अंबाती रायुडू वर्ल्डकप थ्रीडी गॉगल घालून का बघणार?

टीम इंडिया, वर्ल्डकप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अंबाती रायुडू

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची सोमवारी निवड झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघातून मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूला डच्चू देण्यात आला. 24 तासानंतर रायुडूने ट्वीटरच्या माध्यमातून टोला हाणला आहे. 'वर्ल्डकपचा आनंद लुटण्यासाठी थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर दिली आहे' या वाक्यासह रायुडूने सूचक भाष्य केलं आहे.

तोंडाला पाणी सुटलेला आणि उपरोधिक चेहरा केलेल्या स्माईलीसह रायुडूने हे ट्वीट केलं आहे. तासाभरात हजारहून अधिक नेटिझन्सनी रीट्वीट केलं आहे तर नऊ हजारांहून अधिक लोकांनी या ट्वीटला लाईक केलं आहे.

रायुडूने कोणावरही टीका केलेली नाही. कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र जे म्हणायचं आहे ते सूचक शब्दांत व्यक्त केलं आहे.

काल निवडसमितीने विजय शंकरची निवड का केली याचं उत्तर देताना तो 'थ्री डायमेन्शल' खेळाडू आहे असा उल्लेख केला होता. रायुडूच्या कामगिरीत घसरण होत असताना अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने फलंदाजीत आपला ठसा उमटवत वर्ल्डकपसाठी दावेदारी सिद्ध केली. उंचपुऱ्या विजयचं तंत्रकौशल्य चांगलं आहे. मात्र विजय चौथ्या क्रमांकावर एकदाही खेळलेला नाही. वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होणार आहे. चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्यांवर विजयची गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. या व्यतिरिक्त तो चपळ क्षेत्ररक्षक आहे.

दरम्यान रायुडूला संघाबाहेर ठेवण्याबाबत माजी खेळाडू गौतम गंभीरने परखड शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. ''केवळ तीन डावांत खराब खेळ झाल्याने अंबाती रायुडू वर्ल्डकपसंघाच्या बाहेर होणं खूपच दुर्देवी आहे. वनडे क्रिकेटमध्ये 48चं अव्हरेज असणाऱ्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणं खूपच वाईट आहे. अंबाती फक्त 33 वर्षांचा आहे. अन्य कुणापेक्षाही रायुडूला संघाबाहेर करणं खूपच वेदनादायी आहे. 2007 वर्ल्डकपवेळी मीही अशाच परिस्थितीतून गेलो होतो. निवडसमितीने माझी निवड केली नाही. त्यावेळी किती वाईट वाटतं हे मी समजू शकतो. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही युवा खेळाडूसाठी वर्ल्डकप संघाचा भाग होणं हेच स्वप्न असतं. त्यामुळेच रायुडूसाठी मला वाईट वाटतं आहे'', अशा शब्दांत गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सलामीला शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची नावं पक्की होती. रनमशीन आणि कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे नक्की होतं. रायुडूसह लोकेश राहुल, दिनेश कार्तिक यांच्यासह युवा विकेटकीपर ऋषभ पंत आणि अष्टपैलू विजय शंकर यांच्यापैकी कोण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार याविषयी उत्सुकता होती. टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याविषयी क्रिकेट चाहते, जाणकार, माजी खेळाडू यांच्यासह सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती.

अवघ्या 9 वनडेंचा अनुभव असणाऱ्या विजय शंकरच्या नावावर निवडसमितीने मोहोर उमटवली आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपनंतर 12 खेळाडू वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळले आहेत. अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मनोज तिवारी, विराट कोहली, लोकेश राहुल, केदार जाधव, ऋषभ पंत हे चौथ्या क्रमांकावर खेळले आहेत. यांच्यापैकी रायुडूची कामगिरी सगळ्यात चांगली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर लगेचच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेतही रायुडूची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे. मात्र कोहली-शास्त्री जोडीचा पाठिंबा रायुडूची लंडनवारी पक्की करू शकतो, असं म्हटलं जात होतं.

चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये रायुडू टीम इंडियाचा भाग होता. वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव रायुडूच्या पारड्यात होता. मात्र यंदा रायुडूची वर्ल्डकपवारी हुकली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विजय शंकर

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री या जोडगोळीने वर्ल्डकपसाठी आखणी करत अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवलं. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला. वर्ल्डकपपूर्वीच्या शेवटच्या वनडे मालिकेत रायुडूची चौथ्या क्रमांकावरील कामगिरी 13, 18, 2 अशी झाली.

2015 विश्वचषकानंतर चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांची आकडेवारी

नाव सामने धावा सरासरी स्ट्राईक रेट शतकं अर्धशतक
अंबाती रायुडू 16 464 42.18 85.60 1 2
महेंद्रसिंग धोनी 12 448 40.72 76.84 0 3
अजिंक्य रहाणे 11 420 46.66 92.71 0 4
युवराज सिंह 10 358 44.75 97.54 1 1
दिनेश कार्तिक 9 264 52.80 71.35 0 2
मनीष पांडे 8 183 36.60 92.89 1 0
हार्दिक पंड्या 5 150 30.00 106.38 0 1
मनोज तिवारी 3 34 11.33 46.57 0 0
विराट कोहली 3 30 10.00 71.42 0 0
लोकेश राहुल 4 26 13.00 59.09 0 0
केदार जाधव 4 18 9.00 50.00 0 0
ऋषभ पंत 1 16 16.00 100.00 0 0

फिरकीपटू प्रग्यान ओझाने रायुडूप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. प्रग्यानला कधीही वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नाही. तो म्हणतो, "हैदराबादच्या क्रिकेटपटूंबाबत असं का होत असावं? मीही अशाच परिस्थितीतून गेलो आहे. भावना समजून घे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)