लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेसला 'न्याय' महागात पडेल- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी Image copyright TWITTER/DDNewsLive

"काँग्रेसने संकल्प केलेल्या न्याय योजनेमुळे त्या पक्षानं जाणते-अजाणतेपणानं 55 वर्षं एका परिवाराची सत्ता असूनही या देशात घोर अन्याय केला गेला हे मान्यच केलं आहे," अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या NYAY योजनेवर टीका केली.

1984 साली दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीत हजारो शिखांना ठार मारण्यात आलं, कलम 356चा दुरुपयोग करून लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं काँग्रेसनं बरखास्त केली, MGR, करुणानिधी. नंबुद्रीपाद, बादल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा काँग्रेसने सतत अपमान केला. या सर्वांना काँग्रेस कसा न्याय देणार आहे? हे सर्व प्रकरण काँग्रेसला महागात पडणार आहे असं मोदी यांनी या योजनेबाबत बोलताना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दूरदर्शन' आणि राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या सरकारची बाजू मांडली. राज्यसभा टीव्हीचे एडिटर-इन-चिफ राहुल महाजन आणि अशोक श्रीवास्तव यांनी पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली.

यावेळेस मोदी यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या कर्जमाफीवरही टीका केली. त्यावेळेस देशात शेतकऱ्यांचे 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र काँग्रेसने केवळ 52 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्यातही अनेक खोट्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचा फायदा उठवला.

राफेलचा मुद्दा खोटा असल्याचं आता सिद्ध झालं आहे याचा पुनरुच्चार मोदी यांनी या मुलाखतीत केला. आपल्या वडिलांच्या काळातील बोफोर्सचं प्रकरण विस्मृतीत जावं यासाठी राफेलचा मुद्दा निर्माण केला गेला असा आरोप त्यांनी केला.

येत्या सरकारमध्ये आम्ही पाच वर्षं पूर्ण होण्याआधीच म्हणजे 2022 साली कामाचा हिशेब देणार आहोत. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्तानं आम्ही विविध क्षेत्रामध्ये विकासाची 75 पावलं टाकणार आहोत, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पूर्वी जगभरामध्ये भारत एक दर्शकाची भूमिका पार पाडत होता. आता भारत या जागतिक राजकारणातील एक खेळाडू बनला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये वितुष्ट आहे, परंतु भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत, असं मोदी म्हणाले.

मध्य पूर्वेतील देश आणि इराण यांच्यामध्ये वितुष्ट आहे, पंरतु भारताचे या सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता भारत एका बाजूला राहू शकत नाही. जग आज एकमेकांशी जोडलं गेलं आहे. त्यात भारताला सहभागी व्हावं लागेल असं मोदी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत बोलताना सांगितलं.

विरोधक एकत्र आले तरी पराभूत करू

उत्तर प्रदेशात विरोधक एकत्र आले तरी आम्ही विजयी होऊ. कर्नाटक, महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये विरोधक एकत्र आले तरी आम्ही त्यांना पराभूत करू. दक्षिण भारतातही आम्ही चांगल्या प्रकारे कामगिरी करू.

गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही गुजरातमध्ये सर्व 26 जागांवर भाजपाचा विजय होईल. पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी सर्व लक्ष भाजपावर केंद्रीत केलं आहे.

याचाच अर्थ आमची ताकद तेथे वाढत आहे, असे मोदी म्हणाले. सरकारी संस्थांचा दुरुपयोग करतं असा तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस करत असलेला आरोप साफ चुकीचा आहे असंही मोदी यांनी सांगितलं.

'अजूनही लाट आहे'

आपल्याला प्रचाराच्यावेळेस आजही आमच्या बाजूने जनमताची लाट असलेली दिसून येते. सर्व सभांमध्ये जनसागर उसळतो. सामान्य माणसाला घर, गॅस, शिक्षण, वीज अशा विविध क्षेत्रामध्ये आमच्या सरकारने मदत केल्यामुळे हा परिणाम दिसून येतो, असं मोदी यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)