लोकसभा निवडणूक : बुलडाणा ते गुजरात पोटासाठी वणवण करणारे म्हणतात, 'मतदान महत्त्वाचं पण नोकरी तर हवी'

तरुण

पोटाची खळगी भरण्यासाठी बुलडाण्यातल्या तरुणांनी गाठलं गुजरात. काय काम मिळालं त्यांना? काय आहे त्यांची कहाणी?

लोकसभा निवडणुकांच्या निमत्तानं मी सध्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये STनं फिरतोय. सुरतहून एका वेगळ्याच बातमीच्या शोधात माझा प्रवास गुजरातमधील व्यारा या छोट्याशा गावात येऊन थांबला होता.

मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर व्यारा हे गुजरातमधलं तसं एक महत्त्वाचं स्टेशन. या स्टेशनच्या जवळच एक बस स्थानक आहे.

एका बातमीनिमित्त एकाला भेटण्यासाठी मी सकाळी साडेसातच्या सुमारास या बस स्थानकात पोहोचलो होतो. सूर्य चांगलाच वर आला होता. व्यारा नेमकं काय आहे, त्याबाबत अधिक माहिती मिळवता येईल का, हे चाचपण्यासाठी स्थानकात उभ्या असलेल्या एका तरुणांच्या ग्रुपशी बोलण्यासाठी मी पुढे सरसावलो.

साधारण 18 ते 20 वयोगटातली ही नऊ-दहा मुलं कॉलेज तरुण असल्याचं दिसून येत होतं. प्रत्येकाच्या खांद्यावर बॅगा होत्या. मी त्यांच्यातल्या एकाला, जवळच्याच एका गावात जायला बस कधी मिळेल, हे हिंदीतून विचारलं. त्यावर 'आम्हालासुद्धा माहिती नाही. आम्ही इथं नवीन आहोत,' असं त्या मुलानं सांगितलं.

'फिर आप कहा से हैं?' असं विचारल्यावर त्याने 'महाराष्ट्र, बुलडाणा' असं उत्तर दिलं.

बुलडाणा ऐकताच मी त्याला पुढचा प्रश्न मराठीत, 'मग कुठे निघालात?' असा विचारताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

गुजरातमधल्या एका आदिवासी पट्ट्यातल्या आणि मुख्य शहरापासून लांब असलेल्या या छोट्याशा गावात आपल्याला कुणीतरी मराठी आणि तेही महाराष्ट्रातलं भेटेल, अशी ना त्यांना ना मला अपेक्षा होती.

आपण केवडीयाला जात असल्याचं त्यानं सांगितलं. तिथं एका रिसॉर्टमध्ये आम्हा सर्वांना सुट्टीच्या काळात नोकरी मिळाली आहे, असं तो पुढे बोलला.

केवडीया हे ठिकाण नुकत्याच झालेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळच आहे. या महाप्रकल्पामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळालीये, असं सांगण्यात येतंय. मलाही ते जाणवलं, जेव्हा मी सुरतला उतरताच "पुतला घुमने आए हैं क्या आप, सर?" असा प्रश्न मला टॅक्सीचालकानं केला होता.

माझा त्या मुलांशी मराठीत संवाद सुरू होईपर्यंत त्यांच्या ग्रुपमधली सर्व मुलं आमच्या बाजूला गोळा झाली होती. तुम्ही कुठले, कुठे चाललात वगैरे प्रश्न त्यांनी मला विचारलं.

तुमचं सर्वांची पदवी पूर्ण झालीये का, असं विचारल्यावर त्यांनी 'नाही' असं उत्तर दिलं. कुणी बारावी पास होतं, कुणी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होतं तर कुणी ITI करत होतं.

त्यांनी सुटीत नोकरी करण्याचं का ठरवलं, असं विचारल्यावर कुणी कमावलेले पैसे घरी देणार तर कुणी कॉलेजची फी भरणार, असं सांगितलं. मग त्यांच्याशी एवढी चर्चा होत असताना त्याच्यातल्या एकादोघांनी सेल्फी वगैरे काढला.

मग बुलडाण्यातच नोकरी का नाही शोधली, एवढे लांब का आलात, असं विचारल्यावर त्यांच्यातलाच सुनील यारवाळ नावाचा तरुण बोलू लागला... "गावाकडे पाणी नाही. वडील शेती करतात. तिथं सुटीत काही काम मिळालं नाही, म्हणून इथं आलो."

पण तुमच्या गावाकडे तर आता मतदान आहे ना, असं विचारल्यावर सुनील म्हणाला, "काय करणार दादा? मतदान तर महत्त्वाचं आहे पण नोकरी तर पाहिजे ना. तसंही कुणीही निवडून आलं तरी आम्हाला कुठं काय मिळतंय! ही नोकरी केली तर पैसे मिळतील शिक्षणासाठी. शेतकरी बाप काही शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही."

"कुणीपण निवडून आलं तरी शेतकऱ्यांसाठी कुणीच काही करत नाही. मग कशाला करायचं मतदान?" तो म्हणाला. पण देशाचे नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे, आपला अधिकार आहे, असं सांगितल्यावर तो म्हणाला, "रोजगार पण तर महत्त्वाचा आहे ना दादा!"

तिथून पुढे सापुताऱ्यापर्यंतच्या बस प्रवासात मला बिहारमधून आलेले सुनीलच्याच वयाचे चार तरुण भेटले. ते सुद्धा नोकरीसाठी तिथं आले होते.

भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण नोकरीच्या निमित्तानं एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत आहेत. देशाच्या प्रत्येक शहरात आपल्याला असे अनेक सुनील दिसतील, जे त्यांचं गाव-शहर सोडून नोकरीसाठी स्थलांतरित झाले आहेत. या तरुणांना मतदान तर करायचंय पण नोकरी किंवा रोजगार बुडवणं शक्य होत नाही.

मीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. यावरूनच मला एक शेर आठवतो.

तलाश-ए-रिज़् का ये मरहला अज़ब है कि हम घरों से दूर भी घर के लिए बसे हुए हैं...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)