सोनिया गांधींवर 'हिंदू समुदायाला विभाजित' केल्याच्या आरोपात किती तथ्य? - फॅक्ट चेक
- फॅक्ट चेक
- बीबीसी फॅक्ट चेक टीम

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस एका वादग्रस्त पत्रामुळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र हे पत्र बनावट असल्याचं सांगितलं जातंय.
गृहमंत्री एम.बी.पाटील यांनी पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाची तक्रार केली आहे. ज्यावर त्यांची स्वत:ची स्वाक्षरी आहे.
एम.बी.पाटील यांनी ट्वीट केलंय, "हे पत्र बनावट आहे. माझ्या संस्थेच्या नावाचा आणि माझ्या स्वाक्षरीचा चुकीचा वापर करण्यात आला आहे. ज्यांनी कुणी हे कटकारस्थान केलंय त्यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे."
कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असण्याबरोबरच एम.बी.पाटील 'विजापूर लिंगायत डिस्ट्रिक्ट एज्युकेशनल असोसिएशन'चे अध्यक्ष आहेत. आणि याच संस्थेच्या लेटरपॅडवर छापण्यात आलेली सोनिया गांधी यांच्या नावाचं एक पत्र वादाचं मूळ कारण बनलंय.
मंगळवारी सकाळी कर्नाटक भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे पत्र ट्वीट केलं होतं.
कर्नाटक भाजपनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय, "काँग्रेसचा पर्दाफाश. सोनिया गांधींच्या आदेशानुसार लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेते एम.बी.पाटील यांच्याकडून लिहिलेल्या पत्रामुळे हे स्पष्ट होतंय की सोनिया गांधी कर्नाटकात हिंदू समुदायाला विभाजित करण्याच्या प्रयत्नात आहेत."
फोटो स्रोत, TWITTER/@BJP4KARNATAKA
चिट्ठीत काय लिहिलंय?
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कर्नाटकातील प्रचारसभेनंतर दोन तासात कर्नाटक भाजपनं हे वादग्रस्त पत्र ट्वीट केलंय.
या पत्रावर 10 जुलै 2017 अशी तारीख आहे. पत्रावर क्रमांकसुद्धा नमूद आहे. एम.बी.पाटील यांचं हस्ताक्षर आहे, ज्यात सोनिया गांधी यांच्यासाठी असं लिहिण्यात आलंय.
- "आम्ही आपल्य़ाला हा विश्वास देतो की काँग्रेस पार्टी 'हिंदुंमध्ये फूट पाडा आणि मुसलमानांना जोडा' या नीतीप्रमाणे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात विजय संपादन करेल.
- "हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेस पार्टी लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समुदायामध्ये असलेल्या मतभेदांचा फायदा उठवणार आहे."
फोटो स्रोत, Getty Images
कर्नाटकात भाजपनं हे पत्र सार्वजनिक केल्यानंतर काँग्रेसनं तातडीनं त्याला उत्तर दिलंय.
काँग्रेसनं म्हटलंय की, "कर्नाटक भाजप खोटा प्रचार करत आहे. यासाठी एक जुनंपुराणं पत्र काढून आणलंय, जे पहिल्यांदाच खोटं असल्याचं सिद्ध झालं आहे."
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात दावा केलाय की ते भाजपनं केलेल्या खोट्या ट्वीटची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.
2018 मध्ये पत्र खोटं ठरवलं होतं..
इंटरनेट सर्चमुळे हे सिद्ध झालंय की, 12 मे 2018ला कर्नाटक विधानसभेच्या मतदानाआधी या पत्राशी संबंधित काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
या बातम्यांनुसार गेल्या वर्षी 'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या वेबसाईटनं हे पत्र छापलं होतं. ज्याचे संपादक मुकेश हेगडे स्वत: फेक न्यूज पसरवण्याच्या आरोपात तुरूंगात जाऊन आले आहेत.
काँग्रेस नेते एम.बी.पाटील यांनी 2018लाच हे पत्र खोटं असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर 'पोस्ट कार्ड न्यूज' वेबसाईटनं हे पत्र आपल्या वेबसाईटवरून हटवलं होतं.
मात्र भाजपच्या ट्वीटनंतर पुन्हा एकदा हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं जातंय.
मंगळवारी जेहा काँग्रेसनं भाजपच्या ट्वीटवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा पक्षानं लिहिलं की, "ज्या चिठ्ठीत एम.बी.पाटील यांनी लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समुदायात विभागणी करण्याची भाषा केली आहे, ते कन्नड वृत्तपत्र विजयवाणीनं छापलं आहे. मग काय मीडिया खोट्या बातम्या पसरवत आहे, असं काँग्रेसला म्हणायचं आहे का?"
फोटो स्रोत, TWITTER/@BJP4KARNATAKA
कन्नड वृत्तपत्राची भूमिका
कन्नड भाषेतील दैनिक विजयवाणीनं 16 एप्रिल 2019 ला आपल्या वृत्तपत्राच्या दुसऱ्या पानावर हे पत्र छापलं आहे.
"एम.बी.पाटील यांनी आणखी एक वाद सुरू केला" असं या बातमीचं हेडिंग आहे. यासोबत एम.बी.पाटील आणि सोनियांचा फोटोही वापरण्यात आला आहे.
सोबतच इंग्रजीत लिहिलेल्या पत्राचा अनुवाद आणि काही भागही यासोबत प्रकाशित करण्यात आला आहे.
फोटो स्रोत, VIJAYAVANI
बंगळुरूमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी इमरान कुरैशी यांनी सांगितलं की विजयवाणी कर्नाटकातील अनेक महत्त्वाच्या शहरात वाचला जाणारा पेपर आहे.
मे 2018 मध्ये हे पत्र चर्चेत आलं होतं, असंह इमरान कुरैशी यांनी सांगितलं.
पण जे पत्र एक वर्षापूर्वीच खोटं असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं, त्याचा वापर भाजपनं कर्नाटकातील मतदानाआधी का केला? याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर अद्याप वृत्तपत्राच्या संपादक आणि मॅनेजमेंटनं दिलेलं नाही.
जर विजयवाणीकडून याचं कुठलं उत्तर मिळालं तर ते या बातमीत नव्यानं प्रकाशित करण्यात येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)