World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडणाऱ्या समितीचा एकूण अनुभव फक्त 31 वनडे...

टीम इंडिया, वर्ल्डकप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड करणाऱ्या समिती सदस्यांकडे वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव नाही.

वर्ल्डकप संघनिवडीकडे देशभरासह जगभर पसरलेल्या भारतीय संघाच्या चाहत्यांचं लक्ष असतं. विश्वविजेतेपदाचे दावेदार 15 खेळाडू निवडणाऱ्या समितीतील खेळाडूंचं प्रदर्शन कसं आहे?

MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड केली. या निवडसमितीत प्रसाद यांच्या बरोबरीने गगन खोडा, देवांग गांधी, शरणदीप सिंग, जतीन परांजपे यांचा समावेश आहे.

निवडसमिती सदस्यांचा प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा अनुभव मर्यादित आहे. पाच पैकी कुणाकडेही वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा अनुभव नाही.

MSK प्रसाद

43 वर्षीय मनवा श्रीकांत प्रसाद मूळचे आंध्र प्रदेशमधल्या गुंटूरचे आहेत. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या प्रसाद यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेशसाठी खेळताना सहा शतकं झळकावली आहेत.

मात्र भारतासाठी खेळताना त्यांचं प्रदर्शन सर्वसाधारण राहिलं आहे. 6 टेस्ट आणि 17 वनडे अशी पुंजी प्रसाद यांच्या नावावर आहे. वनडेत प्रसाद यांची सरासरी 14.55 एवढीच आहे. 63 हा त्यांचा सर्वोच्च स्कोअर आहे. कीपिंग करताना प्रसाद यांनी 14 कॅचेस पकडले आहेत. 7 वेळा फलंदाजांना स्टंपिंग केलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा निवडसमितीचे अध्यक्ष एमएसके.प्रसाद

14 मे 1998 रोजी प्रसाद यांनी भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्या सामन्यात त्यांनी एकही कॅच पकडला नाही, स्टंपिंगही केलं नाही.

प्रसाद यांची शेवटची वनडे पदार्पणाच्या वनडेसारखीच राहिली. 17 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांनी शेवटची वनडे खेळली. राजधानी दिल्लीत हा सामना झाला होता. या सामन्यात त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यांनी एकही कॅच पकडली नाही, स्टंपिंगही केलं नाही.

देवांग गांधी

47 वर्षीय देवांग यांच्या नावावर 4 टेस्ट आणि 3 वनडेंचा अनुभव आहे. 17 नोव्हेंबर 1999 रोजी यांनी भारतासाठी पदार्पण केलं. दिल्लीतल्या फिरोझशाह कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ओपनर म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी 30 धावांची खेळी केली होती.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा शरणदीप सिंग, एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली

स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांग यांनी तीन वनडे सामन्यात 16.33च्या सरासरीने फक्त 49 रन्स केल्या. त्यांची वनडे कारकीर्द दीड महिन्यापुरतीच मर्यादित राहिली. 30 जानेवारी 2000 रोजी त्यांनी शेवटची वनडे खेळली.

रणदीप सिंग

पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेले सरणदीप ऑफब्रेक फिरकीपटू होते. त्यांच्या नावावर 3 टेस्ट आणि 5 वनडेंचा अनुभव आहे. 5 वनडेत त्यांनी 47 धावा केल्या.

31 जानेवारी 2002 रोजी दिल्लीत इंग्लंडविरुद्ध त्यांनी वनडे पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं.

जतीन परांजपे

स्थानिक क्रिकेटमध्ये 46ची दमदार सरासरी असलेल्या जतीन यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव 4 वनडे सामन्यांचा आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा जतीन परांजपे

28 मे 1998 रोजी त्यांनी ग्वाल्हेर येथे केनियाविरुद्ध वनडे पदार्पण केलं होतं. दुखापतीच्या कारणास्तव त्यांना प्रदीर्घ काळ खेळता आलं नाही. टोरंटोत त्यांनी पाकिस्तानविरुद्ध शेवटची वनडे खेळली.

गगन खोडा

स्थानिक क्रिकेटमध्ये राजस्थानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गगन यांनी 1991-92 मध्ये रणजी पदार्पणातच शतक झळकावलं. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 300 धावांची खेळी करणाऱ्या गगन यांची वनडे कारकीर्द दोन सामन्यांपुरती मर्यादित राहिली.

मग तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडेल की या लोकांवर त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंची एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी निवड करण्याची जबाबदारी कशी येऊन पडते?

निवडसमिती कशी ठरते?

ही निवडसमिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाअंतर्गत (BCCI) काम करते. पूर्वी या समितीचे सदस्य 5 प्रादेशिक झोनमधून निवडले जायचे. मात्र सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशीनंतर 2016 साली ही पद्धत बंद करण्यात आली.

तेव्हापासून निवडसमिती सदस्यांच्या निवडीसाठी अर्ज मागवण्यात आले. उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत तत्कालीन BCCI सचिव अजय शिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि तत्कालीन BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा समावेश होता.

सध्याची निवडसमिती 2016 मध्ये तयार झाली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य MSK प्रसाद यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. सरनदीप सिंग, जतीन परांजपे, गगन खोडा आणि देवांग गांधी समितीचे सदस्य आहेत. त्यांची निवड मुलाखत पद्धतीद्वारेच करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)