सोलापूर लोकसभा 2019: सुशीलकुमार शिंदे म्हणतात काँग्रेसमधून भाजपमध्ये ‘पळून गेलेले मुंगळे परत येतील’

शिंदे

कॉंग्रेसच्या नेत्यांचं भाजपात जाणं काहीही चिंतेचं नाही; आता महाराष्ट्रात 2014 सारखं वातावरण नाही, त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याच जास्त जागा निवडून येतील, असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

सोलापूरातून पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या शिंदेंनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं.

"जे जाताहेत ते जाऊ द्या. ज्यावेळेस इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, त्यावेळेसही हे सगळे मुंगळे पळून गेले होते. पण 1980 साली जेव्हा इंदिरा गांधी परत निवडून आल्या तेव्हा मोठ्या नेत्यांसहीत सगळे कॉंग्रेसमध्ये परत आले होते. तसंच आता होणार आहे. विखे पाटलांचे चिरंजीव वयस्कर झाले आहेत, ते गेले. मोहिते पाटलांचे काही प्रश्न अडकले असतील म्हणून ते तिकडे गेले," असं शिंदे या मुलाखतीत म्हणाले.

2014 सालच्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा सोलापूरमधूनच पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा निवडणूक न लढवण्याची इच्छा शिंदे यांनी व्यक्त केली होती. पण कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असं म्हणत 78 वर्षांचे शिंदे यंदा पुन्हा सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आहेत.

सोलापूर मतदारसंघ

सोलापूर हा राखीव मतदारसंघ आहे. यंदा त्यांच्यासमोर 'वंचित बहुजन आघाडी'चे प्रकाश आंबेडकर आणि 'भाजप'चे जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे.

महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुशीलकुमार शिंदेंचं नाव घेत 'हिंदू दहशतवादा'चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. शिंदे गृहमंत्री असतांना 'हिंदू दहशतवाद' हा शब्द कॉंग्रेसने प्रचारात आणल्याचा आरोप मोदींनी केला. त्यावरही शिंदेंनी 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत आपली बाजू मांडली.

पाहा सुशीलकुमार शिंदे यांची संपूर्ण मुलाखत

"2010च्या दरम्यान मी माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये याबद्दल बोललो होतो. 2014लाही हाच मुद्दा त्यांनी घेतला होता. आता 2019 लाही हाच मुद्दा ते घेतात, याचा अर्थ असा की यांच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाहीत, दृष्टी नाही. म्हणून दुसरा विषय नसल्यानं ते टीका करताहेत," असं शिंदे म्हणाले.

Image copyright SHARAD BADHE

प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरात येऊन निवडणूक लढवणं, यामुळे शिंदेंचा विजयपथ जरा खडतर होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

दलित समाजातील मतं आणि ओवेसींशी आघाडी केल्यानं 'AIMIM'च्या वाट्याला जाणारी मुस्लिम मतं, जी कॉंग्रेसची पारंपारिक मतं मानली जातात, ती मिळणं आव्हानात्मक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिंदेंच्या कन्या प्रणिती यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीतही ओवेसींच्या उमेदवारामुळे अशा विजयासाठी झगडावं लागलं होतं.

"मुळात प्रकाश आंबेडकर इथं का आलेत, ते पाहायला हवं. ते पूर्वी कधीही सोलापूरला आले नाहीत. त्यांचा जिल्हा आणि त्यांचे क्षेत्र हे अकोला आहे. त्यामुळे ते इथं परदेशी आहेत. त्यात त्यांनी MIMची साथ घेतलेली आहे. ती जातीय आहे, सांप्रदायिक आहे.

"बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यात, त्याअगोदरची जी घटना समिती होती त्यात केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी 'सेक्युलरिझम'वर भर दिला आहे. त्यांच्या नातवानं सेक्युलरिझम सोडला आणि जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी केली. त्यातही कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर. हे आपल्याला काय सांगतं?" शिंदे विचारतात.

Image copyright Sagar Surawase
प्रतिमा मथळा ओवेसी आणि आंबेडकर यांच्या आघाडीमुळे कुणाला फायदा, कुणाला नुकसान?

ते पुढे या मुलाखतीत म्हणतात, "त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं त्यांना पाठिंबा दिला. CPM तर धर्म, जात, देव काहीही न मानणारा पक्ष आहे. हे सगळं कॉम्बिनेशन सुशीलकुमार शिंदेंची मतं कापण्याकरता आहे. दुसरं काही यात नाही. आणि या सगळ्याचा भाजपला फायदा व्हावा, यासाठी हे चाललं आहे. हे सगळे भाजपचे बगलबच्चे म्हणून काम करताहेत. पण तरीही मी इथे निवडून येणार आहे, कुणीही इथे आलं तरीही," असं शिंदे म्हणाले.

'वंचित बहुजन आघाडी'ला या निवडणुकीअगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घेण्याचेही प्रयत्न झाले होते, पण ते निष्फळ ठरले. "आम्ही त्यांना 4 जागा द्यायला तयार होतो. त्यांनी 22 जागा मागितल्या. आमच्याकडे आहेतच एकूण 26 जागा. मग 22 कशा देणार आम्ही? जो अडेलतट्टूपणा ते करत होते याचा अर्थ सुरुवातीपासूनच दुसऱ्या पक्षासोबत त्यांची कमिटमेंट झाली होती.

"आता ते नसल्याचा परिणाम मर्यादित स्वरूपात होईल, पण त्याबरोबरच कवाडे गट, गवई गट बाकी काही गट त्यांच्यासोबत नाहीत हे पाहिलं पाहिजे. केवळ एकट्या प्रकाश आंबेडकरांना दलित समाजाचे एकमेव नेते मानता येणार नाही. ते सोबत असते तर बरं झालं असतं वगैरे म्हणायची ही वेळ नाही. अभी जो है वह है, लढते रहेंगे," शिंदे म्हणाले.

सोलापुरात दुसरा टप्प्यात म्हणजे गुरुवार 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)