लोकसभा 2019: सोशल मीडियामुळे तरुणांच्या मतदानावर कसा परिणाम होतो?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - सोशल मीडियामुळे तरुणांच्या मतदानावर कसा परिणाम होतो?

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष सोशल मीडियावरून प्रचार करताना दिसून येत आहेत.

भारतीय जनता पक्षाने तर यासाठी 9 लाख 'सेल फोन प्रमुखां'ची फौज तैनात केली आहे, तर काँग्रेसनं त्यांच्या कार्यांची माहिती शेअर करण्यावर भर दिला आहे. पण या सोशल मीडियावरच्या प्रचाराचा तरुणांच्या मतदानावर परिणाम होतो का? तो कसा आणि किती होतो? हे समजून घेण्यासाठी आम्ही 4 एप्रिलला (गुरुवार) लातूर जिल्ह्यातील मोहनाळ गाव गाठलं.

इथल्या धनंजय मुंडेला आम्ही भेटलो. 27 वर्षांचा धनंजय सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. पण त्यामुळे तो काही स्वतःला पुस्तकांच्या समुद्रात बुडवून घेतोय, असं नाही. धनंजय बऱ्यापैकी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं सांगतो.

प्रतिमा मथळा मोहनाळ येथील तरुण मतदार

सकाळी झोपेतून उठल्याउठल्या तो मोबाईल हातात घेतो आणि इंटरनेट ऑन केलं. सगळ्यात आधी तो व्हॉट्सअॅपवरील मेसेजेस 'चेक' करतो आणि मग फेसबुकवरचे नोटिफिकेशन्स पाहतो. ते एक-एक क्लिअर केल्यावरच तो बेडवरून उठतो आणि ब्रश हातात घेऊन बाकीचं आवरायला सुरुवात करतो.

आपल्यापैकी अनेकांचं आयुष्य बहुदा असंच असावं. पण सर्वांचे सकाळचे मेसेजस, नोटिफिकेशन्स वेगवेगळे असू शकतात.

काय होते धनंजयला आलेले मेसेज?

धनंजयला सकाळीच व्हॉट्सअॅपवर एक व्हीडिओ आला. त्याविषयी तो सांगतो, "सकाळी उठून व्हॉट्सअॅप चेक केलं, तेव्हा शरद पवारांचा एक व्हीडिओ आला होता. 1993 सालचा तो व्हीडिओ होता. किल्लारी भूकंपाच्या वेळी शरद पवारांनी कसं काम केलं, हे त्या व्हीडिओत सांगण्यात आलं आहे."

प्रतिमा मथळा व्हॉट्सअप मेसेज

यानंतर त्याला अजून एक मेसेज व्हॉट्सअॅपवर आला. या मेसेजमध्ये लातूरच्या लोकसभा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची तुलना करण्यात आली होती.

या मेसेजेसविषयी धनंजय सांगतो, "भाजपचे सुधाकर शृंगारे दहावी पास आहेत तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत पदवी पास आहे, हे सांगणारा एक मेसेज आला आहे. विरोधक मुद्दामहून शृंगारे यांना टार्गेट आहेत, असं त्यात म्हटलं आहे."

लातूर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान आहे.

प्रतिमा मथळा धनंजय मुंडे

धनंजय हे सांगत असतानाच त्याच्याशेजारी बसलेल्या मनमोहन मुंडेनं व्हॉट्सअॅप ऑन केलं आणि तो सांगू लागला, "मला सकाळीच ABP न्यूज चॅनेलचा लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे आला आहे. यात महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला, किती जागा मिळणार, हे सांगितलं आहे."

26 वर्षांचा मनमोहन सध्या शेती करतो. पण दिवसभरात अनेकदा, अगदी तासातासाला व्हॉट्सअॅप चेक करत असतो, असं तो सांगतो.

त्याच्यासारख्याच आणखी काही 10-12 तरुणांना आम्ही गावाच्या पारावर भेटलो. यातील बहुतेक जण मोबाईलवर काहीतरी पाहत होते.

'नेत्यांना फॉलो करतो कारण...'

लोकसभेचे उमेदवार सोशल मीडियावर आहेत का, यावर धनंजयनं म्हणाला, "उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी दोघांनाही फेसबुकवर सर्च केलं. त्यात सुधाकर शृंगारे फेसबुकवर असल्याचं दिसलं. पण कामत यांचं अकाउंट दिसलं नाही."

दरम्यान, फेसबुकवर सुधाकर शृंगारे या नावानं एक फेसबुक अकाऊंट असून त्यावर शेवटची पोस्ट 19 नोव्हेंबर 2018ची दिसली. या व्यतिरिक्त 'भावी खासदार सुधाकर शृंगारे' या नावानं एक अकाऊंट फेसबुकवर आहे. ट्विटरवर मात्र त्यांचं अकाऊंट सापडलं नाही. पण या सर्व अकाऊंट्सपैकी कोणते अधिकृत आहेत, ते कळायला मार्ग नाही.

प्रतिमा मथळा मोहनाळ गावातील तरुण

'मच्छिंद्र जी. कामत' या नावानं एक फेसबुक अकाऊंट असून त्याला 545 फॉलोअर्स आहेत. याच नावानं एक फेसबुक पेज असून त्याला 5,081 फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही 'मच्छिंद्र कामत' नावाचं अकाऊंट असून त्याला 37 फॉलोअर्स आहेत.

स्थानिक नेत्यांव्यतिरिक्त कुणाकुणाला फॉलो करता, असं विचारल्यानंतर या गटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नवनियुक्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या मोठ्या नेत्यांची नावं पुढे आली. काही जणांनी तर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, मनसे या पक्षांचे अकाऊंटसुद्धा फॉलो करत असल्याचं सांगितलं.

प्रतिमा मथळा मनमोहन मुंडे

राजकारण्यांना सोशल मीडियावर कशासाठी फॉलो करता, यावर मनमोहन म्हणाला, "राजकारण्यांचं नेमकं काय चाललंय, हे समजायला पाहिजे म्हणून फॉलो करतो. त्यांचे दौरे, त्यांनी केलेली कामं त्या माध्यमातून समजतात.

"शिवाय प्रत्येकच नेत्याच्या सभेला जाणं काही आम्हाला शक्य नाही. तितका पैसा आणि वेळही नसतो. मग सोशल मीडियावर सगळ्याच नेत्यांच्या सभा पाहायला मिळतात आणि त्यांची मतं कळतात," तो सांगतात.

पण मग ही मंडळी सोशल मीडियावर जे काही शेअर करतात, ते तुम्हाला पटतं का?

मनमोहन म्हणाला, "सगळंच पटतं असं अजिबात नाही. पण समजा एखाद्या जवळच्या आणि जबाबदार माणसानं ती माहिती शेअर केली असेल तर त्यावर विश्वास बसतो. शिवाय सध्या न्यूज चॅनेलनं पण दररोज रात्री रिअॅलिटी चेकचे शो सुरू केले आहेत. त्यामुळे मग ती माहिती खरी आहे की खोटी, हे कळतं."

एखाद्या माहितीवर तुम्ही कसं रिअॅक्ट करता, यावर तो सांगतो, "एकदा विश्वास बसला की ती पोस्ट फेसबुकवर असेल तर त्याला लाईक आणि कमेंट करतो. कधीकधी शेअरही करतो. व्हॉट्सअॅपला पुढच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करतो."

प्रश्न वेगळे, प्रचार वेगळ्याच मुद्द्यावर

आमची ही चर्चा सुरू असताना तिथं उपस्थित इतर तरुण मंडळी आपापल्या फोनमध्ये बुडाली होती. तरुण म्हणून तुमचे काय प्रश्न आहेत, असं विचारल्यावर त्यांच्यापैकी एक जण नुसताच हसला आणि पुन्हा फोन बघण्यात गुंग झाला.

आमच्या या प्रश्नाचं उत्तर मनमोहननं दिलं. तो म्हणाला, "तरुणांना रोजगार मिळायला हवा. सरकार सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नसेल, पण कुठे ना कुठे पोरांच्या हाताला कामं मिळायला हवी. सरकारनं शेतकऱ्यांचा कणा मजबूत करायला हवा. आता आमच्याच गावात 30 ते 40 जण उच्चशिक्षित आहेत, पण नोकऱ्या नाहीत. यंदा दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत या पोरांनी करायचं काय?"

प्रतिमा मथळा गावातील महिलांना पाण्यासाठी आडावर कसरत करावी लागत असल्याचं दिसून आलं.

तरुणांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, असं बोलल्यावर धनंजय म्हणाला, "खरं तर दिल्लीमधून निघणारी योजना जशीच्या तशी आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. राजीव गांधी म्हणायचे, 1 रुपयाची योजना दिल्लीतून निघाली, की गरजू माणसापर्यंत फक्त 10 पैसे पोहोचतात. असं नको व्हायला."

तेव्हा बोलता बोलता महादेव म्हस्के नावाच्या एका तरुणानं एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. "आमच्या गावात 30 ते 40 तरुण पोरं आहेत. सगळ्यांचं वय तीसच्या आसपास असेल. अहो, यांना पोरी देई ना हो कुणी! कुणालाच शेतकरी नवरा नकोय! सगळ्यांना वाटतं सर्व्हिसवाला भेटला की, 1 तारखेला पैसे अकाऊंटला जमा होतात.

"इथं शेतकऱ्याच्या शेतात केव्हा पिकावं आणि त्याला केव्हा भाव मिळावं, असा लोक विचार करतात. त्यामुळे या पोरांना काम मिळायला पाहिजे. शेतकरी सर्व्हिसवाल्यापेक्षा चांगलं कमावता असला तरी लोक पोरी द्यायला तयार नाहीत. या मानसिकतेत बदल व्हायला हवा बघा," असं महादेव पोटतिडीकीनं म्हणाला.

प्रतिमा मथळा मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ज्या नेत्यांना तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करता, ते नेते सोशल मीडियाच्या प्रचारात रोजगार आणि लग्न अशा तुमच्या मुद्द्यांवर काही बोलतात का, असं विचारल्यावर मनमोहन सांगतात, "या मुद्द्यावर कुणीच प्रचार करत नाही, कारण हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.

"खरंतर न्यूजवाल्यांनी गावागावात येऊन हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. गावातल्या पोरांना रोजगार कसा मिळेल, हे दाखवलं पाहिजे."

पण मग असं असेल तर सोशल मीडियावरील प्रचारामुळे मतदान कुणाला द्यायचं हे ठरवता का, यावर मनमोहन म्हणाला, "सोशल मीडियावरच्या प्रचारामुळे आम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचं म्हणणं काय आहे, हे कळतं. काँग्रेसनं 60 वर्षांत काय केलं आणि भाजपनं 5 वर्षांत काय केलं, हे कळतं. यावरून आम्ही या दोघांच्या कामगिरीची तुलना करतो आणि मग मतदान कुणाला करायचं हे ठरवतो."

मोहनाळची लोकसंख्या एक हजारांहून अधिक असून पात्र मतदारांची संख्या 800 च्या आसपास आहे.

9 वाजता सुरू झालेली आमची चर्चा दुपारी 12च्या सुमारास संपली.

यानंतर आमची भेट लातूर जिल्ह्यातल्या जानवळ गावच्या प्रवीण साबणे या तरुणाशी झाली. 22 वर्षांचा प्रवीण 10वी पास आहे. व्हॉट्सअॅप जास्त वापरतो तसंच सध्या जवळपास 15 व्हॉट्सअप ग्रूपमध्ये असल्याचं तो सांगतो.

'आमचं काम जो करेल त्याला मतदान'

मतदानाविषयी तो सांगतो, "सध्या व्हॉट्सअॅपवर 'याला मतदान द्या, त्याला मतदान द्या' असे मेसेज फिरतात. मी ते फक्त बघतो. ना कुणाला पाठवतो, ना त्याच्यावर काही लिहितो.

"खरं तर या निवडणुकीत आमच्या गावानं मतदान न करायचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलला आमच्या गावात तशी सभा घेण्यात आली. जोवर आमच्या खात्यात पीकविम्याचे पैसे जमा होत नाहीत, तोवर लोकसभेत काय, कोणत्याच निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय गावानं घेतला आहे."

"आमच्या तीन भावंडांकडे मिळून 12 एकर जमीन आहे. सरकार पीक विम्याला हेक्टरी 18 हजार रुपये देणार आहे, म्हणजे आमचे पीकविम्याचे जवळपास 56,000 रुपये पेंडिंग आहे," तो पुढे सांगतो.

प्रतिमा मथळा प्रवीण साबणे

प्रवीण या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्याचं मतदान कार्डही आलं आहे. पण या परिस्थितीमुळे पहिलंच मतदान तो करेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आमच्या पीकविम्याचे पैसे जो देईल, त्यालाच मतदान करू, असं तो म्हणतो.

जानवळची लोकसंख्या 16 हजार असून त्यापैकी गावात 12 हजार मतदार आहे.

सोशल मीडियावरच्या प्रचारासाठी पक्षांची तयारी

भारतात जवळपास 30 कोटी फेसबुक तर 20 कोटी व्हॉट्सअप यूजर्स आहेत. या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत.

'फेसबुक अँड लायब्ररी'च्या अहवालानुसार, यंदा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान फेसबुकवरच्या जाहिरातींवर राजकीय पक्षांनी 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. यात भाजपनं 1,100 जाहिरातींसाठी 36.2 लाख रुपये, तर काँग्रेसनं 410 जाहिरातींसाठी 5.91 लाख रुपये खर्च केले आहेत.

Image copyright YUI MOK

भाजपनं व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी 9 लाख 'सेल फोन प्रमुखां'ना मैदानात उतरवलं आहे. देशात 10 लाख मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रासाठी जवळपास एक 'सेल फोन प्रमुख' नेमण्यात आला आहे. भाजपशी संबंधित टेक्स्ट, व्हीडिओ, ऑडिओ, ग्राफिक्स मेसेज स्थानिक मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

तर काँग्रेस पक्षाचा भर फेसबुकवर माहिती अपलोड करणं आणि नंतर ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवणं, यावर असणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)