नरेंद्र मोदी यांच्या अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर

विजयसिंह मोहिते पाटील

फोटो स्रोत, Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत.

राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत, त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. विजयसिंह मोहिते पाटील सध्या या मतदारसंघात खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009साली शरद पवार खासदार होते.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत. तर त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते.

रणजितसिंह निंबाळकर आणि कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मोदी आज अकलूजमध्ये आहेत. सभा सुरू झाल्यावर मोहिते पाटील मंचावर आले. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते, विजयसिंह मोहिते पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असं मोदी म्हणाले.

शरद पवारांवर टीका

जे दिल्लीत बसले आहे ना, ते फार वेगवेगळे हिशोब लावतात त्यांना वास्तविक परिस्थिती माहिती नाही. आज हा भगवा जनसागर पाहून पवारांनी माघार का घेतली ते कळलं. वेळेच्या आधीच त्यांना कळलं की त्यांना काय परिस्थिती आहे ते लगेच कळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वत:चंच कधीच नुकसान होऊ देत नाही. म्हणूनच ते मैदान सोडून पळाले.

2014 मध्ये मी बोललो होतो की, तेव्हा मी शरदरावांना म्हणालो होतो की सरकारमध्ये दम असला की नेते नाही तर सैनिक बोलतात. तेव्हा ते निरुत्तर झाले होते. तेव्हा मी काय करीन असं त्यांना प्रश्न पडला. मी देशाची नीती आणि रीत बदलली आहे.

मी खालच्या जातीचा असल्यामुळेच राहुल गांधींनी माझी बदनामी केली. माझ्यावर आणि कुटुंबावर टीका केली. पण माझ्या कुटुंबाला नावं ठेवू नका कारण संपूर्ण देशच माझं कुटुंब आहे. असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)