाजपने धाडीत मिळालेली रक्कम कशी जाहीर केली? त्यावरून या धाडीमागे राजकारण आहे हे सिद्ध होतं. जर प्राप्तिकर विभागानेच त्यांचा सत्कार केला आहे तर मग आता त्यांच्यावर ही वेळ का यावी?"

कैलाश विजयवर्गीय यांनी आधीच कसं ट्वीट केलं या प्रश्नाच्या उत्तराला भाजपचे प्रवक्ते दीपक विजयवर्गीय यांनी बगल दिली. "कोणी आधी काय ट्वीट केलं हे महत्त्वाचं नाही. वाहतुकीच्या क्षेत्रात लूट कशी आली? जप्त झालेले हे पैसे कुठून आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे."

या प्रकरणात अश्विन शर्मा यांचंही नाव आलं आहे. शर्मा यांच्या घरी भोपाळमध्ये प्राप्तिकर विभागाने छापा मारला. ते भाजपचे निकटवर्तीय आहे. भोपाळचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. राकेश पाठक सांगतात की, अश्विन शर्मा यांच्यानंतर भाजप बॅकफूटवर गेली आहे.

पाठक सांगतात, "अश्विन शर्मा यांना शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये अनेक कंत्राटं मिळाली. त्यांच्या संस्थेला शिवराज सरकारने खूप काम दिलं होतं. त्यांच्या काळात शर्मा यांची बरीच उन्नती झाली. निवडणुकीच्या वेळी या छाप्याच्या मागे राजकारण आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार नाही. प्रवीण कक्कड यांच्याविषयी बोलायचं झाल्यास गेल्या तीन महिन्यात ते श्रीमंत झालेले नाही. गेली 15 वर्षं भाजपचं सरकार होतं आणि कक्कड यांच्या मुलाचा कारभार सुरू होताच."

Image copyright Twitter

प्रवीण कक्कड यांच्यामते त्यांचा व्यापार शिवराज यांच्या काळात सुरू झाला होता. अश्विन शर्मा भाजपशी लागेबांधे असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला आहे.

पीटीआयच्या मते निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. विरोधी पक्षांनी भाजपची तक्रार केली आहे. निवडणूक आयोगानेही छापे टाकण्याच्या आधी सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवीण कक्कड कोण आहेत?

कक्कड मध्य प्रदेशातील माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी प्रादेशिक वाहतूक विभागात काम केलं आहे. तिथे त्यांनी बराच पैसा कमावला असा आरोप मध्य प्रदेशचं राजकारण जवळून पाहणारे लावतात. याआधी ते UPA च्या काळातील मंत्री कांतिलाल भूरिया यांचे विशेष कार्यकारी अधिकारी होते.

कांतिलाल भूरिया यांचे OSD असताना जमिनीच्या अनेक करारांमध्ये त्यांचा समावेश होता. नोटाबंदीच्या काळात त्यांनी 80 लाख कमावल्याचं सांगितलं जातं. तेव्हापासून त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाची नजर होती.

प्रवीण कक्कड आणि अश्विन शर्मा यांचा काय संबंध आहे? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणतात की ते अश्विन शर्मा यांना फक्त ओळखतात.

एक प्रश्न असा आहे की प्राप्तिकर विभाग CRPF ला का घेऊन आले? भोपाळचे ज्येष्ठ पत्रकार विजय दत्त श्रीधर म्हणतात, "प्राप्तिकर विभागाने राज्य पोलिसांची मदत घ्यायला हवी होती. हा संघराज्याच्या प्रणालीचा सन्मान नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)