IPL 2019 : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म नेमका का हरवलाय?

  • आदेश कुमार गुप्त
  • क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

आयपीएलमध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूया सामन्यात मुंबईची बॅटिंग सुरू होती. 18 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. क्षेत्ररक्षण करताना कव्हरला उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातून बॉल निसटला.

निराश झालेल्या विराट कोहलीनं स्वतःला सावरलं, पण नंतर पाय आपटून राग व्यक्त केला. विराट कोहली आपल्या टीमच्या एकूणच कामगिरीवर किती निराश झालाय, हे त्याच्या एका कृतीतून दिसलं.

डगआउटमध्ये टीमचे प्रशिक्षक आशिष नेहराचाही चेहरा पडलेला होता.

जिंकण्यासाठी 172 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर शेवटच्या दोन षटकांत 22 धावा करण्याचं आव्हान होतं. विराटनं बॉल पवन नेगीच्या हातात दिला. नेगीसमोर बॅटिंगला होता हार्दिक पांड्या. त्यानं नेगीच्या ओव्हरमध्ये एकहातीच मॅच पूर्णपणे फिरवली.

नेगीच्या पहिल्या चेंडूवर त्याला रन काढता आली नाही. पण पुढच्या सर्व चेंडूंचा हार्दिकनं असा काही समाचार घेतला की चेंडू सीमापार जाताना पाहण्याशिवाय बंगळुरुच्या फिल्डर्सच्या हाती काही उरलंच नाही.

पांड्यानं नेगीच्या दुसऱ्याच बॉलवर लाँग ऑफला जोरदार षटकार ठोकला. तिसऱ्या बॉलवर पांड्यानं चौकार ठोकला. चौथा बॉलही त्यानं बाउंड्री बाहेर तटावला. पाचव्या चेंडूवर हार्दिकनं लॉन्ग ऑनवर षटकार मारला. यानंतर मुंबईसाठी विजयाची केवळ औपचारिकताच बाकी होती.

शेवटच्या बॉलवर एक धाव घेत मुंबईनं हा सामना 19 व्या ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावून जिंकला. हार्दिक पंड्यानं 16 बॉलमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं नाबाद 37 धावा केल्या.

मुंबईचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकनं 40, कर्णधार रोहित शर्मानं 28, सूर्यकुमार यादवनं 29 आणि ईशान किशननं 21 धावा करत संघाच्या विजयात वाटा उचलला.

युजवेंद्र चहलनं 27 धावांच्या बदल्यात दोन विकेट्स घेतल्या.

आरसीबीच्या फलंदाजांनी केली निराशा

नाणेफेक हारल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्यांदा बॅटिंगसाठई मैदानात उतरली. एबी डिव्हिलियर्सच्या 75 आणि मोईन अलीच्या 50 धावांच्या मदतीनं बंगळुरूनं 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून 171 धावा केल्या.

डिव्हिलियर्स आणि मोईन अलीखेरीज पार्थिव पटेलनंही 28 धावा केल्या.

कर्णधार विराट कोहली 8 आणि आकाशदीप नाथ 2 धावा काढून बाद झाले. बाकी फलंदाजांच्या कामगिरीबद्दल तर न बोललेलंच बरं अशी परिस्थिती होती.

मुंबईच्या लसिथ मलिंगा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आणि 31 धावांच्या बदल्यात 4 विकेट्स घेतल्या.

नेमकं कुठं चुकतंय?

आठपैकी सात सामन्यांमध्ये बंगळुरूला पराभव पत्करावा लागला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, स्टोइनिस, मोईन अली आणि युजवेंद्र चहलसारखे खेळाडू असूनही बंगळुरूचा संघ मैदानावर इतका हतबल का दिसतोय?

या प्रश्नाचं उत्तर देताना क्रीडा समीक्षक विजय लोकपल्ली सांगतात, की आपण आधी मुंबईविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलू. ज्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्यानं तुफान फलंदाजी केली, ती ओव्हर मुळात पवन नेगीला द्यायला नको होती.

हार्दिकला श्रेय द्यायला हवं, मात्र नेगीच्या बॉलिंगवर तो बॅट चौफेर फिरवणारच होता. तो हुशारीनंही खेळला. चांगला शॉट मारण्यासाठी तो विकेटवर थोडा मागे जायचा. प्रशिक्षक आशिष मेहराच्या सांगण्यावरून गोलंदाजीला आणलेल्या पवन नेगीनं चांगलीच निराशा केली. त्यानं पांड्याला हवे तसे चेंडू टाकले, असं विजय लोकपल्ली यांनी म्हटलं.

चांगल्या स्थितीत असताना मॅच कशी हरायची हे आरसीबीकडनं शिकावं, असा उपरोधिक टोलाही विजय यांनी लगावला.

स्वतःच्या हातून चेंडू निसटल्यावर विराट कोहलीनं व्यक्त केलेल्या वैतागाबद्दल बोलताना विजय लोकपल्ली यांनी सांगितलं, की विराट दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो. इतर खेळाडूंनी रन्स वाचवायच्या, चेंडू अडवायचे, स्वतःला झोकून द्यावं ही अपेक्षा. मात्र स्वतःला चेंडू अडवता आला नाही की स्वतःवरच राग काढायचा.

बंगळुरूची टीम गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये कमकुवत आहे. अशावेळी त्यांनी 200-220 धावा नाही केल्या तर त्यांच्यासाठी जिंकणं अवघड आहे.

पुढचा प्रवास खडतर

आता आठपैकी सात सामने हरल्यानंतर त्यांचा आयपीएलमधला प्रवास जवळपास संपण्याच्याच बेतात आहे.

याबद्दल विजय लोकपल्ली सांगतात की आता उरलेले सर्व सहा सामने जिंकणं आरसीबीसाठी कठीण आहे. आरसीबी आता अशी टीम झालीये, जिचा आत्मविश्वास कमकुवत आहे आणि खेळाडूंचा फॉर्म पूर्णपणे हरवलाय. त्यातही 25 एप्रिलपासून संघातील काही परदेशी खेळाडूही वर्ल्ड कपच्या तयारीसाठी निघून जातील. त्यामुळे आता एखादा चमत्कारच बंगळुरूला अंतिम फेरीमध्ये पोहचवू शकतो.

विराट कोहलीचा खराब फॉर्मचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होतोय का?

या प्रश्नाचं उत्तर देताना विजय लोकपल्ली सांगतात, की याबद्दल कोणतंही दुमत नाहीये. यंदाच्या सीझनमध्ये आरसीबी केवळ विराट आणि डिव्हिलियर्सच्याच भरवशावर मैदानात उतरली होती.

मुंबई विरुद्धच्या सामन्यात डिव्हिलियर्स चुकीच्या वेळी आउट झाला. आकाशदीप नाथच्या चुकीमुळं डिव्हिलियर्स रन आउट झाला. आकाशदीपनं डिव्हिलियर्सला रन घ्यायला आल्यावर परत पाठवायलाच नको होतं. जर डिव्हिलियर्स स्ट्राइवर असता तर किमान 15 रन अजून काढू शकला असता.

शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीनं तीन विकेट्स गमावल्या. बंगळुरूच्या फलंदाजांची ही अगदीच सुमार कामगिरी होती.

उरलीसुरली कसर पवन नेगीनं शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केली. मॅच जिंकण्याच्या परिस्थितीत असताना नेगी चांगली ओव्हर टाकू शकला नाही.

अजून एक मॅच हरली तर बंगळुरू सुपर फोरमधून बाहेर पडेल. पण तरीही आशा ठेवायला काय हरकत आहे? गालिबनं म्हटलंच आहे ना,

हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन

दिल को ख़ुश रखने को ग़ालिब ये ख्याल अच्छा है.

आता जो संघ केवळ दोन फलंदाजांच्या जीवावर खेळत होता, त्याला आठपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागणं हे तसं स्वाभाविकच होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)