बालाकोट हवाई हल्ला : नरेंद्र मोदींचे दावे वस्तुस्थितीशी किती सुसंगत?

नरेंद्र मोदी-इमरान खान Image copyright Getty Images

"बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर 43 दिवस पाकिस्ताननं तिथं कोणालाही जाऊ दिलं नाही. पत्रकारांनाही प्रवेश दिला नाही. मात्र आता सर्जिकल स्ट्राईकमध्ये फार नुकसान झालं नाही, असं दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतातील निवडणुका लक्षात घेऊन पाकिस्तान ही चलाखी करत आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

'सकाळ माध्यम समूहा'ला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय माध्यमांना भारतानं हल्ला केलेल्या वादग्रस्त मदरशाची भेट घडवून आणली. पाकिस्तान सरकारच्या या कृतीवर पंतप्रधानांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.

पाकिस्ताननं बालाकोटमध्ये नेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांचाही समावेश होता. उस्मान झहिद यांनी बालाकोटमध्ये अनुभवलेली वस्तुस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मांडलेली भूमिका यांमध्ये खरंच काही तफावत आहे का?

'निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न'

"सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा 250 किलोमीटरच्या परिसरात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं 24 तासांत माध्यमांना तिथं नेलं. 250 किलोमीटरच्या परिसरात अशा अनेक जागा होत्या, जिथं काहीच घडलं नव्हतं. या जागा दाखवणं पाकिस्तानसाठी सोयीचं होतं," असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं आहे.

त्यानंतर थेट 43 दिवस तिथे कोणालाही का जाऊ दिलं नाही, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. "43 दिवसांत त्यांनी तिथं साफसफाई केली असेल, नवं बांधकाम केलं असेल किंवा माध्यमांना कोणत्या तरी नवीनच जागी नेलं असेल," असा संशय मोदींनी व्यक्त केला. त्या भागात तेवढी एकच इमारत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

"मुळात सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काही झालंच नाही, असं दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन अडथळे आणण्याचा खेळ पाकिस्तान करू पाहत आहे," असा आरोप मोदींनी केला.

'त्या' मदरशामधून बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट

बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांना इथे आलेला अनुभव मोदींच्या कथनाशी किती सुसंगत होता?

उस्मान झहिद यांनी मदरशाला दिलेल्या भेटीदरम्यान लाईव्ह कॉमेंट्री करताना म्हटलं, "आतून काही मुलं शिकत असल्याच आवाज येतो आहे. काही सामानही समोर ठेवल्याचं दिसतं आहे. या मदरशासमोर एक मोकळं पटांगण दिसतं आहे. जिथं फुटबॉलच्या पोस्ट लागलेल्या दिसत आहेत. मुलं कदाचित ही जागा खेळण्यासाठी वापरत असावीत. इथं काही पत्रकार आणि राजदूतही उपस्थित आहेत. मोठमोठ्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये हा भाग आहे. पाकिस्तानी लष्करानं हे सगळं पाहण्यासाठी आम्हाला इथं आणलं आहे."

अर्थात, पाकिस्तानी लष्करानं आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी आयोजित केलेल्या भेटीवर उस्मान जहिद यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. सगळं करण्यासाठी पाकिस्तान सरकारला किंवा लष्कराला 43 दिवस का लागले? मदरशाला मध्यंतरी सुटी का देण्यात आली? असे प्रश्न त्यांनी विचारले.

या प्रश्नांना उत्तर देताना लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवांनी सांगितलं, की "ही एक जुनी-पुराणी इमारत आहे. इथं कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे भारतीय सरकार जो दावा करतंय त्यात काहीही सत्य नाही."

इथली परिस्थिती तणावग्रस्त असल्यामुळे 27 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत हा मदरसा बंद ठेवण्यात आला होता, असं असिफ गफूर बाजवांनी म्हटलं. तिथल्या एका शिक्षकानं दिलेल्या माहितीनुसार तिथं सुट्ट्याच सुरू होत्या. इथं शिकताना दिसणारी मुलं ही स्थानिक मुलं होती.

सुट्टीत एवढी मुलं पाहून आपण हैराण झाल्याचं उस्मान जहिद यांनी म्हटलं. मुलांची संख्या नीटपणे सांगितली जात नव्हती, असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

उस्मान यांनी म्हटलं, की पाकिस्तानी लष्करानं माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं फक्त 20 मिनिटं वेळ घालवू दिला. अनेकदा लवकर आटपा. आपल्याला पुढे जायचं आहे, असं म्हणून घाई करण्यात आली. माध्यमांनी जास्त लोकांशी बोलू नये, असा त्यांचा प्रयत्न होता.

किती दहशतवादी ठार?

Image copyright SM VIRAL POST

बालाकोट हल्ल्यामध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याचा सरकारचा अंदाज बरोबर आहे का, असा प्रश्नही मोदी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अमेरिकन पत्रकाराच्या एका व्हीडिओचा दाखला दिला. ' व्हिडिओत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी नागरिकांचे सांत्वन करताना दिसतात. मुलांना कवटाळून रडतात. यातून किती मारले गेले हे स्पष्ट होतं,' असं मोदींनी उत्तर देताना म्हटलं आहे. मात्र बालाकोट हल्ल्यात किती मारले गेले याचा आकडा त्यांनी सांगितला नाही.

ज्या व्हीडिओचा उल्लेख पंतप्रधानांनी केला, त्याच्या सत्यतेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. बीबीसीच्या पडताळणीत हा व्हीडिओ खैबर पख्तुनख्वाच्या पश्चिमेकडील दीर भागातील असल्याचं आढळून आलं होतं. हा भाग बालाकोटपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय या व्हीडिओतल्या संभाषणावरून ते बालाकोटशी संबंधित नसल्याचंही स्पष्ट होत होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)