लिहून ठेवा, मोदी पंतप्रधान होणार नाहीत- राजू शेट्टी #5मोठ्याबातम्या

राजू शेट्टी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1. लिहून ठेवा, मोदी पंतप्रधान होणार नाहीत- राजू शेट्टी

"घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, आणि झालेच तर २०२४ ला निवडणुकाच होणार नाहीत," अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी शिराळा तालुक्यातील मांगले येथे केले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

शेट्टी म्हणाले "नरेंद्र मोदींना हिटलरचे आकर्षण आहे, त्यामुळे विरोधकांना ते देशद्रोही समजून त्यांच्या जवळच्या लोकांनाही संपवण्याचे काम करीत आहेत. देशात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, त्यांचा मुलगा आणि स्मृती इराणी यांच्यासारखेच लोक खूश आहेत. अन्य लोक नाखूष असल्यामुळे यावेळी सत्तांतर होणारच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधी भूमिका घेणारा आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा माझ्यावर आरोप केला आहे, मात्र यापुढेही शेतीमाल आणि ऊसाला योग्य भाव मिळवण्यासाठी कारखानदारांबरोबर भांडण सुरूच ठेवणार आहे."

2. द्वेषपूर्ण भाषणाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर होणार कारवाई, आयोगाकडून चौकशी सुरू

दक्षिण गोव्यातील राय येथील चर्चचे पाद्री कोसेन्सांव डिसिल्वा यांच्या विद्वेशपूर्ण उपदेशासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली असून यासंदर्भात दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी चौकशी सुरु केली आहे. विद्वेशपूर्ण भाषणांचे एकूण चार व्हिडिओ निवडणूक आयोगासमोर आले आहेत. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे.

यासंदर्भात रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक यंत्रणोने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. मात्र सध्या तरी कुणालाही समन्स जारी केलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. रॉय लवकरच त्यांचाअहवाल आयोगाला सादर करणार आहेत.

3.आझम खान आणि मनेका गांधीवर प्रचारबंदी

योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर प्रचारबंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने आझम खान आणि मनेका गांधींवरही प्रचारबंदी आणल्याची बातमी NDTV ने दिली आहे. आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यामुळे तीन दिवस बंदी तर मनेका गांधी यांनी जातीयवादी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर 2 दिवस प्रचार करण्यावर बंदी आणली आहे.

Image copyright Getty Images/facebook

आचारसंहिता लागू असताना राजकीय नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर निवडणूक आयोग कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा कोर्टाने आयोगाचे कान उपटले आणि त्यांच्या अधिकारांची करून दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

4. राहुल गांधींना शिव्या देणारी पोस्ट वाचल्याने भाजप नेता अडचणीत

सोशल मीडियावर राहुल गांधी यांना शिव्या देणारी एक पोस्ट मंचावरून वाचल्यामुळे हिमाचल प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतपाल सत्ती वादात सापडले आहेत. दैनिक जागरणने ही बातमी दिली आहे. काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. तर राहुल गांधी यांच्याबदद्ल अशी कोणतीही भावना मनात नाही तर फक्त पोस्ट वाचून दाखवली असं सत्ती यांचं म्हणणं आहे.

Image copyright Getty Images

शनिवारी सोलन येथे झालेल्या एका संमेलनात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आणि त्यानंतर मंचावरच ही पोस्ट वाचायला सुरुवात केली. पोस्ट वाचताना तो शब्द वाचता येणार नाही असं त्यांनी सांगितलं, मग मात्र त्यांनी पूर्ण पोस्ट वाचली. यावेळी मंचावर भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

5. भारतातून होणाऱ्या निर्यातीत विक्रमी 11 टक्के वाढ

भारताच्या औषधनिर्माण, रसायन, तसंच अभियांत्रिकी वस्तूंना असलेल्या मागणीमुळे देशाची निर्यात गेल्या महिन्यात 11 टक्क्यांनी वाढली आहे. 2018-19 च्या मार्च महिन्यात भारतीय वस्तूंची निर्यात 32.55 अब्ज डॉलरवर गेल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

यंदाच्या मार्चमध्ये आयातीत अवघ्या 1.44 टक्क्यांची वाढ होऊन ती 43.44 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परिणामी आयात निर्यातीवरील दकर मानली जाणारी व्यापारी तूट 10.89 अब्ज डॉलरवर गेली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)