लोकसभा 2019: श्याम सरण नेगी - 1951 ते 2019 अशा सर्व निवडणुकीत मत देणारे पहिले मतदार

Image copyright PRADEEP KUMAR/BBC
प्रतिमा मथळा श्याम सरण नेगी

सुरकुतलेला चेहरा आणि जर्जर झालेलं शरीर. हातात काठी नसेल तर दोन पावलंही टाकता येत नाहीत. काही पावलं चाललं की लगेच धाप लागते. हे आहेत 102 वर्षांचे श्याम शरण नेगी.

'स्वतंत्र भारताचे पहिले मतदार' ही नेगी यांची ओळख. त्यांना भारतीय लोकशाहीचे 'लिव्हिंग लेजंड' असंही म्हणतात.

शिमल्यापासून जवळपास 280 किमी दूर किन्नोर जिल्ह्यातील अतिशय देखण्या अशा कल्पा गावात ते राहतात. बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत असलेल्या एका टुमदार लाकडी घरात आमच्या त्यांच्याशी गप्पा रंगल्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला.

19 मे रोजी किन्नोरसह संपूर्ण हिमाचल प्रदेशात मतदान होत आहे. आणि त्यातच त्यांनी कल्पा, किन्नोरमध्ये जाऊन मतदान केलं.

Image copyright Twitter / SpokespersonECI
प्रतिमा मथळा श्याम सरण नेगी यांनी मतदान केलं

किन्नोर हे मंडी लोकसभा मतदारसंघात येतं. वय आणि वाढत्या वयाने दिलेल्या सर्व वेदना विसरून पुन्हा एकदा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.

आम्ही नेगी यांना भेटायला पोहोचलो त्यावेळी निवडणूक आयोगाने पाठवलेले बूथ लेव्हल अधिकारी (BLO) आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गराडा घातला होता आणि लेमन टीचे घोट घेत ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदानाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देत होते.

आपल्या क्षीण आवाजात नेगी सांगतात, "ऑक्टोबर 1951मध्ये मी पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केलं. त्यानंतर मी एकही निवडणूक चुकवली नाही. मला माझ्या मताचं महत्त्व कळतं. आता तर माझं शरीरही माझी साथ देत नाही. मात्र आत्मशक्तीच्या बळावर मी मतदान करत आलो आहे. यावेळीसुद्धा मताधिकार वापरायचा आहे. हे माझं शेवटचं मतदानही असू शकतं. ही आशा मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सोडू इच्छित नाही."

नेगी म्हणतात, "तो दिवस मला चांगला आठवतो. तो माझ्या आयुष्यातला मोठा दिवस होता", सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेष तरळून जाते.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - स्वतंत्र भारताचे पहिले मतदार

स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत किन्नोरमध्ये 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झालं होतं.

खरंतर फेब्रुवारी-मार्च 1951 ला मतदान होणार होतं. मात्र किन्नोरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे तिथे तब्बल पाच महिने आधीच मतदान घेण्यात आलं.

त्यावेळी नेगी शेजारच्या मुरांग गावात शिक्षक होते. मात्र त्यांचं नाव कल्पाच्या (त्याकाळी चिन्नी म्हणून ओळखलं जायचं) मतदार यादीत होते.

पहिल्या निवडणुकीत मतदान

नेगी सांगतात, "मला माझ्या शाळेत मतदान घ्यायचं होतं. मात्र माझं नाव माझ्या कल्पा गावच्या मतदारयादीत होतं. मी आदल्या रात्री आपल्या घरी आलो. सकाळी लवकर उठून तयार झालो. सकाळी सहा वाजता माझ्या मतदान केंद्रावर गेलो."

"मतदान घेणाऱ्या पथकाची मी वाट बघत बसलो. त्यानंतर मला आठ-दहा किलोमीटर लांब असलेल्या मुरांगमध्ये जाऊन मतदान घ्यायचं आहे. त्यामुळे मला इथे लगेच मत टाकू द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर त्यांनी निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी साडेसहा वाजता मला मत टाकू दिलं."

Image copyright PRADEEP KUMAR/BBC

त्यानंतर नेगी यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाही ,मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभेची किंवा मग लोकसभेची. त्यांचं मतदान केंद्र कल्पा 51 आहे. तिथे एकूण 928 मतदार आहेत. यात 467 महिला आहेत. हे मतदान केंद्र नेगी यांच्या घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी ते केवळ 50 मीटर अंतरावर होतं. मात्र नेगी आता आपल्या मुलासोबत नवीन घरात राहतात. त्यामुळे मतदान केंद्र आता थोडं दूर पडतं.

नेगी आत्मविश्वासाने सांगतात, "मी माझं मत कधीही वाया जाऊ दिलं नाही. मात्र यावेळी मी 102 वर्षांचा आहे. माझी तब्येतही बरी नसते. वाढत्या वयामुळे मी आता माझ्या पायांवर उभंही राहू शकत नाही. माझे पाय थरथरायला लागतात. मी थकतो आणि मग चालता येत नाही. दृष्टीही कमी झाली आहे. असं असलं तरीसुद्धा तब्येत याहून जास्त खराब झाली नाही तर मी नक्की मतदान करेन."

1 जुलै 1917 रोजी नेगी यांचा जन्म झाला. ते भारताचे सर्वांत वयोवृद्ध मतदार आहेत. तरुण मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं उदाहरण दिलं जाईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.

नेगी सांगतात, "माझ्यासारखा जख्ख म्हातारा मतदानासाठी जाऊ शकतो तर दुसरं कुणी का नाही जाऊ शकत. तरुण वर्ग माझ्याकडून हे तर नक्कीच शिकू शकतात."

Image copyright PRADEEP KUMAR/BBC

2007 सालापर्यंत नेगी सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कल्पातील सरकारी प्राथमिक शाळेत मतदानासाठी जायचे. मात्र 2007 साली निवडणूक आयोगाने आयकॉन बनलेले मतदार विशेषतः पहिल्या निवडणुकीत मत देणाऱ्या मतदारांची यादी बनवण्याचे काम हाती घेतले.

नेगी पहिल्या निवडणुकीत मत टाकणारे मतदार होते आणि त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नव्हती. निवडणूक आयोगाने आपल्या आर्काईव्ह्जमधून हा डेटा तपासून पाहिला. त्यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा नंदा यांनीदेखील हे मान्य केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नेगी यांचा सत्कारही केला होता. त्यांचा सत्कार करण्यासाठी चावला खास किन्नोरला गेले होते.

'लिजेंड वोटर' म्हणून मान्यता मिळल्याबद्दल नेगी सांगतात, "मला खूप आनंद झाला. माझं या स्टेटसवर प्रेम आहे. यामुळे माझा उत्साह अधिक वाढला. माझा अनेकदा सन्मान करण्यात आला. याशिवाय प्रत्येक मतदानावेळी निवडणूक आयोग माझं स्वागतही करतो. मी शाळेत जातो आणि मुलांना मतदानाविषयी जागरुक करतो. मला आवडतं."

2014च्या निवडणुकीआधी गुगलने नेगींवर एक फिल्म तयार केली होती - Pledge To Vote. ही फिल्म इंटरनेटवर व्हायरल झाली होती. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक ब्रॅन्ड अम्बसेडर्सने ती पाहिली होती.

स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी

नेगी सांगतात त्यांची स्मरणशक्ती क्षीण होत चाललीय. मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या काही आठवणी आहेत. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहर लाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांविषयी ते बोलतात.

नेगी सांगतात, "त्याकाळी आम्ही काँग्रेसला मत द्यायचो. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान होतं. मात्र नंतर जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचारात अडकली आणि गरिबी दूर करण्यात अपयशी ठरली तेव्हा जनता पक्ष लोकप्रिय झाला."

Image copyright PRADEEP KUMAR/BBC
प्रतिमा मथळा कल्पा, हिमाचल प्रदेश

भारताची सर्वांत मोठी समस्या कोणती आहे? नेगी यांच्या मते गरिबी आणि भूक भारत सरकार आणि विशेषतः काँग्रेससाठी मोठा कलंक आहे. याशिवाय नेगी यांना रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

1975 साली नेगी निवृत्त झाले. ते बराच वेळ आपल्या खोलीत रेडिओ ऐकण्यात घालवतात. ते म्हणतात, "आयुष्य खूप एकाकी झालं आहे. कुठवर साथ देईल माहीत नाही. मात्र एवढं काही केलंय की आता सन्मानाने निरोप घेईल."

इतकंच नव्हे, नेगी जुन्या बॅलेट पेपरपेक्षा EVM मशीनची अधिक स्तुती करतात. ते म्हणतात, "ही जास्त चांगली यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये उमेदवाराचा फोटो असतो. बटन दाबल्यावर बीप वाजते. यामुळे मतदान झाल्याचं कळतं."

नेगींचा मुलगा सीपी नेगी फुलांचा व्यवसाय करतात. ते सांगतात 2014 साली त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचे वडील सामाजिकरीत्या फार सक्रीय राहिले नाहीत.

ते सांगतात, वडील सकाळी आठ वाजता उठतात आणि बऱ्यापैकी शिस्तबद्ध जीवन जगतात. सकाळी योगासनं करतात आणि नाश्ता करण्याआधीसुद्धा थोडा व्यायाम करतात.

निवडणूक आयोगाने नेगींचा शोध कसा घेतला?

सीपी नेगी सांगतात, "ते स्वतःचं काम स्वतः करतात. ते आजारी असतील तेव्हाच कुणाची मदत घेतात. माझ्या वडिलांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. ते लहान मुलांशी बोलतात. त्यांना आपल्या आयुष्याबद्दल सांगतात. निवडणुकीआधी परदेशी टीव्ही चॅनलसह अनेक जण भेटायला येतात."

नेगी यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचं गाव कल्पा हेदेखील पर्यटनस्थळ बनलंय. राज्य सरकारने या गावासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत. या गावाला ऐतिहासिक वारशाचा दर्जा देण्यात आला आहे.

नेगी यांना 15 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. त्यांचं शेवटचा पगार 700 रुपये महिना होता.

Image copyright PRADEEP KUMAR/BBC

निवडणूक आयोगाने नेगी यांचा शोध कसा लावला, याविषयी 2007 साली मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या मनिषा नंदा एक रंजक गोष्ट सांगतात.

त्या सांगतात, "मी 2007 साली पायलट प्रोजेक्ट म्हणून किन्नोर गावात फोटो मतदारयादीचं काम हाती घेतलं. त्यावेळी श्याम सरन नेगी यांच्या एका छोट्या फोटोवर माझी नजर खिळली. त्यांचं वय 90-91 वर्षं लिहिलं होतं. मी फोन उचलला आणि त्यावेळी किन्नोरच्या डीसी असलेल्या सुधा देवी यांना नेगी यांची मुलाखत घ्यायला सांगितलं."

सुधा देवी त्यांच्या गावी गेल्या आणि त्यांची भेट घेतली. तेव्हा कळलं की नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी झालेल्या पहिल्या निवडणुकीत मतदान केलं होतं आणि त्यानंतर एकही निवडणूक त्यांनी चुकवली नाही.

मनिषा नंदा सांगतात, "आमच्याकडे जेवढा डेटा होता सगळा तपासला. हे माझ्यासाठी पीएचडीचा प्रबंध लिहिण्यासारखं होतं. मात्र शेवटी हे कळलं की त्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं आहे. सुधा देवी यांना पुन्हा एकदा त्यांची भेट घ्यायला सांगण्यात आलं आणि त्यांची ऑडियो मुलाखत रेकॉर्ड करण्यात आली."

या ऑडियो रेकॉर्डिंगची पडताळणी करण्यासाठी ती टेप निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पडताळणीतही नेगी खरं बोलत असल्याचं आढळलं. शिवाय हिमाचल प्रदेशच्या CEOच्या रिकॉर्डशी मेळ बसत होता.

मनिषा नंदा सांगतात, "निवडणूक आयोगाने नेगींना ब्रँड अम्बॅसेडर बनवलं आणि तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी स्वतः कल्पाला जाऊन नेगी यांचा सन्मान केला."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)