राज ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका भाजपचं किती नुकसान करणार?

  • अमृता कदम
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

'तो व्हीडिओ लाव रे', या वाक्याची सध्या भाजपनं प्रचंड धास्ती घेतली आहे, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. सध्या ज्या पद्धतीनं राज ठाकरे आपल्या प्रचारसभांमधून मोदी सरकारच्या योजनांवर टीका करत आहेत, आकडेवारी सांगत आहेत त्याचा संदर्भ सोशल मीडियावरील या पोस्टशी आहे.

गुढीपाडव्याला झालेल्या सभेमध्ये राज यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं मोदींच्या घोषणांची आणि भाजपच्या जाहिरातींची व्हिडिओ क्लिप दाखवत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

त्यानंतर अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचं मनसेनं केलेलं 'स्टिंग ऑपरेशन' राज ठाकरे यांनी सादर केलं. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गावात व्यवहार होत नसल्याचं राज यांनी दाखवून दिलं.

पण या सगळ्याचा 'क्लायमॅक्स' बाकीच होता. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणलं. हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून तो गाव सोडून गेल्याचं राज यांनी स्पष्ट केलं.

यानंतर भाजपलाही बॅकफूटवर जावं लागलं. हरिसाल गावातील जे काही तांत्रिक प्रश्न असतील, ते सोडवले जातील असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं.

राज ठाकरेंचा हा दणका केवळ हरिसालपुरता मर्यादित राहणार की या सर्व सभांचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला मतांच्या रुपानंही बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, तरी राज ठाकरे सध्या राज्यभर भाजपविरोधात प्रचार करत आहेत. राज यांची त्यामागची गणित काय आहेत, याबद्दलही तर्क लावले जात आहेत.

'राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार व्हावी'

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे

या प्रचारामागची भूमिका स्पष्ट करताना मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सध्या आमचा उद्देश हा केवळ लोकांमध्ये राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार करणे हा आहे. लोकशाहीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. जे लोक राजकारणाचा आपल्या आयुष्याशी काही संबध नाही, असं मानतात. त्यांना या प्रचारामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावरही राजकारणाचा कसा परिणाम होतो हे लक्षात येईल. सध्या राज ठाकरे ज्या सभा घेत आहेत त्याला मनसेनं लोकांचं केलेलं 'राजकीय प्रबोधन' असं म्हणावं लागेल. या प्रचाराचा मताच्या आकड्यावर किती परिणाम होईल, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे."

आपण केवळ लोकसभा निवडणूक आणि मोदी-शाह यांच्या जाहिरातबाजीतला फोलपणा उघड पाडण्यासाठी प्रचार करत आहोत, असं मनसेकडून सांगितलं जात असलं तरी राजकीय विश्लेषक राज ठाकरेंच्या प्रचाराकडे अजून व्यापक अर्थानं पाहत आहेत.

राज निवडणुकीतला 'एक्स फॅक्टर'

"या निवडणुकीचा सर्वांत जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक 'एक्स फॅक्टर' असतो. यंदा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा 'एक्स फॅक्टर' राज ठाकरे आहेत. सातत्यानं थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्यानं स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत," असं मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.

कुबेर यांनी म्हटलं, "राज ठाकरे यांचं लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. तो सहजपणे होतानाही दिसतोय. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही झाली तरी राज ठाकरे स्वतःची जागा निर्माण करू शकतील."

राज यांच्या प्रचाराचा फटका नेमका कोणाला?

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे भाषणादरम्यान

या सगळ्याचा विचार करता राज यांच्या आक्रमकतेचा फटका भाजपपेक्षाही शिवसेनेला जास्त बसेल, असा अंदाजही गिरीश कुबेर यांनी व्यक्त केला. "शिवसेना सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. शिवसेना नेतृत्वानं गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांमुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश नाही मिळालं तर काही नाराज शिवसैनिक मनसेकडे वळू शकतात," असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं.

राज ठाकरेंच्या सभांमुळं भाजपची किती मतं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे वळतील हे सांगणं कठीण आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं. "सध्या आघाडीकडे शरद पवार वगळता कोणताही स्टार प्रचारक नाहीये. राज ठाकरे ही कमतरता भरून काढत आहेत. मात्र मुळात मनसेचा हक्काचा मतदार कमी आहे. मनसेची उपस्थिती नसेल तेव्हा या मतदारांचा स्वाभाविक कल हा शिवसेनेकडे असेल. पण जो कुंपणावरचा किंवा द्विधा मनःस्थितीतला मतदार आहे, त्याची मतं आघाडीकडे वळविण्यात मनसेला निश्चित यश मिळू शकेल," असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.

"काँग्रेस केवळ पुलवामा, राफेल या मुद्द्यांवर बोलत असताना राज ठाकरे लोकांशी संबंधित योजनांबद्दल बोलत आहेत. ते केवळ बोलतच नाहीयेत, तर सगळी आकडेवारी आणि पुरावे देत आहेत. भाजपचा प्रत्येक खोटा दावा ते खोडून काढत आहेत. यामुळं भाजपचे काही मतदार त्यांच्यापासून नक्कीच दुरावतील," असा अंदाज पत्रकार वर्षा तोरगळकर यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

राज ठाकरे कोणाचे स्टार प्रचारक?

राज यांच्या सध्याच्या प्रचारसभांबद्दल बोलताना भाजप नेते विनोद तावडे यांनी ते नेमके कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेनं जाहीर करावं, असा टोला लगावला. सोमवारी ते एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. "राज ठाकरे यांच्या टुरिंग टॉकिजची पुढची स्क्रीप्ट शरद पवार यांनी दिली असावी," असं ठाकरे यांच्या सोलापूरमधील सभेबद्दल बोलताना तावडेंनी म्हटलं. सोलापूरमध्ये राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. त्याकडेच तावडे यांचा रोख होता.

'शरद पवार यांनी उस्मानाबाद वरुन परतताना राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली,' असा आरोपही तावडे यांनी केला.

अनिल शिदोरे यांनी मात्र ही गोष्ट नाकारली. "शरद पवार रात्री खूप उशीरा हॉटेलमध्ये पोहोचले आणि आम्ही सकाळी लवकर निघालो. त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही," असं शिदोरेंनी म्हटलं.

'मोदी-शहांचं राजकीय स्थान कमी करणं हाच उद्देश'

राज ठाकरे यांच्या सभा ऐकल्यावर त्यांच्या टीकेचा रोख हा भाजपऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर असल्याचं दिसून येत आहे.

भारतीय लोकशाहीच्या दृष्टिनं ही महत्त्वाची निवडणूक आहे. मोदी-शाह या जोडगोळीनं राष्ट्र, देशभक्ती या सगळ्याच्या व्याख्याच संकुचित केल्या आहेत. लोकशाहीतील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळं या दोन व्यक्तिंचं राजकीय स्थान कमी करणं हाच आमचा उद्देश असल्याचं अनिल शिदोरे यांनी व्यक्त केलं.

सध्या भाजप म्हणजे मोदी असंच समीकरण असल्यानं राज यांनी मोदींविरोधात बोलणं स्वाभाविक असल्याचं अभय देशपांडे यांनी मान्य केलं. "यामध्ये अजून एक मेख आहे. भाजपचे अनेक परंपरागत मतदार आहेत, ज्यांना मोदी आणि अमित शाह यांचं राजकारण मान्य नाहीये. हा नाराज मतदार राज यांच्या प्रचारामुळं भाजपपासून दूर जाऊ शकतो," असं देशपांडे यांनी सांगितलं.

विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार?

राज यांच्या प्रचाराचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल, असं चित्र निर्माण झालं असलं तरी स्वतः राज थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मतं मागत नाहीयेत. मोदी-शाहांचा पराभव करण्याऱ्यांना मतदान करा, असं आवाहन राज करत आहेत.

अप्रत्यक्षपणे आघाडीला मतं मागताना राज विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाण्याचा मार्ग खुला ठेवत आहेत? या प्रश्नाला अनिल शिदोरे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. आघाडी होईल किंवा आघाडी होणारही नाही. या भविष्यातील गोष्टी आहेत. हे निर्णय त्या-त्या वेळी घेतले जातील. सध्या आम्ही ज्या सभा घेत आहोत, त्या केवळ लोकसभा निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत, असं गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनीच स्पष्ट केल्याचं अनिल शिदोरे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)