IPL 2019 : आर.अश्विनने केली पंजाबच्या विजयाची पायाभरणी

आर. अश्विन Image copyright Getty Images

IPL मध्ये अनेकांनी उत्तम खेळी करत विजयाची पायाभरणी केली मात्र पाच-सात चेंडूत छोट्या तरीही महत्त्वाच्या खेळीसुद्धा सामन्याचं रुप पालटू शकतात हे कालच्या पंजाब विरुद्ध राजस्थानच्या सामन्यात सिद्ध झालं.

पंजाबचा कर्णधार आर. अश्विन या विजयाचा शिल्पकार होता. चार चेंडूत केलेल्या 17 धावांमुळे पंजाबच्या विजयाला मोठा हातभार लागला.

प्रत्युत्तरादाखल 183 धावांचं आव्हान स्वीकार करताना राजस्थानचा डाव सात गडांच्या मोबदल्यात 170 धावांवर आटोपला. या सामन्यात आर. अश्विनने उत्तम कर्णधारपदाचं उत्तम प्रदर्शन केलं.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा पंजाबने फलंदाजीचा निर्णय घेतला. जेव्हा अश्विन मैदानात उतरला तेव्हा 19.1 षटकात 164 धावा होत्या.

धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीच्या चिंधड्या

त्यावेळी धवल कुलकर्णी गोलंदाजी करत होता. डेव्हिड मिलर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्या जागेवर अश्विन आला.

मैदानात आल्यावर आर. अश्विनने धवल कुलकर्णीच्या त्या षटकात आल्या आल्या चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूत एक धाव घेतली. चौथ्या चेंडूत पुन्हा एक धाव घेतल्यानंतर अश्विन खेळायला आला.

शेवटच्या दोन चेंडूत लागोपाठ दोन षटकार लगावल्यामुळे पंजाबचा स्कोरबोर्ड आभाळाला जाऊन भिडला. धवल कुलकर्णीने एका षटकात तब्बल 18 धावा दिल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड मिलर

आर. अश्विनच्या या 17 धावांमुळे 182 धावांचं तगडं आव्हान राजस्थानसमोर उभं राहिलं. निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात त्यांचा डाव 170 धावांमध्ये आटोपला आणि त्यांचा 12 धावांनी पराभव झाला.

राजस्थानसाठी सलामीचा फलंदाज राहुल त्रिपाठीने 50 जोस बटलरने 23, संजू सॅमसनने 27 आणि अजिंक्य रहाणेने 26 धावा केल्या.

स्टुअर्ट बिन्नीने 11 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद 33 धावा केल्या. मात्र तेव्हापर्यंत सामना राजस्थानच्या हातून निसटला होता.

उत्तम नेतृत्व

या सामन्यात पंजाबलाही अनेक चढ-उतार बघायला लागले. के.एल.राहुल आणि ख्रिस गेलने पहिल्या विकेटसाठी 38 धावा करत एक समाधानकारक सुरुवात करून दिली.

ख्रिस गेलने 22 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने 30 धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला के.एल. राहुलने 47 चेंडूत 52 धावा केल्या.

त्याशिवाय डेव्हिड मिलरने 40 आणि मयंक अग्रवालने 26 धावांचं योगदान दिलं.

Image copyright PA

त्यानंतर आर. अश्विनने चार चेंडून सतरा धावा करत पंजाबच्या डावाला नवसंजीवनी दिली.

एवढंच नाही तर अश्विनने त्याची कर्णधारपदाचीही चुणूक दाखवली.

पहिलाच सामना खेळणाऱ्या अर्शदीप सिंहचा त्याने योग्य वापर केला. त्याच्यावर विश्वास टाकत निर्णायक 19वं षटक त्याच्या हाती सोपवलं.

या षटकात स्टुअर्ट बिन्नीने दोन षटकार लगावले मात्र दुसऱ्या बाजूला खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला त्याने जखडून ठेवलं. रहाणे पहिल्या चेंडूत एकही धाव काढू शकला नाही. दुसऱ्या चेंडूत त्याने दोन धावा केल्या आणि तिसऱ्या चेंडूत त्याने विकेट गमावली.

रहाणे माघारी परतला तेव्हा राजस्थानचा स्कोअर 18.3 षटकांत सहा गडी गमावून 148 होता. तिथूनच राजस्थानच्या हातून सामना जायला सुरुवात झाली होती. अर्शदीप सिंहने 43 धावांत दोन विकेट घेतल्या.

अश्विननेही चांगली गोलंदाजी करत चार षटकांत 24 धावा घेत दोन गडी बाद केले.

Image copyright Getty Images

आर. अश्विनची खेळी निर्णायक ठरली. गेल्या तीन सामन्यात त्याला तर फलंदाजी करायची संधीही मिळाली नाही.

याआधी दिल्लीविरुद्ध खेळताना त्याने फक्त तीन धावा केल्या होत्या.

याबरोबरच नऊ सामन्यात पाच विजयासह 10 गुण घेत पंजाब गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे . दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने आठ सामन्यात दोनदा विजय मिळवत सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)