लोकसभा निवडणूक : 'दुष्काळात हाताला कामच नाही म्हणून ऊस तोडाय जातो'

  • निरंजन छानवाल
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

अमोलला पोलीस व्हायचं होतं.

ऊसतोडीनिमित्त 80 टक्के कुटुंब स्थलांतर करणाऱ्या इमामपूर गावातल्या अमोलने पोलीस भरतीच्या माध्यमातून नोकरीची स्वप्न पाहिली होती. ती संधी हुकली. गावाकडं नोकरीची आशा धुसर झाली. कुठलाच पर्याय दिसत नसल्यानं शेवटी अमोल घरच्यांबरोबर ऊस तोडीला जाऊ लागला.

"इकडं नोकरी नाही मिळत. मिस्तरीच्या हाताखाली कामाला जाव लागतं. त्यातून लई काही मिळत नाही. भाऊ आणि बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. शेवटी मलाबी आई-वडिलांबरोबर ऊस तोडीला जायचा निर्णय घ्यावा लागला," 20 वर्षांचा अमोल चव्हाण बीबीसी मराठीशी बोलत होता.

बीड जिल्ह्यातल्या बालाघाट डोंगररांगातली गावच्या गावं ऊस तोडीसाठी दरवर्षी स्थलांतर करत असतात. त्यापैकीच एक गाव इमामपूर. बीड शहरापासून साधारणतः पूर्वेला 15 किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या डोंगररांगात हे गाव पहुडलं आहे. चोहोबाजूने उजाड माळरान आणि डोंगर.

शहरी वातावरण मागे सोडत ओबडधोबड रस्त्यावरून या गावात पोहोचलो. अलीकडेच एक छोटीसी वस्ती. या वस्ती आणि गावाच्यामध्ये चारा छावणी लागलेली होती. गावाच्या पलीकडे आणखी एक चारा छावणी आहे.

ऊस तोडीच्या काळात गावातली 80 टक्के कुटुंब स्थलांतर करत असतात. जवळपास 140 कुटुंबं. त्यापैकीच एक अमोलचं कुटुंब. गावाच्या अलीकडं असलेल्या चारा छावणीत अमोल भेटला. अमोलचा लहान भाऊ प्रवीण आणि आई गवळण चव्हाण जनावरांसाठी उसाचे कांडकं तोडत बसले होते.

बीडला क्लासेस लावले

"माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. बीएला मी अॅडमिशन घेऊन ठेवलंय. पोलीसात भरती व्हायचं माझं स्वप्न होतं. घरच्यांनी मला तयारीसाठी बीडला ठेवलं होतं. पण तिथं उंची कमी पडल्याने यश आलं नाही," अमोल सांगत होता.

फोटो कॅप्शन,

इमामपूर वस्तीवर अमोलचं घर आहे.

इमामपूरपासून जवळच असलेल्या वांगी गावात बारावीपर्यंतच शिक्षण घेता येतं. इथ अमोलनं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अमोलचे बहीण-भाऊ इथंच शिकतात.

"बारावीनंतर मी नोकरीसाठी प्रयत्न केले. अपयश आलं. त्यातच घरच्यांनी बहीण आणि भावाच्या शिक्षणाचा खर्च वाढत असल्याचं सांगितलं. मला नोकरी मिळत नसल्यानं मग मी या दोघांना तरी शिकविता येईल असा विचार करून बीड सोडून घर गाठलं.

"दुसरा पर्याय दिसत नसल्यानं मी घरच्यांना ऊस तोडीला येतो असं सांगितलं. आई आणि वडिलांबरोबर उस तोडीला जायला लागलो. ते सात-आठ वर्षांपासून ऊसतोडीला जातात. तीन वर्षांपासून मी त्यांच्याबरोबर जायला लागलो," अमोलने ऊसतोडीला जायच्या मागचं कारण सांगितलं.

मिस्तरीच्या हाताखाली काम

अमोल पुढे सांगू लागला, "पैशाची कमतरता भासत असते. इकडं दोन एकर रान (शेत) आहे. रानात काही उत्पन्न होत नाही. रानडुकरं आणि पक्षी रानात काहीच ठेवत नाही. नासधूस करतात. वनीकरणामुळं जनावरं चराईला नेता येत नाही. चारा नसल्यानं इथं छावणीत आणावी लागतात.

फोटो कॅप्शन,

दुष्काळामुळे अमोल आणि त्याचं कुटुंब सध्या चारा छावणीत असतं.

"इथं दुसरी काही कामंच नाहीत. बीडला कामाला जावं लागतं. मिस्तरीच्या हाताखाली कामं करायचं. शेतात मजुरी करायची. ऊसतोडीला नसलो की अशी कामं करून घरखर्च भागवावा लागतो.

"ऊसतोडीला कारखान्याची उचल घेतो. पन्नास- साठ हजार रुपये मिळतात. तिकडे तीन-चार महिने काढायचे. इकडं वापस आल्यावर पुन्हा काम शोधायचं. हे असचं चाललंय."

"मला मोठं व्हावं वाटतं. प्रत्येक माणसाची स्वप्नं असतात. मलाही फार वाटतं. सरकारी नोकरी लागावी. पण नाही जमत. पुन्हा जागाही एक-दोनच काढतात. मोठी अडचण आहे," अमोलने त्याची व्यथा सांगितली.

पैसा मागं पडत नाही

इमामपूरच्या वस्तीवरच अमोलचं दोन खोल्यांचं एक पक्कं घर आहे. घरासमोर पत्र्याचं शेड. त्यात एका बाजूला बकऱ्या बांधलेल्या. त्यांना चारा छावणीत प्रवेश नसल्यानं त्यांच्या चाऱ्याची तडजोड करावी लागते.

पूनम, अमोलची बहीण. बारावी विज्ञानची परीक्षा दिली. पुढं शिकायचं का? असं विचारल्यावर तिला प्रश्न पडलेला. आई म्हणाली, "तशी परिस्थिती नाही. पैसे नाहीत. दुसऱ्या गावात शिकावं लागतं. गावातून वाहनं नाही." समोर अडचणींचा डोंगर उभा होता.

फोटो कॅप्शन,

अमोलची आई आणि भाऊ बहिण

"बाजरी- ज्वारीचं उत्पन्नच होत नाही. इथं पैसा तसा येत नाही. मुलांच शिक्षण होतं. त्यासाठी आम्हा दोघाले जावं लागतं. मुलांचा खर्च वाढतोय. जनावरांवर भागत नाही. वैरण विकत घ्यावी लागते. पैसा मागं पडतच नाही. त्याच्यामुळे ऊसतोडीला जावं लागतं," आई गवळण चव्हाण सांगत होत्या.

पूनमला ऊस तोडीवालं नाही तर नोकरीवालं घर शोधायचं, असं त्या म्हणतात. यंदाच्या ऊस तोडीमधून त्यांनी गाई खरेदी केल्या. त्यातून काही उत्पन्न निघालं तर निघालं.

बीड जिल्ह्यातून 8 लाख मजुरांच स्थलांतर

इमामपूरमधले जवळपास सगळे कुटुंब ऊसतोडीवरून परतली होती. काही कामाच्याशोधासाठी बीडला गेलेली. गावातले वयस्कर आणि लहान मुलं चारा छावणीवर. गाव भकास पडलेलं.

फोटो कॅप्शन,

इमामपूरमधील 80 टक्के कुटुंब ऊसतोडीला जातात

"बीड जिल्ह्यातले 8 लाख मजूर दरवर्षी ऊसतोडीसाठी स्थलांतरीत होत असतात. याशिवाय लगतच्या जिल्ह्यातले चार लाख मजूर असतात. पाच ते सहा महिने ते तिकडेच असतात. त्यांच्याबरोबर किमान दोन लाख लहान मुलंही असतात," सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे माहिती देतात.

"हे सर्व मजूर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यात सापडतील. ऊसतोड मजूर म्हटलं की तो मराठवाड्यातलाच असतो. या कामगारांसंदर्भात कुठेच नोंदणी नाही. आज कोणाकडेही अधिकृत आकडेवारी नाही.

फोटो कॅप्शन,

गावांमध्ये दिसतात ते वयोवृद्ध मंडळी

"ही जी काही आकडेवारी आहे ती महाराष्ट्रातले दिडशे साखर कारखाने आणि त्यांना लागणारा ऊसतोड मजूर अशा उलट्या पद्धतीने काढलेली आकडेवारी आहे," तांगडे यांनी सांगितलं.

इमामपूरमधली दिडशे कुटुंबं ऊसतोडीसाठी स्थलांतरीत झाली होती. या भागात दुष्काळ आहे का? तर आहे. रोजगाराची गरज आहे का? तर आहे. मग अडचण कुठे आहे? यावर तांगडे सांगतात, "ऊसतोडीला लोक गेल्यानंतर सरकार रोजगार हमीची कामं काढतं. पुन्हा मजूर नसल्याचं सांगतं. मुळात नियोजनातच अडचण आहे. सरकारची इच्छाशक्ती हवी."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)