नरेंद्र मोदी यांच्या सभेला खरंच एवढी गर्दी जमली होती का? - बीबीसी फॅक्ट चेक

  • फॅक्ट चेक टीम
  • बीबीसी न्यूज

फेसबुक आणि ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो शेअर केला जात आहे. पश्चिम बंगाल इथल्या सभेतील हा फोटो असल्याचं म्हणत शेअर केला जातोय.

पश्चिम बंगालमध्ये 11 एप्रिलला झालेल्या मतदानापूर्वीचा हा फोटो आहे, असा दावा उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये काही जणांनी केला आहे.

बहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा फोटो मोदींच्या कूच बिहार इथल्या सभेचा असल्याचं म्हटलं आहे.

'नरेंद्र मोदी 2019' नावाच्या पब्लिक ग्रुपमध्ये म्हटलंय की, "हा फोटो म्हणजे पश्चिम बंगालमधील भाजपच्या सभेचा नजारा आहे. कूच बिहार इथली सभा. आज तर ममता बॅनर्जी यांनी झोप उडाली असेल."

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 42 पैकी 23 जागा जिंकण्याचं लक्ष्य दिलं आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनुसार, भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्या पश्चिम बंगालवर विशेष लक्ष देत आहे.

पण व्हायरल फोटोमध्ये भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांना पाहिल्यानंतर जे लोक याला मोदींच्या सभेतील म्हणून सांगत आहेत, त्यांचा दावा चुकीचा आहे.

या फोटोचा भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही.

फोटो कॅप्शन,

सोशल मीडियावर अनेक जणांनी हा फोटो शेयर केला आहे.

फोटोची सत्यता

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 एप्रिल 2019ला एक सभा घेतली होती. पण रिव्हर्स इमेज तंत्रज्ञानावरून हे लक्षात येतं की, ज्या व्हायरल फोटोला मोदींच्या सभेतील म्हटलं जातंय तो 2015मध्ये पहिल्यांदा इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता.

आमच्या पडताळणीनुसार हे लक्षात आलं की, हा फोटो भारतातला नाही, तर थायलंडमधील समुत साखोन प्रांतातील आहे.

या फोटोला बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करणारी वेबसाईट 'डीएमसी डॉट टीवी'नं 26 ऑक्टोबर 2015ला प्रसिद्धी दिली होती.

डीएमसी म्हणजे 'धम्म मेडिटेशन बौद्धिजम' एक मीडिया नेटवर्क आहे. या वेबसाईटनुसार, बौद्ध धर्माशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांना ते कव्हर करतात.

फोटो कॅप्शन,

व्हायरल फोटोच्या वरती डावीकडे डीएमसी डॉट टीव्हीचा लोगो दिसून येतो.

जवळपास 20 लाख बौध्दांचा उत्सव

डीएमसीनुसार थायलंडमध्ये बौध्द धर्माला मानणारे भिक्षा-अर्पण करण्यासाठी एका मोठ्या उत्सवाचं आयोजन करतात.

2015मध्ये या पद्धतीच्या एका कार्यक्रमात जवळपास 10 हजार बौद्ध भिक्खू सामील झाले होते.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या 20 लाख सांगण्यात आली होती.

वेबसाईटनुसार या कार्यक्रमात थायलंडच्या 9 हून अधिक प्रांताचे बौद्ध भिक्खू, सरकारी कर्मचारी आणि सैनिक सहभागी झाले होते.

26 ऑक्टोबर 2015ला डीएमसी डॉट टीव्हीनं या कार्यक्रमाचे जवळपास 70 फोटो पोस्ट केले होते.

वेबसाईटनुसार, या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन समुत साखोन सेंट्रल स्टेडियमसमोरील एकाचाई रोडवर करण्यात आलं होतं.

'गूगल अर्थ वेबसाईट'च्या साहाय्यानं आम्ही 'डीएमसी डॉट टीव्ही'च्या वेबसाईटच्या दाव्याची पुष्टी केली. आम्ही स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून त्या इमारतीला शोधलं, जी व्हायरल फोटोत दाखवण्यात आली होती.

फोटो कॅप्शन,

गूगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये आम्हाला ती पिवळी इमारत आणि तिला लागून असलेलं घर दिसून आलं.

यापूर्वी चुकीचे दावे करण्यात आले

या फोटोला चुकीचे संदर्भ देऊन पहिल्यांदाच शेयर करण्यात आलं, असं अजिबात नाही.

2008मध्ये 'भारतीय हिंदूंचा फोटो' असं म्हणत या फोटोला शेयर करण्यात आलं होतं.

पण थायलंडच्या या फोटोसोबत करण्यात आलेले सर्व दावे खोटे आहेत.

हे वाचलंत का?

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)