'दिल' आणि 'दोस्ती'नंतर सखी आणि सुव्रतची 'दुनियादारी' सुरू

सखी आणि सुव्रत Image copyright Facebook/Sayali Rajadhyaksha

'दिल दोस्ती दुनियादारी' 'अमर फोटो स्टुडिओ' अशा अनेक मालिका आणि नाटकांतील सहकलाकार सखी गोखले आणि सुव्रत जोशी विवाहबंधनात अडकले आहेत. नेरळ येथील सगुणा बागेत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ही जोडी घरोघरी पोहोचली होती. या सोहळ्याला या मालिकेची टीम तसंच 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाची टीम उपस्थित होती. सखी ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. अभिनयाबरोबरच तिला फोटोग्राफीची आवड आहे. ती सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.

सुव्रत जोशीने पुरुषोत्तम करंडकाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. टीव्ही मालिका आणि काही चित्रपटांतून सुव्रत प्रेक्षकांच्या भेटीला आला तरी रंगभूमीवर त्याचा विशेष जीव आहे.

Image copyright Facebook/Sayali Rajadhyaksha
प्रतिमा मथळा कन्यादान करताना काळजाचा तुकडाच सुव्रतला दिल्याची भावना शुभांगी गोखलेंनी व्यक्त केली.

सखी आणि सुव्रत यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर झाली. त्याविषयी अधिक माहिती देताना सखीची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले सांगतात, "दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या सेटवर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. आम्ही त्या आधी सुव्रतला ओळखत नव्हतो. दिल दोस्तीच्या निमित्ताने आम्ही त्याचं काम बघू लागलो. मालिका सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात सुव्रतने त्यांच्या नात्याबद्दल मला सांगितलं. सखीने मला तसं काही सांगितलं नाही. तोवर सुव्रत आमच्या घरचाच झाला होता. तेव्हाच मली तशी कुणकूण लागली होती. ही जोडी चांगली आहे असं मला जाणवलं. तरी मी सखीला सांगितलं की फार घाई करण्यात अर्थ नाही. कारण तिचं ते पहिलंच प्रोजेक्ट होतं. त्यामुळे तिने आपली आधी ओळख प्रस्थापित करावी असं मला वाटत होतं."

"सुव्रतमुळे सखीच्या व्यक्तिमतत्वातही खूप बदल झाला होता. अगदी कलाकार म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणूनही तिच्यात सकारात्मक बदल होत होते. जोडीदारामुळे असे बदल होणं फार चांगलं आहे असं मला वाटलं. नंतर अमर फोटो स्टुडिओच्या तालमी पुण्यात सुरू होणार होत्या. तेव्हा दोघांनी मला लिव्ह इन मध्ये राहण्याची परवानगी मागितली. मी परवानगी दिली मात्र उगाच भरकटू नका. नात्याला काही भविष्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तरच पुढे जा असा इशाराही मी त्यांना दिला." शुभांगी गोखले पुढे सांगत होत्या.

नंतर सखी आणि सुव्रत त्यांच्या कामात व्यस्त झाले. दोन वर्षांपूर्वी अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. मात्र त्याची वाच्यता सोशल मीडियावर न करण्याबाबत सखी, सुव्रत आणि माझं एकमत असल्याचं शुभांगी गोखले सांगतात.

साधेपणाने लग्न करण्यावर भर

सखी सध्या लंडनला शिकते आणि सुटट्यांसाठी भारतात आली. तेव्हा या दोघांचं लग्न करण्याची ही योग्य वेळ आहे असं शुभांगी यांना वाटलं. मात्र कोणताही बडेजाव न करता अगदी साधेपणाने लग्न करण्यावर त्यांचा भर होता. त्यानुसार या दोघांचं शुभमंगल नेरळ येथील सगुणा बागेत पार पाडलं.

लग्नाच्या पद्धतीविषयी माहिती देताना शुभांगी सांगतात, "हल्ली खूप मोठ्या प्रमाणात लग्न करण्याची पद्धत आहे. मला ते सगळं टाळायचं होतं. सखी लहानाची मोठी होत असताना तिच्या भावविश्वातली सगळी महत्त्वाची लोक लग्नाला असावी हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यामुळे लग्नाला उपस्थित मंडळी माझ्या अगदी जवळची होती. त्यांनी मला वेगवेगळ्या टप्प्यावर आधार दिला आहे. माझ्या मित्रमैत्रिणींचाही तयारीत खूप हातभार लागला. मला एकूणच ती पैसा दाखवण्याची नाही तर प्रेम दाखवण्याची जागा करायची होती."

Image copyright Facebook/Sayali Rajashyaksha
प्रतिमा मथळा नेरळच्या सगुणा बागेत हा सोहळा पार पडला.

मुलगी सासरी गेल्यानंतर जे वाईट वाटतं ते सखी पुण्याला रहायला गेल्यावरच वाटून झालं होतं. त्यामुळे आता तसं वाईट वाटलं नाही असं शुभांगी गोखले सांगतात. सुव्रतच्या घरच्यांशीही चांगले संबंध असल्याचं आवर्जून सांगतात. एकूणच सखीने चांगला जोडीदार शोधल्याचं समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

सखी आणि सुव्रत यांच्या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपट, नाट्य आणि वेबसिरीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले कलाकार उपस्थित होते.

Image copyright Instagram/Parna Pethe
प्रतिमा मथळा अभिनेता अमेय वाघ, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, अभिनेत्री पर्ण पेठे छायाचित्रात दिसत आहे.

सखी आणि सुव्रतच्या लग्नाची छायाचित्रं अनेक कलाकारांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून शेअर केली.

Image copyright Instagram/Parna Pethe

अभिनेता सुनील बर्वे, पूजा ठोंबरे, अमेय वाघ, पर्ण पेठे, निपुण धर्माधिकारी आणि नवविवाहित जोडपं फोटोत दिसत आहेत. सरतेशेवटी 'मी फार आनंदात आहे' अशी भावनिक प्रतिक्रिया शुभांगी गोखले यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)