IPL 2019 : रविंद्र जाडेजाच्या तीन चौकारांनी सामन्याचा चेहरामोहरा पालटला.

चेन्नई Image copyright Getty Images

रविवारी IPL मध्ये दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैद्राबादला त्यांच्याच मैदानात 39 धावांनी पराभूत केलं.

सगळ्यात आधी दुसऱ्या सामन्यावर नजर टाकूया.

या सामन्यात हैदराबाद समोर 156 धावांचं लक्ष्य होतं. मात्र दिल्लीचा डाव 18.5 षटकांत 116 धावांत आटोपला.

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोने या हैदराबादच्या खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 51 तर बेयरस्टोने 41 धावा केल्या.

याशिवाय कोणताही फलंदाज कॅगिसो रबाडा, कीमो पॉल, आणि ख्रिस मॉरिस या त्रिकुटाचा सामना करू शकला नाही. हैदराबादचे इतर फलंदाज दहापेक्षा जास्त धावा करू शकले नाहीत.

रबाडाने 22 धावांत चार गडी, ख्रिस मॉरिसने 22 धावांत तीन तर किमो पॉलने 17 धावात तीन गडी बाद केले.

याआधी दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात 155 धावा केल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड वॉर्नर

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 45 तर कॉलिन मुन्रोने 40 धावा केल्या.

अशा पद्धतीने दिल्लीच्या गोलंदाजाबरोबर हैदराबादचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.

या विजयानंतर दिल्ली कॅपिटसल्स च्या खात्यात आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजयाची नोंद झाली आहे. या विजयाबरोबरच गुणतालिकेत दिल्ली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दिल्लीने आपल्या नावाबरोबरच आपलं नशीब बदललं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधी दिल्ली डेअरडेव्हिल्स या नावाने ओळखला जायचा.

दुसऱ्या बाजूला हैदराबादचा संघ सात सामन्यात तीन विजय आणि चार पराभवासकट गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या त्यांच्याकडे सहा गुण आहेत.

चेन्नईची विजयाची मालिका कायम

याआधी खेळलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजयाची मालिका कायम ठेवली आहे. ईडन गार्डन मैदानात यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांनी पाच विकेटने पराभव केला.

चेन्नईसमोर विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य होतं. सुरेश रैनाच्या नाबाद 58 आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद 31 धावांच्या मदतीने 19.4 षटकांत त्यांनी हे लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.

याआधी नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा सलामीचा फलंदाज ख्रिस लिनने 82 आणि नीतीश राणाच्या 21 धावांच्या मदतीने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 161 धावा केल्या.

रैनाला गवसला सूर

या सामन्याचा खरा हिरो ठरला तो सुरेश रैना. दीर्घकाळानंतर त्याला काल सूर गवसला. मात्र रविंद्र जडेजानेही सामन्यात रंग भरले. त्यांनी 19 व्या षटकात सलग तीन चौकार लगावत चेन्नईच्या नावावर विजयाची नोंद केली.

या षटकात झालेल्या 16 धावा चेन्नईच्या विजयाला कारणीभूत ठरल्या.

शेवटच्या षटकात तर चेन्नईला विजयासाठी केवळ आठ धावांची गरज होती. ते त्यांनी सहजपणे पार पाडलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुरेश रैना

सुरेश रैनाने 42 चेंडूत सात चौकार आणि एका छटकारासह 58 धावा केल्यामुळे तो विशेष चर्चेत राहिला. या हंगामात हे त्याचं पहिलं अर्धशतक आहे.

याआधी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 30 आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 36 धावा करण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर चार सामन्यांत तो फारसा चमत्कार दाखवू शकला नाही.

सुरेश रैना आयपीएल मध्ये यशस्वी फलंदाजांपैकी एक आहेत. त्याने आयपीएलमध्ये पाच हजारापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

इमरान ताहिरच्या गोलंदाजीची कमाल

रविवारी चेन्नईच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या गोलंदाज इम्रान ताहिरकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

त्याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिस लिन

कोलकातासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या ख्रिस लिनची विकेट इमरान ताहिरने घेतली. नीतीश राणा, रॉबिन उथप्पा, आणि आपल्या फलंदाजीने धडकी भरवणाऱ्या आंद्रे रसेल सगळ्यात धोकादायक होत असल्याचं दिसत आहेत.

इमरान ताहिरच चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कर्णधार धोनीचा तो अत्यंत विश्वासू मानला जातो.

सुपर फोरच्या नजीक चेन्नई

या विजयाबरोबरच गतविजेता चेन्नई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी आठपैकी सात सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता आणि त्यांच्यात सहा गुणांचा फरक आहे. कोलकाताचा चार सामन्यांत विजय आणि चार सामन्यात पराभव झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)