IPL : धोनीचं नोबॉलसाठी अंपायरशी भांडणं आणि चेन्नई सुपर किंग्जचा थरारक विजय

धोनी Image copyright AFP

IPLच्या इतिहासात असे अनेक किस्से घडले आहेत, ज्या वर पूर्ण पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये जे घडलं ते मात्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.

या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला चार विकेटनी हरवलं.

चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य होतं. जे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 58 आणि अंबाती रायडूच्या 57 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पूर्ण केलं. शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना सेंटनरने बेन टोक्सच्या बॉलवर षटकार खेचत विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं.

तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने बॅटिंग करताना 20 षटकांत 151 धावा केल्या. त्यात बेन स्टोक्सच्या 28 आणि जोस बटलरच्या 23 धावांचा समावेश आहे.

खेळात यशापयश सुरूच असतं. पण खरी गोष्ट तर शेवटच्या षटकात घडली ज्यामध्ये विजयासाठी चेन्नईला 18 धावांची गरज होती.

19 ओव्हरनंतर चेन्नईची धावसंख्या पाच विकेटवर 134 होती. क्रीजवर रवींद्र जेडजा आणि धोनी होते.

प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष सुरू होतो आणि राजस्थानचा कर्णधार अंजिक्य रहाणेने चेंडू बेन स्टोक्सच्या हाती सोपवला.

बेन स्टोक्सने दीर्घ रनअप घेत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला. जडेजाने मोठा बॅक लिफ्ट घेत हा बॉल थेट बाऊंड्रीच्या बाहेर फटकावला. हा स्ट्रोक खेळताना जडेजाचं संतुलन बिघडलं आणि तो पिचवर पडला. तर दुसरीकडे बाऊंड्रीच्या बाहेर जाणारा चेंडू बेन स्टोक्स पाहातच राहिला.

बेन स्टोक्सच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेतली. पण हा नोबॉल ठरला. पुढच्या चेंडूवर धोनीने फ्री हीटवर दोन धावा घेतल्या.

पण 3 बॉल यॉर्कर टाकत बेन स्टोक्सने धोनीची मधील स्टंप उडवली. 43 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत धोनीने 58 धावा केल्या होत्या. धोनीच्या विकेटमुळे राजस्थान समर्थकांत उत्साह संचारला होता.

पण IPLच्या इतिहासातील एक मोठा ड्रामा अजून घडणार होता. चौथ्या बॉलवर मिशेल सेंटनरने 2 धावा घेतल्या होत्या. यानंतर धोनी आणि अंपायर यांच्यात वाद झाला. हा चेंडू सेंटनरच्या कंबरेइतक्या उंचीने उसळला होता. अंपायरने हा नोबॉल ठरवला होता, पण नंतर हा निर्णय मागे घेतला.

Image copyright Getty Images

निर्णय मागे घेतल्यानंतर चेन्नईच्या डगआऊटमध्ये उभा असलेला धोनी तडक मैदानात आला.

कॅप्टन कुल अशी प्रतिमा असलेल्या धोनीचं हे रूप सर्वांनाच चकित करणारं होतं. समालोचकांसाठीही यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं.

शाब्दिक वादावादीनंतर अंपायरने हा निर्णय बदलला नाही आणि धोनी मैदानातून निघून आला.

शेवटचे 2 चेंडू बाकी होते आणि चेन्नईला विजयासाठी 6 धावा हव्या होत्या.

पुढचा चेंडू बेन स्टोक्सने ऑफ स्टंपच्या इतका बाहेर टाकला की सेंटनरने झोपून जरी हा चेंडू खेळायचं ठरवलं असतं तर ते शक्य झालं नसतं. चेन्नईला यामुळं एक अतिरिक्त चेंडू आणि एक धाव मिळाली. राजस्थानाचा संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. बेन स्टोक्सच्या एका चुकीमुळे मैदानावर शांतता पसरली.

शेवटच्या चेंडूवर चेन्नईला 4 धावांची गरज असताना सेंटनरने षटकार खेचला आणि चेन्नईने विजयाची नोंद केली. सेंटनरने 10 आणि जडेजाने 9 धावा केल्या.

या विजयानंतर चेन्नईचे खेळाडू सेंटनर आणि जडेजाला खांद्यावर घेण्यासाठी मैदानात धावले. तर जयपूरचा गुलाबी रंग मात्र पार उडून गेला.

या सामन्यानंतर बऱ्याच चर्चा होतील. धोनी त्याचा संयम गमावत आहे का आणि त्याच्या शालीनतेपासून दूर जात आहे का? असे प्रश्न विचारले जातील.

Image copyright Getty Images

समीक्षक विजय लोकपल्ली म्हणाले, "धोनीने मैदानात जाऊन खेळ थांबवावा अशी अपेक्षा नव्हती. मैदानात जो निर्णय झाला तो अंपायरचा होता. स्केअर लेग्ज अंपायरला असं वाटलं की स्टोक्सचा चेंडू कंबरेखाली होता. तसंही सेंटरने हा बॉल सरळ खेळला होता."

इथं असं वाटतं की धोनीने स्वतःवरील नियंत्रण गमावलं. धोनी थकला होता आणि त्याला नीट खेळता येत नव्हतं, हे दिसत होतं. धोनी समोर फिटनेसची समस्या असावी, असं स्पष्ट दिसत होतं. लोकपल्ली सांगतात धोनीची ही कृती चांगलं उदाहरण ठेऊ शकत नाही.

अर्थात धोनीनं हे मात्र पुन्हा दाखवून दिलं की सामना जिंकण्यात आणि जवळपास हारलेला सामन्याला विजयापर्यंत पोहोचवण्यात त्याची बरोबरी अजून तरी कुणी करू शकत नाही.

या विजयानंतर चेन्नई 6 विजय आणि एका पराभवासह 12 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)